Thursday, October 30, 2008

Posted by Picasa
एक झुरळ! ज्याला पाहताक्षणीच एकतर "ई" किंवा "त्याला ठेचा पायताणाखाली" हेच शब्दं कानी पडतात! पण हेच झुरळ जर दिमाखदार स्टेनलेस स्टीलच्या स्वरूपात, चकचकीत फ़िनीशमध्ये जर आपल्यासमोर कुणी आणून ठेवले तर?
तर तो एक object de art ठरतो. दिवाणखान्यात शोभून दिसतो. कुठून आणला ह्याची चौकशी करायला भाग पाडतो. नसेल पटत तर पुन्हा नीट पहा! दिसतेय काही ऊणीव त्याच्यात? मिळतोय काही दोष त्याच्यात ? नाही ना!
मग ह्या दिवाळीला ह्याचेच ग्रीटींग तुम्हा सर्वांना पाठवतोय.


आणि एकटा झुरळच का? अजून काही मासलेवाईक नमुने पाठवतोय. बगळा आहे, टोळ आहे

शहाम्रुग आहे
आणि चक्क एक फ़ुलांमधला रस पिणारा भुंगाही आहे. त्याचे पंख , त्याचा आणि अविर्भाव , सर्वच वेगळं आहे. असा भुंगा असेल तर फ़ुलालाही मजाच येईल.

हाच तो माशाचा डोळा जो अर्जुनाने भेदिला द्रौपदीसाठी!
दिवाळीच्या अनोख्या शुभेछ्छा!
हेमंत_सूरत
Posted by Picasa

Saturday, September 13, 2008

चेहरा

पायवाटेवरील धुळीत त्याच्या फ़ताड्या पायांची छाप पडून त्याचे अस्तित्व जमिनीला जाणवायचे. त्याच्या मागून येणार्यांना वार्याच्या झुळूकेतून त्याच्या घामाचा दर्पं यायचा. त्याच्या येण्याने व जाण्याने वाटेवरली कुत्री पडल्या पडल्या फ़क्तं डोळे किलकिले करून त्याचे अस्तित्व नोंदवायची. त्याच्या चेहर्यावरच्या रेषा कुणालाही कधी जाणवल्यात असे समोरच्याच्या डोळ्यांतून कधी झिरपले नाही. चालतानाची लकब कुणी मान वळवून बघावी अशी तर नव्हतीच नव्हती. कपडे घातलेले आहेत ते उपचार म्हणून! त्याच्या एकंदर अविर्भावावरून तो कशासाठी जातोय, कुणासाठी जातोय याचा कुणालाच थांगपत्ता लागत नव्हता.
विचार आपल्या मनात आपसूक येतात व येतच राहतात, जुने विचार मागे सरून पुढले विचार येतात त्या यंत्रवत परिपाठाप्रमाणे त्याची पावले पुढे पडत होती. पुढली झाडे मागे जात होती. दूरचे ठिपके मोठे होत होत त्याच्या सावलीत नाहिशी झालेत. पुढे उगवणारा सूर्य दिवसाचा क्रम आटोपून मागे सरत होता. त्याच्या पाठीला चिकटलेला उजेड हळुहळू निसटून अंधारात चाचपडत होता. त्याचे डोळे मात्र होते तेथेच होते. विचार होते तेथेच थांबले होते. नाही म्हणायला डोळे एकाच गोष्टीत खोलवर रूतले होते, अंधारात! त्या डोळ्यांना हेही जाणवले नाही की गावकोस ओलांडून भर संध्याकाळी तो एका घरासमोर यंत्रवत थांबला होता.
घर कसले ते! चार भिंतीत पाच कोनाडे ठेवलेले. दोन चुलींवर अर्धवट सरपण जळत पाण्यात टाकलेले मूठभर धान्य शिजायला कुरकूर करत होते. पोटाला भूक नसल्यागत घरचा धनी दरवाज्यात फ़तकल मारून बसला होता. मिणमिणत्या दिव्यात एक करपून गेलेली स्त्री होते नव्हते ते समोरच्या डब्यांमधून शोधून भांड्यात लावत होती.
घरच्या धन्यासमोरून हा वाटसरू आरपार निघून समोर जातोय तर न राहवून त्याला हटकले,"अहो पावणं, थांबा की जरा". पहिल्या हाकेत नाही पण तिसर्यात त्याने मान वळवली. क्षण दोन क्षण नीट थांबून पाहिले. तो ह्हरवलाय हे जणू तो त्याच्या डोळ्यातून हाक मारणार्याला सांगत होता. "अहो पावणं, मागं फ़िरा. बसा जरा घटकाभर. दोन घास खाऊन मग पुढे कुठं जायच तर जावा!"
आत्तापर्यंत फ़क्त शरीर चालत होतं तेही थांबल आणि मनाबरोबर स्थीर झालं. दोघेही एकमेकांसमोर बसलेत. घरच्या धन्याचं हळी मारणं, त्याच बसणं, हे घरातल्या स्त्रीच्या कानानं हेरलं होतं. आता तिच्या हालचालींना वेग आला. चुलीत दोन लाकडं जास्तं शिरलीत. फ़ुंकणीतून हवा अजून ओतली. भांड्यातल्या पाण्याला उकळी फ़ुटली. डाळ तांदूळ रटरट आवजात नाचू लागलेत. दिव्याची ज्योत मोठी झाली. घरातल्या वस्तूंना उजेडात आकार आला.
तीन थाळ्या जमिनीवर पसरल्यात. ऊनऊन भात व डाळ त्यावर विराजमान झाल्यात. बाहेरची मंडळी थाळ्यांसमोर आली. हात व तोंडाची गट्टी जमताच समोरची डाळ भात नाहीशी होऊ लागली. हळुहळू वाढण्याचा आवाज नाहीसा झाला. थाळ्या रिकाम्या झाल्यात. ढेकर देण्याच्या आवाजाने त्यावर शिक्कामोर्तब झालं. चूळ भरून हात धुतल्याच्या आवाजाने पावले दारापाशी येऊन थांबल्याची ग्वाही दिली. थोड्याच वेळात दाराजवळ सहा पावले येऊन बसलीत. दिव्याच्या अंधूक होत चाललेल्या प्रकाशात तिघांचेही चेहरे त्रुप्तं जाणवत होते. त्यातल्या एका चेहर्याचे ओठ हललेत व काही शब्दं हवेत फ़िरू लागलेत. दुसरीकडून हलकासा प्रतिसाद येऊ लागला. जेवण देणारी ती स्त्री अजूनही फ़क्तं कानांचाच वापर करीत होती. त्या दोघांच्या बोलण्यातून तिने ताडले की येणारी व्यक्ती चित्रं काढते. चित्रांच्या शोधात तो माणसे शोधू लागला.
माणसांच्या चेहर्यात त्याला माणसे दिसेनात. जितकी जास्तं माणसे त्याने पाहिलीत, तितकी ती त्याला चेहर्यांपासून दूर वाटली. त्यांना सुरकुत्या नव्हत्या तर अपेक्षांचं जाळं होतं. डोळे नव्हतेच, त्या जागी तर अत्रुप्त ईच्छांच वारूळ होतं. नाकाच्या जागी समोरच्या व्यक्तीच्या स्वार्थाचा दर्प येत होता. हसण्यातून फ़सवेपणा जाणवत होता. कान फ़क्त आणि फ़क्त स्तुतीसाठीच हपापलेले होते. केसांच्या जागी खुजं कर्त्रुत्व (?) झळकत होतं. गळा तर सगळा भूतकाळाच्या आठवणीत रूतला होता. डोकं निव्वळ खोटेपणाने भरलं होतं. चेहरा मुळी त्याला दिसलाच नव्हता. चेहरा नाही म्हणून चित्र नाही. चेहर्यासाठी तो वणवण भटकत होता.
त्याची व्यथा जाणवताच घरातल्या स्त्री-पुरुषामध्ये समाधान पसरले. हो, होता आमच्या घरात एक चेहरा! तू म्हणतोस तसा. निरागसतेचा चेहरा, स्वार्थापासून दूर, आशेच्या जवळचा व प्रेमाला हपापलेला. पण तोही काही वर्षांपूर्वी आमच्यापासून दूर गेला, तोही कायमचा! आमचा एकुलता एक मुलगा.
त्या दिव्याच्या इवल्याशा प्रकाशात त्या माऊलीने घरातली एक छोटीशी पेटी ओढली. त्यातले एका किशोरवयीन मुलाचे कपडे बाहेर काढलेत. त्याच्यासाठी वापरात असलेला कंगवा, काजळाची डबी, तो खेळत असलेले काचांचे तुकडे, धातुच्या रिंगा, सर्व काही त्या चित्रकारासमोर ओतले. हळुहळू ते आई-बाप मुलाच्या आठवणीत रमलेत व दु:खाच्या सुखात न्हात निद्राधीन झालेत. थिजलेला तो चित्रकार वाटसरू दरवाज्याशीच अंग आडवं टाकून झोपेला शरण गेला पण मनाशी काहीतरी निर्धार करून!
सकाळी लख्खं उजाडलं तेव्हाच घरातल्या मालक मालकिणिने आळस देत, शांत झोप घेतल्याची ग्वाही देत आजूबाजूला पाहिलं तर तो पाहुणा दारापाशी नव्हता. त्यांनी लगबगीने दाराबाहेर येऊन पाहिले तर -
रांगोळी, काचा, कवड्या, काजळ, रिंगा व रंगीत चिंध्यांचे मिळून एक अमर चित्र तयार झालं होतं त्या मुलाचं! त्याला डोळे होते, नाक होतं,ओठात हसू भरलं होतं आणि आईवडिलांसाठी असलेला अमाप करुणेचा एक चेहरा पण होता!

Sunday, April 13, 2008

कवि अनिल

मित्रहो, कवि अनिल ह्यांच्या काही दशपदी माझ्याकडे आहेत. त्यातील काही पाठवतोय. त्यांची CD पण आहे. ती ऎकताना वेगळीच अनुभूती होते. मी माझ्या काही मित्रांना CD पाठवणार आहे gift म्हणून. ज्यांना वेगळी CD हवी आहे त्यांनी ह्या पत्त्यावर संपर्क करावा. अर्थात हा काही publicity stunt नाहीय. फ़क्त बर्याच वेळेस असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट हवी असते पण कशी व कुठून घ्यावी हे माहीत नसते म्हणून ही सोय केली आहे.

सौ. आशावती देशपांडे, 88, west park road, Dhantoli Nagpur - 440012
एका CD ची किंमत आहे रुपये शंभर . पोस्टेज वेगळे. D.D. १०० रु.ची "सौ. आशावती देशपांडे " ह्या नावाने पाठविणे.
e-mail : deshpande.nagpur@gmail.com


तुझ्याविना

कितीक काळ हालला
असा - तुझ्याविना
कळे न श्वास चालला
कसा तुझ्याविना

दहिवरल्या प्रहरातून वाट
पाहते पहाट
बहर गळे दरवळला
कसा तुझ्याविना

लवथवत्या पानावर गहिवरते
भरदुपार
ज्वरभरला दिवस ढळे
कसा तुझ्याविना

तमामधुन सावकाश उजळे
आकाश निळे
चळे उदास चंद्रमा
कसा तुझ्याविना

तार्यांचा धरून भार रात्रिस
उरते न त्राण
स्मरणावर प्राण जळे
कसा तुझ्याविना


स्वप्नबीज

थोडी जाग थोडी नीज
अधांतरी स्वप्नांचे बीज
काही द्न्यात काही भ्रांत
किंचित व्याकुळ
किंचित शांत

थोडी बाहेर थोडी आत
किंचित पहाट किंचित रात
थोडी ऊब थोडे गार
केव्हा स्मित केव्हा सुस्कार
काही धीट काही भीत
थोडी हार थोडी जीत

अंमळ रुसवा अंमळ प्रीत
काही गुणगुण काही गीत
थोडी जाग थोडी नीज
अधांतरी स्वप्नांचे बीज

Friday, April 11, 2008

कवि अनिल

कवि अनिल

अचानक धनलाभ तसा कधीकधी अचानक celebrity लाभ होतो. मित्राच्या मुलीच्या लग्नाला जाण्याचा मुहूर्त साधला. सूरजकुंड्च्या आलीशान हॉटेल मध्ये रहाण्याची व्यवस्था. प्रशस्त रूम्स. रूम्सच्या मधोमध तळे त्याबाजूला पेंडॉल. रोषणाईची जय्यत तयारी एका बाजूला चालू. मला फ़िकीर मी कोणत्या रूममध्ये आणि माझ्याबरोबर कोणती व्यक्ती येणार? नागपूरच्या माझ्या मित्रांपैकी की कोणि अनोळखी? मग गप्पा कोणाबरोबर मारणार?
मित्राने सांगितले तू काळजी करू नको. आत्ता इकडे तिकडे फ़ीर. संध्याकाळी सांगतो कोण आहे तुझ्याबरोबर. दिवस फ़िरण्यात घालवला. थोडे trinkets घेतले. रात्रीच्या जेवणाआधी मेसेज मिळाला देशपांडे सर तुझ्याबरोबर आहेत. मी आनंदाने उडालोच. म्हणजे कवि"अनिलांचे" चिरंजीव? हो पण त्याचे काय? त्यांची identity तर department of architecture चे head ही होती. अतिशय प्रोफ़ेशनल approach. disciplined व्यक्ती. सगळ्यांना त्यांच्याबद्दल नितांत आदर. architecture चे subjects शिकवावे ते त्यांनीच. खूप काही बोलायचे मनात साठवून मध्यरात्री शिरलो function आटोपून रूममध्ये तर नशिबाने ते जागेच होते.

"सर, मी आज जरी प्रोफ़ेसर असलो तरी बहात्तर ते सत्त्याहत्तर तुम्हाला हेड म्हणून पाहीलेय. तुमच्याशी तेव्हापासूनच बोलायची ईच्छा होती पण शक्य झाले नाही. आज विचारायची ईच्छा आहे की मला तुम्ही कवि "अनिलांचे" चिरंजीव म्हणून सांगा की कवि अनिल केव्हा आणि कशा कविता लिहायचेत?"
"मला खरं तर हे आवडलं की तुम्ही ईतरांप्रमाणे हे नाही विचारले की मी का कवि नाही झालो. माझे बाबा सारखे फ़िरतीवर असायचे खास करून नागपूर ते दिल्ली या रूटवर. त्यांची फ़र्स्टक्लास कोचअमध्ये वरचा बर्थवरची जागा रिझर्व केलेली असायची. रात्री बसलेत बर्थवर की मग कविता लिहायला सुरूवात व्हायची. त्यांच्या बर्याचशा कविता ह्या वरच्या बर्थवरच्याच आहेत. पण success rate 50%. कारण अर्ध्या तरी वेळेस त्यांना ओळखणारा कोणि तरी भेटायचाच. मग कसल्या कविता अन कसलं काय. गप्पांमध्येच वेळ निघून जायचा. पण घरी आल्यावर माझी आई त्यांना विचारायची," किती कविता केल्यात?". मग केली असेल तर कवितावाचन व्हायचे. त्यात करेक्शन्स, मॉडिफ़िकेशन्स वगैरे सोपस्कार होऊन ती पूर्णत्वाला यायची. खासकरून दशपदी हा प्रकार त्यांनी ट्रेनमध्येच जास्तं लिहीला?"

"दशपदीची एखादी खास आठवण?"
"हो. त्यांची शेवटची दशपदी ही नेमकी नऊ ओळिंची होती. त्ती पूर्ण करण्यासाठी तमाम रसिकांना आवाहन केलं. खूप जणांनी response दिला. पण मनासारखी पूर्तता होत नव्हती. शेवटी मान्यवर विजया राजाध्यक्ष यांनी नोट केले की नऊ ओळींमधली शेवटची ओळ मुळी दहावी ओळ होती व नववी ओळ missing होती. त्यानंतर काम सोपे झाले. माझ्या वडिलांना दशपदीत शेवटची ओळ आधी लिहून मग नववी ओळ लिहायची सवय होती. "

"ते हातांनी लिहायचे की typewriter वर लिहायचे घरी?"
" हातांची व खास करून बोटांची एक गंमत आहे. आप्ल्या बोटांची टोके ही फ़ार sensitive असतात. डोक्याशी जर त्यांचे जमले तर बोटेच लिहीतात असे वाटते. पण त्यासाठी डोके, विचार व लेखणी ह्यांचे synchronization व्हायला हवे."
" हा त्याबद्दल परवाच्याच एका संगीत सरिता कार्यक्रमाची आठवन आली. त्यात एका संगीत तद्न्याने सांगितले की प्रथम आम्ही वाजवतो मग विचार करतो की काय वाजवतोय. मग आम्ही विचार करतो की काय वाजवायचे आहे आणि मग दुसर्या stage मध्ये त्याप्रमाणे वाजवतू. पण खरी कसोटी असते ती तिसर्या stage ची की तेव्हा आम्ही बोटांनी वाजवतो विचार आणि वाजवणे एक्साथ होतं. ती खरी परमानंदी टाळी!"

गप्पांमध्ये घड्याळ मध्यरात्रीचे किती वाजलेले दखवतंय इकडे दुर्लक्ष झाले आणि शेवटी एक CD gift मिळाली कवि अनिलांच्या दशपदींची !
सूरतला आल्यावर ऎकताना ब्रह्मानंदी टाळी लागली आणि अर्थापलीकडचे अर्थ एक एक करून पाझरू लागले. बोल होते :

कितीक काळ हालला असा तुझ्याविना
कळॆ न श्वास चालला तुझ्याविना

दुसरी दशपदी :

थोडी जाग थोडी नीज
अधांतरी स्वप्नांचे बीज

पंखी खुपसून चोच
एक पक्षी निजलेला

शिरा

नागपूरकडची एक (वेंधळी) देशस्थ फ़ॅमिली. स्थळ किचन. वेळ (नेहमीचीच) घाईची. दोन व्यक्तिंना तीन ठिकाणी जायचेय कारण एकाला उशिर झालाय नेहमीप्रमाणे.

" अरे देवा जाताना साखर खाऊन जा. समोरच्या डब्यात आहे वरच्या फ़ळीवर. खायचं नाव घेतलं आहे तर साखर तरी खाऊन जा,"
"कशाला नाट लावतेस. मला ब्रेडच हवी. ए सुमा, तो तवा काढ. मी वरनं तूप काढते ब्रेडसाठी."
" हे काय, तव्यावर ब्रेडऎवजी साखरेच्याजागी हे कसलं पीठ ओतलय? त्या धांदरट दिलप्याचाच काम असणार हे. "
" हे बघ ते जळतय पीठ का काय ते. आता ह्या दिलीपला फ़ोनवर आत्ताच बोलायचं काही अडलं होतं का? "
"आई, तूप वरून काढताना थोडं सांडल बघ. काही तव्यावर, काही जमीनीवर."
"थोडं काय गधडे, तो तवा भरला बघ तूपाने. आता काय करणार त्याचं?"
"ओत ते भाजलेलं पीठ ह्या परातीत."
"मी वेगळी काढून ठेवलेली पीठी साखर कोणि ढापली? ह्या परातीत ठेवली होती."
"हे त्या शालूचच डोकं असणार. पहायचं नाही काही नाही अन टाक म्हंटलं तर टाकायच परातीत. आता ती साखर विरघळली असणार त्या पीठात"
" अरे कोणितरी मीरी म्हणून वेलची कुटून ठेवलीय ह्या डबीत. हा बघ हा अजय खेळतोय त्या डबीशी मघापासून. दे रे ती डबी. काढलं बाई झाकण ह्या गुलामाने. अरे अरे काय करतोस हे. ती वेलची पूड फ़ेकली त्याने त्या पीठात."

" हे घर आहे की बाजार. ब्रेड दिसत नाहीय, तूप सांडलय, साखर लपलीय आणि आता वेलची पूडही नासवलीन. ओत हे सगळं त्या दिलप्याच्या घशात आणि जा म्हणाव interview ला."
"या अजयकडे बघ. तोंडात बोकणा भर्लेला दिसतोय कसलातरी. आणि हसतोय लबाड."
"आई, हा अजय बघ, तोंडात बोट नाही घालू देत मला काय खातोय ते काढायसाठी. हे बघ अजून एक लपका हाणला त्याने परातीतला."
" बघू मला त्याने काय खाल्लंय ते. नाहीतर पोट बिघडेल त्याचे. अरे वा!. हे तर फ़र्मासच झालय. उगाच नाही ह्या नखरेल कार्ट्याची खुषी दिसतेय ती. तू पण बघ एक घास खाऊन."
" आई ह्याला काय म्हणायच?"
" हा सगळ्यांच्या पोटात सहज शिरतो आणि आवडीने तेथे राहतो म्हणून ह्याचे नाव ठेवू या आपण "शिरा".

तर अशा रितीने देशस्थांनी शिर्याचा शोध लावला.
पण patent मात्र कोकणस्थांनी घेतले आणि धूम फ़ायदा केला देशाचा.
(सर्व देशस्थं आणि कोकणस्थांची क्षमा मागून. हो नाहीतर कोणी माझ्यावर दावा ठोकायचा.)

Saturday, March 29, 2008

बडबड गोष्टी

बडबड गोष्टी
बडबडगीते असतात तशा ह्या बडबडगोष्टी! छोट्यांच्या तशाच मोठ्यांच्याही आवडीच्या! हां आता तुम्ही मोठे नसाल तर तुम्हाला नाही आवडणार ही गोष्टं वेगळी. छोटे असाल तर अजून सांगा म्हणणार. तर काय मग तुम्ही छोटे़च व्हा. मोठ्यांच काही ऎकू नका.
स्वर्गात ईंद्राचा दरबार भरला आहे. सभा तुडुंब भरली आहे ती सर्वं प्रकारच्या प्राण्यांनी. कैफ़ियत मांडताहेत ते प्राणी आणि ऎकताहेत ते पण प्राणीच. देव फ़क्त निवाडा करण्यासाठी बसलेत ते शेवटचा निवाडा करण्यासाठी. मध्ये ते काहीच बोलणार नाहीत. हो, एक माणूस(प्राणी) पण आहे त्यामध्ये जर आपल्या पोळीवर तूप ओतून घेता येईल का या विवंचनेत ऊभा असलेला एका कोपर्यात. ऎकतोय डोळ्यांनी अन पाहतोय कानांनी.
प्रश्न आहे तो प्राण्यांमध्ये. एका बाजूला तक्रार करताहेत ते प्राणी आहेत ससा, गाय, हरीण, जिराफ़, बकरी आणि दुसर्या बाजूला ऊभे आहेत ते वाघ, सिंह, लांडगा, बिबट्या,अस्वल वगैरे! दोन बाजूंमध्ये फ़रक आहे तो जीवन-मरणाचा. अक्षरश:! कारण पहिल्या बाजूचे ससा, गाय, बकरी वगैरे प्रुथ्वीवरून मेल्यानंतर स्वर्गात आलेले आहेत तर वाघ, सिंह, अस्वल हे खास देवांनी बोलवल्यामुळे जिवंतपणीच स्वर्गात आले आहेत. तक्रार आहे ती ह्याप्रमाणे -
ससा - मी चांगला गवत खात होतो जवळच्या कुरणात तर हा लांडगा मला कानात काहीतरी सांगतोय म्हणाला असं वाटल्यामुळे मी मान त्याच्या तोंडाजवळ नेली तर ह्याने माझे कानच खाल्लेत. आता ह्याला काही गरज होती का असं काही करण्याची? तूही तर कुरणाच्या दुसर्या बाजूने गवत खात खात तर येत होता ना.
लांडगा - मला शिकवू नकोस गवत खात होतो म्हणून. मी पाहीलं तर तू चक्क गवत खाता खाता एक तुरु तुरु धावणारा कोळी मटकावलास. लगेचच दुसरा कोळी मला तुझ्या कानावर दिसला म्हणून मी तो मटकावला तर तुझा कान नाजूक. लगेच तुटून माझ्या तोंडात आला.
ससा - ठीक आहे. पण मग माझ्या मानगुटीत दात रोवून का मारलस मला? आपलं ठरलं होतं ना की जरी आपण लहान मोठे असलोत तरी पोट भरलं असेल तर उगाचच दुसर्याला मारायचं नाही. एवढा वेळ तर तू गवत खात होतास?
लांडगा - आता तुझ्या आरस्पानी गळ्यातून जाणारे गवत मला दिसत होते. वर तो कोळी मला वेलची टाकल्यासारखा दिसत होता. मग मला राहवले नाही. तुझ्या गळ्यातले गवत खाण्यासाठी मी फ़क्तं दात रोवले व जिभेने माझ्या गळ्यात ओढून घेतले. आता त्यात तुझा जीव गेला तर मी काय करू?
तेवढ्यात ईतका वेळ मागे चुपचाप असलेली गाय वाघिणिकडे रोखून ओरडायला लागली. "ह्या लांडग्यामुळेच मी हकनाक जिवाला मुकली. मला माहीती आहे सशाला खाताना ह्या वाघिणिने नक्कीच ऊंच कड्यावरून पाहीलं असणार. कारण अगदी कालपर्यंत तर ही वाघीण तिच्या मुलांसाठी गवताचे भारे एकावर एक उचलून आणत होती. मग आजच माझ्याबरोबर गवत खाण्याचे निमित्त करून मला अचानक पाडून माझ्या वासराची पण का हत्त्या केली?
यावर वाघीण काही कमी नव्हती. तिने लगेच गायीला पकडले." हे बघ तू जर निव्वळ गवत खात होतीस तर मग तुझ्या पायाखालून जाणारे तीन ऊंदीर एकदम कसे नाहीसे झालेत? शिवाय त्याआधीचे दोन सरडे, एक पाल आणि एक बेडूक तू दाताखाली टाकलेस ते काय गवत म्हणून? तू जर हे सर्व करू शकतेस तर मला पण तुझ्या हातापायाचं धिरडं करून खाता येऊ शकत. जे प्राणी जिभेवर बेडूक ठेवू शकतात, ते दुसर्यांच्या गळ्यात व पोटात मुक्काम ठेवू शकतात!
या सगळ्यावर कहर म्हणून जिराफ़ मध्येच केकाटला," ह्या बिबळ्याला आवरा. माझ्याबरोबर झाडावर चढून पाला खाता खाता मला म्हणाला तुझ्या मानेला काट्यामुळे जखम झालीय, जरा चाटून पुसून देतो, म्हणजे सेप्टिक होणार नाही. मी मान वाकडी केली तर माझ तोंड मला माझ्या पायावर दिसलं आणि मान ह्याच्या तोंडात. शोभत का हे पोटभर पाला खाऊन ढेकर दिल्यानंतर?"
बिबट्या - हे बघ पोट भरल्याच्या गोष्टी माझ्यासमोर नको करूस. तूही पाला ओरबाडता ओरबाडता झाडावरच्या ओळीने चालणार्या मुंग्यांचा फ़डशा पाडत होतास. तू जर मुंग्या खाऊ शकतो, तर मी मुंग्याचे वारूळ तुझ्या मानेत आहे असे समजून ते ढापू शकतो.
हे एवढं झाल्यावर तर माकडालाही रहवलं नाही. तो आवेशाने म्हणाला," सगळ्यात वाईट अस्वल. माझ्या छोट्यांना हसवत हसवत फ़ळांच्या झाडाखाली घेऊन गेला, आपण फ़ळे खाऊ सांगून. आणि थोड्या वेळाने पाहतो तर काय, माझ्याच मुलांची फ़ळे खात होता."
अस्वल - हे पहा , आपण प्राणी आहोत, माणसं नाहीत. आपण प्राणी जे काही करतो ते फ़ळांची अपेक्षा ठेवूनच करतो. माणसांना खुशाल म्हणू दे, कर्म करा फ़ळाची अपेक्षा ठेवू नका. मी जे काही करणार त्यात फ़ळ खाणार हे आलेच. तुझी बाळं ही तुझ्या संसाराला आलेली फ़ळच आहेत ना? मग कशाला अकांडतांडव करतोस?
यावर कोल्हा, हत्ती, झेब्रा हे सर्व देवाकडे बघून एकसुरात विनवणी करायला लागलेत की देवा वाचव आम्हाला या हिंस्त्र श्वापदांपासून. आम्ही आता जरासुध्धा बाहेर जाऊ शकत नाही. बाहेर पडलो तर सिंह, वाघ, लांडगा आम्हाला खाणार. नाही बाहेर पडलो तर उपाशीपोटी हाल हाल होऊन मरणार. आम्हाला काय हे प्राणी असेही खाणार नाही तर तसेही खाणार.
हे ऎकताच देवांची ट्युब पेटली आणि त्यांनी लगेच निवाडा द्यायला सुरुवात केली याप्रमाणे.
"यापुढे ससा, गाय, झेब्रा, हरीण, जिराफ़, माकड हे आणि ईतर यांच्यासारखे सर्व फ़क्त गवत, पाला व फ़ळे खातील. हे खाऊन ते लठ्ठं झालेत की नंतरच मग त्यांना वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल वगैरे हिंस्त्र प्राणी त्यांचा फ़डशा पाडू शकतील. यापुढे वाघ, सिंहांना गवत पाला वगैरे अजिबात आवडणार नाही व ते खाणार्या प्राण्यांना "घास-फूस" म्हणून चिडविल्या जाईल. वाघ- सिंहांना नखे, सुळे व मऊ पंजाची गिफ़्ट देण्यात येईल कारण त्यामुळेच ते नीट शिकार करू शकतील. हत्तींना मात्र अभय राहील. फ़ारच कमी पक्षी यात involved नसल्यामुळे त्यांना उंदीर, कोळी, सरडे वगईरे खाण्याची परवानगी मिळेल. काही पक्ष्यांना पाण्यात बुडी मारून मासे खाण्याचा बोनस मिळेल. पण या सर्व प्रकारात मासे चतुराईने ईतरांना उगाचच जमीनीवर येऊन खात असल्याचे आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही त्यांना हा शाप देतो की मासेच माशांना खातील. "
ईतका वेळ बाजुला राहीलेला माणूस पुढे येऊन बोलला,"देवा, माझं काय?"
देव उत्तरलेत," तुला सर्वं काही खाण्याची परवानगी राहील. मात्र तू तुझ्या बुध्धीचा उपयोग करून, तुझ्या सद्सद्विवेकबुध्धीला पटले तर तूच प्राण्यांना मारण्याची यंत्रे शोधून काढून मारशील आणि खाशील."
यानंतरच शाकाहारी, मांसाहारी, पाळीव आणि हिंस्त्र श्वापदे अशा categories निर्माण झाल्यात.
हेमंत_सूरत

Saturday, February 16, 2008

स्वप्नं पुन्हा!

स्वप्नं पहा स्वप्नं विका ही raw ideaतुम्ही नुकतीच वाचली असेल. आता त्या idea रुपी तीळाचा हा बघा कसा हलवा बनविला आहे मी dialogues मधून.

"उठा, ९ वाजलेत सकाळचे."
"झोपू दे ना. आणि आत्ता आफ़्रिकेतले सहासुध्धा नाही वाजलेत."
"पगार इथल्या घड्याळाप्रमाणे मिळणार आहे, आफ़्रिकेतल्या नाही."
" पण मला मोठं व्हायचंय. मला झोपू दे."
"आता काय शिंगं राहीलीत मोठं व्हायला? आणि मोठं होण्याचा व झोपण्याचा काय संबंध?"
"आहे. संबंध आहे. १००% आहे. परवाच्या त्या फ़ंक्शनमध्ये चीफ़ गेस्टनी काय सांगितलं ते ऎकलं होतं ना तू?"
"ते तुम्ही ऎकत बसा. वेळेत घरी गेलं तर दोन घास तुम्हाला तुमच्या वेळेत देता येतील याची काळजी होती."
"चीफ़ गेस्ट म्हणालेत,’Think Big!. Believe in your dreams and then only can you make them happen'. कळलं?"
"त्याचं काय?"
"त्याचं काय म्हणजे? dreams बघायला झोपा नको काढायला? बिना झोपेची कधी स्वप्नं पडू शकतात?"
"ते तुमच्या विद्यार्थ्यांना विचारा. तुमच्या लेक्चर्समध्ये ते जागेपणीच daydreaming करतात हे तुम्हीच मला ऎकवलं होतं नं?"
"come on. मी विद्यार्थ्यांची नाही तर तुझी व माझी गोष्टं करतोय."
"म्हणजे आता तुम्ही झोपा काढणार. त्यात आळसामुळे तुमच फ़क्तं पोट तेवढं मोठं होईल. शिवाय झोपून काही कुणाचा पगार वाढल्याचं मी नाही बाई अजून ऎकले ते."
"आता तू नेहमी वाकड्यातच शिरतेस."
"मग सरळ काय ते बोला."
" असं बघ. कॉलेजमध्ये असताना गार्डनच्या दुकानासमोरून जाताना स्वप्नं बघायचो, लग्नानंतर बायकोला गार्डनच्या खूप साड्या देईन. त्या स्वप्नामुळे झाला की नाही तुझा फ़ायदा? तसंच तुझं एक स्वप्नं होतं की आपलं एक घर असावं, त्यात एक मूल बागडावं, झालच तर नोकर-चाकर, फ़र्निचर व ईतर सोयी असाव्यात. मग ते स्वप्नं तू पाहिलं म्हणून तर तुला ते खरं होऊन मिळालं ना?"
"कोण म्हणालं स्वप्न पाहीलं की मगच ते खरं होतं? साधा खड्डे खणणारा मजूर पण स्वप्नं बघतो मोठं होण्याची. होतात का त्याची स्वप्ने पूर्णं? तो तर खड्ड्यांवर व स्वप्नांवर एकाच वेळेस माती लोटतो."
" मग हजारो छोटी मुले सचिन होण्याची स्वप्ने बघतात ती त्यांनी बघायलाच नकोत का?"
"बघावी ना. पण आईवडिलांना १० हजारांची किट आणायला भाग पाडू नये."
"तुम्ही बायका व मुली advertisements बघून जी वेगवेगळी creams, lotions लावता ती सुंदर दिसण्याच्या स्वप्नांपायीच नां? नाहीतर आतापर्यंत कोणाचंही नकटं नाक क्रीम्सनी वर आणल्याचं ऎकलं नाही."
" ते स्वप्नं नाही, तुम्हा पुरूषांना स्वप्नांच्या दुनियेत नेण्यासाठी की हे क्रीम जर बायकोला दिलं तर ती तुमच्यावर खरंच प्रेम करेल ह्या स्वप्नापायी."
"म्हणजे तुम्हा बायकांचं आम्हा नवर्यांवर प्रेम नसतं?"
"हे पहा, आम्हा बायकांचा नवर्यांवर हक्कं असतो, अधिकार असतो, हवं नको ते मागायचा. प्रेम हे तर त्या अधिकाराचे marketing आहे."
"मग ह्यापेक्षा अमेरिकेतल्यासारखी girl friend बरी. माहितीय, अमेरिकेतल्या टॉपच्या बास्केटबॉल प्लेयर त्याच्या गर्लफ़्रेंडला त्याच्याजवळ एवढी अढळक संपत्ती असूनही काहीच देत नाही सढळ हाताने. Nike त्याला अख्ख्या होल फ़ॅक्टरी युनिट च्या कामगारांच्या पगारापेक्षाही जास्तं endorsement fee देते तरी."
" मी सांगू, त्या गर्लफ़्रेंडने Nikeच्या मालकाची गर्लफ़्रेंडम्हणून रहावं. द्यावं सोडून त्या प्लेयरला खुशाल!"
"हे काय भलतंच?"
"भलतंच नाही. जो एक बास्केटबॉल प्लेयरला एवढी संपत्ती देऊ शकतो त्यालाच पकडावं. तोच तीची स्वप्ने पूर्णं करेल."
"मॅडम तो स्वप्नं पूर्णं नाही करत, तो स्वप्नं विकतो. त्यातून पैसे कमावतो."
"स्वप्नं आणि विकतो?"
"हो हो स्वप्नं विकतो. आणि त्यातूनच कमाई करतो हे मी पुन्हा सांगतो."
" हे जरा अतीच वाटतयं."
"आता मला सांग. तुम्ही बायका beauty parlour मध्ये जाता तर जावेद हबीब आणि lakme lo'real काय करतात? तर तुम्हाला सुंदर बनविण्याची स्वप्ने देतात. VLCC तरी काय करतं? Slim & Trim बनविण्याचा नादात तुमचं lost youth देण्याचं स्वप्नं विकतात. ह्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की तुम्हा बायकांना हे सर्व plastic surgeon सौंदर्याची स्वप्ने विकतात व त्यापायी त्यांना जगभर million dollar business मिळवून देता."
"मग सचिन शाहरूखच काय?"
"सांगतो ना. world tel सचिनला मॉडेल करून त्याच्यासारखं थोर(?) होण्याचं स्वप्नं तुम्हाला pepsi, aviva, visa ह्यातर्फ़े विकतात. शाहरूख खानही त्या वाहत्या गंगेत हात धुऊन घेतो.नाहीतर नवरत्नं तेल अमिताभला तीन कोटी रुपये त्यांनी देईपर्यंत माहीतही नव्हते. पण तुम्हा-आम्हाला नसलेल्या पैशांमुळे येणारी डोकेदुखी पिढ्यानपिढ्या माहिती होती."
"बाबा, मग आम्ही मुलींनी काय jeans, tops, westside, pantaloon ह्यामध्ये जायचंच नाही का?"
" जायचं ना. पण त्यात उखळ पांढरं होतं ते fashion designers चं, future groupचं, लेविज लेबलच,. कारण ५० रु. चं कॉटन त्यावर १०० रु. चं प्रोसेसिंग करून तुम्हा-आम्हाला ६०० ते ६००० पर्यंत आणून विकतात मोनिका सेलेस ते बिपाशा बासू झाल्याची खोटी द्रुष्टी देऊन."
"ही यादी मोठी आहे. त्यात family security चे स्वप्नं दाखवून लुबाडणार्या insurance कंपन्या आहेत, डॉक्टर, ईंजिनीयर, मॅनेजर्सची स्वप्ने दाखवणार्या educational institutions va universities पण आहेत. साध्या माणसाला हीरो हिरालाल बनविणारे सिनेमा निर्माते आहेत (पहा - रिक्षावाला, टांगेवाला, ईत्यादी) उत्तम कार, चकचकीत मोटरबाईक, तेज फ़ाकवणारे हिरे घेऊन का कुणी powerful किंवा सुंदर बनतं? पण नाही. ह्या स्वप्नांपायीच तर हा सगळा खेळ आहे. तेव्हा स्वप्नं बघू नका तर स्वप्नं विका. स्वप्नं विकाल तर श्रीमंत व्हाल."
" शेअर मार्केटच काय?"
" वा. श्रीमंत होण्यासाठी तर ते उत्तम साधन आहे पण शेअर ब्रोकर्सचं. तुम्ही आम्ही शेअर्स घेऊन श्रीमंत होऊ की नाही हे वेळच सांगेल. पण ब्रोकर्स मात्रं नक्की श्रीमंत होतील. घोड्यांची रेस चालवणारे, लॉटरी विकणारे, काढणारे, एवढंच कशाला, कौन बनेगा करोडपती मध्ये करोडपती एकटा-दुकटा नवाथेच होतो पण अमिताभ व स्टार अब्जोपती होतात तेही फ़क्तं स्वप्नांचा जुगार खेळून."
"चला, मग ऊठा आता. कॉलेजमध्ये जाऊन शिकवा - चुकले. मुलांना बिल गेट्स किंवा आईनस्टाईन होण्याची स्वप्ने दाख्विण्यासाठी शिकवायला जा व पुढल्या महीन्याचा पगार नीट घरी घेऊन या. तरच मी तुम्हाला घरी घेईन संध्याकाळी. हो म्हणजे तुमचे घरच्या जेवणाचे स्वप्नं तरी मी पूर्ण करेन."

शेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांची क्षमा मागून मी सांगतोय, "तुम्ही मला(ideasचा) तीळ द्या, मी तुम्हाला (संवादांचा) हलवा देईन!"

Friday, February 15, 2008

स्वप्नं पहा स्वप्नं विका

अरे झोपलात काय, उठा! जागे रहा. काम करा. स्वप्नं पाहून का कोणाचे भले झाले आहे? हे ऎकत ऎकत शाळा संपली. कॉलेज मध्ये रोल मॉडेल्स डोळ्यांसमोर येत होते. ते डोळ्यांसमोर येताच झोपा उडाल्या. त्यांची वाटचाल बघताना सगळीकडे जयघोष सुरू झाला "सफ़ल व्हायचय? स्वप्नं पहा. मोठे होण्याची स्वप्ने पहा. अरे स्वप्नंच नाही पाहिलीत भव्य दीव्य करायची तर मोठे कसे व्हाल?" झालं म्हणजे आता पुन्हा उलटं वागा. स्वप्नं पाहण्यासाठी झोपा काढा. नाहीतर मोठं होण्याची अशाच सोडा.

नीट विचार करा. खरच झोपा काठल्याने आणि स्वप्नं पाहिल्याने मोठं होता येईल का? स्वप्नं तर खड्डे खणणारा मजूर पण पाहतो. पण खड्डे खणता खणता त्याची स्वप्नेही खड्ड्यातच जातात. डॉक्टर होण्याची स्वप्ने बघितली म्हणून कोणी डॉक्टर होत तर नाहीच पण तरीही डॉक्टर नं होण्याची हुरहूर मात्रं जिवाला लावून घेतो. सिनेमानट होण्याचे स्वप्न बघून हजारो शाहरूख खान कुठे तरी चहा आणताहेत किंवा नगण्य अशी कामे करताहेत. सचिन व्हायचंय यामुळे कितीतरी मुलांच्या आईवडिलांना कॉस्टली किट्स आणाव्या लागताहेत. स्वप्नं बघणारी माणसे कधीच स्वप्नं पूर्ण करू शकत नाहीत. ती स्वप्ने पूर्ण करणारी माणसे वेगळीच असतात.
स्वप्नं बघण्यापेक्षा स्वप्नं विकावीत. दचकलात? हो हो स्वप्नं विकावीत. स्वप्नं विकणारी माणसेच जास्तं आणि पूर्णपणे successful होतात. कसं ते बघायचय?
कुडमुड्या ज्योतिषी भविष्याबद्दलची खोटी स्वप्ने दाखवून थोडेफ़ार पैसे कमवू शकतो. पण भविष्यातली स्वप्ने पूर्ण नं होण्याची भिती दाखवून मालामाल फ़क्तं insurance agent आणि insurance कंपन्याच होतात. Nike कंपनीचे शूज endorse करणारा अमेरिकेतला basketball player एका अख्या nike unit च्या (hongkong) income पेक्षा जास्तं कमावतो. कारण तो स्वप्नं विकतो एक successful player बनण्याची! सचिन शाहरूख पेप्सी पितो त्या style मध्ये pepsi प्यायल्याने सचिन वा शाहरूख झाल्याची स्वप्ने पिणारा बघतो.
शाळा-कॉलेज सोडणारी मुले आईन्स्टाईन होण्याची स्वप्ने बघतात. पुढे बिल गेट्स होण्याची महत्वाकांक्षेला खतपाणी देवून hardware-softwarwe कंपन्याचे उखळ पांढरे करतात.
रोटी कपडा और मकान शर्ट घालणारा मुलगा, बॉबी फ़्रॉक घालणारी मुलगी त्यावेळेस मनोजकुमार, डिंपल होण्याची स्वप्ने डोळ्यात नाचवत होती. पण खरे पैसे कमावलेत ते ती फ़ॅशन आणणारी agency व कपडे बनवणारी कंपनी. फ़ॅशन डिझायनर आजही त्यांच्या लेबलवर लाखो करोडो कमावताहेत कारण ते सुंदर असण्याची स्वप्ने विकताहेत. IT education देणार्या, मॅनेजमेंट डिग्री देणार्या institutes सुध्धा स्वप्नेच विकताहेत लठ्ठं पगाराची! त्यात पैसे मिळताहेत त्या संस्थांना. system बदलायचीय, prosperity आणायचीय, ही स्वप्ने दाखवून polical parties मते मिळवितात व सत्ता मिळताच श्रीमंत होतात. मतदार गरीबच राहतो. हौशी नट, साधा गायक, थोडफ़ार लिहीणारे, शब्दं फ़ुलवणारे गरीबच राहतात. स्वप्नं विकणारे मग ते politicians पासून ते जीन्स पॅंटच्या लेबलपर्यंतचे सर्वचजण धनकुबेर झाले आहेत. तेव्हा नुसती स्वप्ने पाहू नका, स्वप्ने विका.

Wednesday, February 13, 2008

marriage anniversary

"फ़ार भांडता तुम्ही माझ्याशी!"
"मला मूठभर तांदूळ आणून दे एकातरी घरातून ज्यात नवराबायको भांडत नाही. मग मी सोडतो भांडण तुझ्याशी"
"फ़ार सहन करावं लागतं मला तुमच्यामुळे!"
"हे तर प्रत्येक ग्रुहिणीच्या आत्मचरित्राचे title आहे. पुढचं बोल."
"कसा संसार करतेय इतक्या बेताच्या पगारात ते माझं मला माहित."
"ह्याला responsible तुझे वडिल. त्यांना चांगलं माहिती होतं त्यांची मुलगी किती लाडाकोडात वाढलीय ती. आणि माझा पगारही त्यांना माहिती होता. मग का त्यांनी जाणूनबुजून ह्या कोरडया संसाराच्या विहीरीत तुला ढकललं?"

"आपली भांडणं का होतात?"
"फ़ार चांगला प्रश्नं विचारला. हे मुळात तुझं-माझं भांडण नाहीच आहे मुळी. हे तुझ्या बाबांचं आणि माझ्या आईचं भांडण आहे. माझ्या आईला, तू मला दोन्ही वेळेस गरमागरम जेवण द्यायला हवस. आला गेला, सणवार बघायला हवं आणि त्याबद्दल तक्रार कधीच नको. तुझ्या बाबांना, मी तुला, पैशांच्या राशीत, नोकराचाकरांच्या दिमतीत व संसाराच्या काटकसरी शिस्तीत ठेवायला हवं. ह्या दोन विचारांच्या संस्क्रुतीला आपण नको तितके जपत असल्याने, आपले वैचारिक मतभेद व पुढे वाद कम वितंडवाद होतात. नाहीतर आपली मुलगी, तिचे शिक्षण, आपली आवडती पुस्तके, फ़िरायला जायची ठिकाणे, TV programmes, यावर आपला कधी तरी वाद झालाय?"
"मला कधीच तुमच्या खाण्याचा अंदाज येत नाही."
"साहजिक आहे. गोड व special dish तू चांगली व कमी बनविते. रोजचं साधं वरण, भात भाजी तू जास्तं बनविते. त्यापुढे जाऊन तू त्याचा आग्रहही करते. त्याऊलट गोडाचं rationing करते. त्यामुळे वरण-भाजी उरणार तर गोड लवकर संपणार."
"त्यात तुमचाच फ़ायदा आहे. कमी खऊन जास्तं जगा व रोगरहीत जगा. "
"जिवंतपणी अत्रुप्तं आत्म्यासारखं किचनच्या झाडाला धरून शंभर वर्षं लोंबण्यापेक्षा, पोटभर खाऊन ढेकराबरोबर स्वर्ग लवकर गाठण्यातच मोक्षं आहे."

"मला रवांडाला असाईनमेंट मिळालीय दोन वर्षांसाठी. पैसे कमावून येईन. जाऊ?"
"मला एवढं सांगा, तिथल्या civil war मध्ये तुम्ही सापडलात तर तुमची हाडं तरी मिळतील का मला? नाहीतर असं करा, मला एक तात्पुरता नवरा व तुमच्या मुलीसाठी दुसरा बाप contractने ठरवून खुशाल जा, मग हाडं नाही मिळालीत तरी चालेल."

"दोन दिवसांची conference मी organise करतोय. जेवण-खाण सर्वं तेथेच होईल. तू माझं काही करू नकोस. पहिल्या दिवशी सांस्क्रुतिक कार्यक्रम व जेवायला तुम्ही दोघी मायलेकी या."
संध्याकाळी dance चा प्रोग्रॅम उत्तम झाला. दुपारचा lunch, organising secretary होस्ट म्हणून skip झाला होता. प्रोग्रॅमनंतरची पावभाजी व गुलाबजाम घशाखाली उतरत नव्हते. शेवटी ,"ड्रायव्हर राहू दे. मीच तुम्हा दोघींना घरी पोचवतो" म्हणून रात्री ११:३० ला घरी आल्याबरोबर सौ. चा प्रश्नं,
"खिचडी ठेवू की गरम गरम वरण-भात?"
"तुला कसं कळलं?"
"लग्नानंतर १० वर्षांनी बायकोला तिच्याच घरी पोचवण्याचे निमित्तं असले तरी चेहर्यावरची पोटाला नं मिळाल्याची खूण बायकोच ओळखू शकते."
आता कधीही कॉन्फ़रन्स, सेमिनार, परीक्षा आटोपून घरी येताना, सूरतला पोचण्याच्या दोन तास आधी SMS तयार असतो,’लवकरच पोच्तोय. खिचडी/भात तयार ठेवणे’.

"मी असा दर वेळी भात मागतो तुला कसंसच नाही वाटत?"
"दर वेळी त्याच त्याच चुका, वेंधळेपणा, घोटाळा, जेवण्याची डिमांड, ह्यामुळे एका गोष्टीची पक्की खात्री होते, तुम्ही तेच आहात. ’पहेली’ सारखं तुमचं भूत नाही आलं."

"मुलीसमोर चुकून एक कविता पाडली. आनंदाने तिने आपल्या तीर्थरूपांचा पराक्रम जन्मदात्रीला सांगितला, "आई, बाबांच्या हातून एका कवितेचा जन्मं होताना मी पाहिला". ताबडतोब आतून उत्तर आले," विचार तुझ्या बाबांना, बाळंतविडा काय देऊ?"

लग्नं झाल्या झाल्या आमच्या so called smartness व personality चा फ़ुगा एका वाक्याच्या टाचणीने फ़ोडला. "तुमच्याकडे गॅस व मोलकरीण आहे, क्वार्टर तुमच्या आई-वडिलांच्या गावापासून दूर आहे तसेच तुम्हाला काहीच व्यसन नाही म्हणून मी तुम्हाला पसंत केलंय. दिसणं, पगार वा कविता, छंद ही तर नाकारण्यासाठीची कारणं होती."

"आता इतक्या वर्षांनंतर उखाणा घ्यायचा असेल माझ्यासाठी तर कोणता घेशिल?"
"नवरा म्हणून अपेक्षा होती पगार असेल फ़ाकडा,
नशिबी आला माझ्या हेमंत मात्रं कडका"
"तुमचा काय उखाणा?"
"हवी होती मला एक साधी सासुरवाशिण,
स्वातीच्या रूपाने भेटली मला कैदाशिण"
Monday, February 11, 2008

सिनेमाचे दिवस

काहीच जमत नसले की जुने आठवावे. त्यातही जुन्या आठवणी हव्या असतील तर आपण स्वत: पाहीलेले सिनेमे आठवावेत. मन तरल होत. (ट्युलिपचा सल्ला!) डोळ्यांसमोर सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी येतात. रोजचे प्रॉब्लेम्स, तेच ते फ़र्निचर, सिंकमध्ये पडलेली चहाची भांडी, सगळं काही अलगद नाहीसं होत. नाही खरं वाटत? पहाच मग तर!
वयाच्या नवव्या वर्षी पाहीलेला "मेरे मेहबूब". तो लक्षात राहतो तो त्यातील हार्मोनियम,तरल पडदे, काळे बुरखे, जुने rich कलाकुसरीचे फ़र्निचरचे नमुने यामुळे. हो रडतोय की गातोय असा प्रश्न पाडणारा राजेंद्रकुमारही आठवतो. पण त्याहीपेक्षा appeal झालं होतं ते प्रशस्तं घर. घर कसं असावं तर त्यात दोन नायिकांना मोकळेपणाने dance करता आला पाहिजे हे civil engineering च्या planning मध्ये कुठेही नं बसणारे principle पटले होते. "मेरे मेहबूब मे क्या नही" ही फ़ॅंटसी तेव्हाही मनाला सुखावून गेली आणि आत्ताही ! फ़क्तं एक बायको मोठ्या मुश्किलीने मिळते तेथे दोन dance करणार्या तिलोत्तमा कुठून गळ्यात पडणार आहेत, तेही लग्नाआधी, हा विचार तेव्हा कधीच रसभंग करून गेला नाही. तसंच कॉलेज म्हणजे फ़क्तं सुंदर मुलीला धडक मारण्यासाठी, पुस्तके ही खाली पडण्यासाठी, व प्रत्येक बुरख्यातली स्त्री ही साधनाऎतकीच सुंदर असणार ही ठाम पटलेली खात्री बरीच वर्षे (कॉलेजमध्ये स्वत: जाईपर्यंत) मनातून निघाली नव्हती.

हे सर्वं पडद्यावर बघण्यासाठी दीड तास पायी चालत जाणे व सिनेमानंतर तीच पदयात्रा करणे , तेही अकोटच्या forest officer च्या डाकबंगल्यापर्यंत, सोबतच्या दीड डझन नातेवाईकांबरोबर, ह्याचं काहीच विषेश वाटत नव्हतं. तेव्हा सिनेमाची मोहीम सर करणे ही एडमंड हिलरीच्या एव्हरेस्ट मोहीमेईतकीच महत्वाची असायची. थिएटर काबिज करणे, तिकीट मिळविणे, खुर्चीत जागा पकडणे, हे सर्वं एव्हरेस्ट मोहीमेईतकेच thrilling होते. (आता एव्हरेस्ट किती वेळा सर केले ते विचारू नका.)

तसच खरा दोस्त हा नेहमी लंगडा किंवा आंधळा असायला हवा ही समजूत "दोस्ती" सिनेमाने करून दिली होती. त्याला निदान mouth organ तरी वाजवता यायला पाहीजे हेही मनावर घट्टं बसलं होतं. त्यामुळे तेव्हाचे सर्वं मित्रं अचानक साधे वाटायला लागले होते. तिसर्या ईयत्तेतले ते सर्वं मित्रं आज हयात असूनही दुरावलेले आहेत पण खर्या मित्राची ती definition बरेच दिवस मनात पक्की होती.

तसंच त्यावेळेस हॉस्पिटल मधल्या नर्सेस साठी गाणी गाण्याचा compulsory सब्जेक्ट असावा हेही मनात खोलवर रुतले होते. "दोस्ती"तलच गाणं - "गुडिया हमसे रुठी रहोगी, कबतक ना हसोगी, देखो जी किरन की लहर आयी, आई रे आई रे हसी आई" हे त्या सबजेक्टमुळेच टाकलेय असे वाटायचे. शिवाय नंतरच्या "दिल एक मंदिर" मध्ये मीनाकुमारी ह्रुदय पिळवटून टाकणारी गाणी हॉस्पिटल मध्ये गाते, तेही नर्स नसून, त्यामुळे हे तर पक्कंच होतं की पेशंट मरण्याआधी नातेवाईकाने एक तरी गाणे गायलेच पाहीजे. माझा नाही हा तर, "हम तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे है, खो बैठे है. तुम कहते हो के ऎसे प्यारको भूल जाओ" या गाण्याचा दोष आहे.

त्याप्रमाणेच, प्रेम हे लग्नाआधीच होतं आणि जर गाणं गायलं तरच ते establish होतं हे त्यावेळेसच्या ’जिंदगी, जहा आरा,’ सिनेमांमुळेच कळले होते. लग्नानंतर प्रेम नाहीसं होतं हा साक्षात्कार मला तिसरी चवथीतच झाला होता, तेही कोणत्याही बोधीव्रुक्षाखाली नं बसता, हे आठवून मला अजूनही भरून येतं. पण ह्या १००८ हेमंतस्वामीची दखल घेतंय कोण?

जहा आरा हा eastmanclour मधला माझा दुसरा सिनेमा. प्रेम हे प्रेमभंग होण्यासाठीच असतं हे universal truth तेव्हा आम्हा सर्वं सिनेबालवीरांना उमगले होते. त्यामुळे एखादी सुंदर मुलगी दिसली आम्ही नकळत विचार करायचो की हिच्यामुळे आपला प्रेमभंग झाला तर हरकत नाही. प्रेम हे कधीच successful होण्यासाठी नसतं हेही तेव्हा सदासर्वदा जाणवत होतं. त्याला कारणही तसलच होतं. आमचे काका, मामा, आत्या ह्यांची senior मित्र-मैत्रीण मंडळी कितीतरी वेळा ह्यात होरपळून निघालेली पाहिली होती.

आता थोडं वर सरकतो १९६५ सालापुढे. तेव्हा असं वाटणं confirm झालं होतं की असं होऊ शकतं कारण सिनेमात ते दाखवलय. पुढे हे स्वत:च ठरवून मोकळा झालो की आपल्याही आयुष्यात हे होऊ शकतं. मग तर सिनेमा पाहण्याची scheme ह्यावरच ठरवली जायची. ’जीने की राह’ मधला जितेंद्र, ’पहचान’ मधला गरीब बिचारा मनोजकुमार, ’एक तारा बोले’ तुणतुणं वाजवणाराही मनोजकुमारच, समोरच्या ’पडोसन’, सायरा बानू जर गवार ’भोला’ सुनिल दत्तला बायको म्हणून मिळते तर मग आपण काय वाईट आहोत हे सुंदर सत्य आम्हा सर्वं मुलांना एकाच वेळेस कळलं होतं. confidence, confidence म्हणतात तो आम्हाला सुनिल दत्त ने दिला होता हे आम्ही कसं बंर विसरू? हे training फ़क्तं अडीच तासात आम्हाला मिळत होतं

दुसरा महत्वाचा factor म्हणजे त्यावेळेसची mood-elevator रुपी superb गाणी! प्रेमभंग झाल्यावर clarionet असेल आणि शम्मीकपूर सारखे "है दुनिया उसीकी, जमाना उसीका, मोहोब्बतमे जो हो गया हो किसीका" हे pub मध्ये गाता येत नसेल तर तो प्रेमभंगच नाही हे ही समजले होते. जर चुकून यदाकदाचित प्रेम जमलंच, तर बोटीत बसून एक तरी solo किंवा duet गाता आलेच पाहीजे, तेही रात्री बेरात्री अथवा ऊटीच्या तलावात ही theory कायम होतीच. "ओ मेहबूबा" हे संगम मधलं गाणं किंवा an evening in paris मधलं "रातके हमसफ़र थकके घर को चले, झूमती आ रही है सुबह प्यारकी" हे गाणं याचं १२०% प्रूफ़ आहे. हां आता ऊटीचं सोडा, आमच्या तीर्थरूपांची ताकद तेव्हा आम्हाला वर्षातून एकदाच नागपुर ते खामगाव रेल्वेच्या थर्ड क्लासने पाठविण्याची होती हे आपण सोयिस्कररित्या विसरून जाऊ. मग पॅरिसला जाणे, व्हिसा घेणे, त्याआधी पासपोर्ट मिळविणे, हे तेव्हाही जमले नाही आताही जमले नाही ही बिकट वस्तुस्थिती स्वत:वर हसायला लावते. theory perfect पण practicals impossible to attend हा syndrome आजही आहेच!

तेव्हा हेवा वाटायचा तो ज्यांना गाणं गाता यायचं त्यांचा. कारण सोपं आहे. "मिलन" पासून ते"आराधना" पर्यंतं, सुंदर मुली त्यालाच मिळणार ज्याला गाता येतं हे accepted होतं. पाचवीत असताना कमी marks मिळविणारा ’महेश केंकरे’ जेव्हा, "अरे बाबा सोर नही शोर" असं ठणकावून सांगत गाण गायचा तेव्हा तमाम लोकल माधुरी दिक्षित ते old मधुबाला त्याच्याकडे मधाळ नजरेने बघायच्या हे चोरट्या नजरेने आम्ही टिपत होतोच.

सौंदर्याच्या कल्पना सुध्धा तेव्हा वेगळ्या नव्हत्याच! थुलथुलीत मीनाकुमारी, थोराड नंदा आम्हाला slimच वाटायच्यात. गाईड बघितल्यानंतर तर वहीदा रेहमान ही जगातली सर्वात सुंदर स्त्री ह्यावर आम्हा सर्व मित्रांच एक्मत व्हायचच. एरवी आम्हा सर्वांचा democracy वर ठाम विश्वास! देव आनंद हा त्याच्या केसांच्या कोंबड्यामुळे हवाहवासा वाटायचा. जीने की राह मधली तनुजा तिच्याभोवती तेव्हा वलय नसल्यामुळे तेवढी सुंदर वाटायची नाही.

उपवर मुलगी ही निदान नंदाईतकी तरी जाडी असली पाहीजे त्याख्रीज तिचे वडील तिच्यासाठी मुलगे बघायला सुरुवातच करणार नाही ही आमची गोड समजूत होती. बायको कशी असावी? तर ती साधनासारखी कपाळावर झुलफ़े ठेवणारी, नाहीतर शर्लिलासारखी sleeveless घालणारी अथवा सायराबानू सारखी ’अल्लड’ तरी असावी ही आमची किमान अपेक्षा होती.

धरमपेठ कॉलेजमध्ये नाटकात कामाबद्दल बक्षिस घेताना (मी तेव्हा सातवीत होतो), एका कॉलेजकन्यकेने स्लीवलेस घलून ते accept केले व ते देणार्या प्रोफ़ेसरांबरोबर shake hand केला तेव्हा तमाम मंडळीनी ती फ़ारच ’जादा’ आहे असा शेरा मारला तेव्हा स्लीवलेसबद्दलचे माझे मत डागाळले.शेकहॅंड हा फ़क्तं उच्छ्रुंकल मुलीच करतात असे वाटले. त्यानंतर मनोमन मी प्रतिद्न्या केली की यापुढे मी कोणत्याही परक्या मुलीशी शेकहॅंड करणार नाही. हो, माझ्यामुळे कुणा मुलीची बदनामी व्हायला नको!.

पण माझ्या आयुष्यातला पहीला शेकहॅंड ज्या परक्या मुलीशी झाला ती air marshal लतीफ़ ह्य़ांची धर्मपत्नी Mrs. Bilkees Lateef . award winning ceremonyत पहीला आल्याबद्दलचे prize घेताना जो शेकहॅंड केला तोही त्या sleeveless मधल्या हाताबरोबर, तेव्हा माझी शेकहॅंड व स्लीवलेस बद्दलची सर्वं वाईट मते आपोआप गळून पडली होती.

तर ही मीनाकुमारीच्या कापलेल्या व नं दिसणार्या करंगळीपसूनच्या बिलकीस लतीफ़ ह्यांच्या sleeveless पर्यंतची साठा उत्तराची कहणी पाचा उत्तरी सुफ़ळ संपूर्णं!