Saturday, December 23, 2006

एक छोटीशी दुरुस्ती - गॉसिप सूरत स्टाईल - ४

फ़िरोझ खान व संजय आधी मुमताज बरोबर काम कराय्चे (मेला, उपासना एत्यादी). पण लग्नं केले नंतर संजयशी ते झीनत अमानने व त्याचा फ़ायदा उचलला फ़िरोझ खानने "कुर्बानी" मध्ये.

Wednesday, December 20, 2006

ऊखाणे - मॉडर्न - महाभारत, रामायणातले

ऊखाणे सीतेचे,ऊखाणे द्रौपदीचे, रामायणातले, महाभारतातले,
ऊखाणे उर्मिलेचे, ऊखाणॆ सर्वांचे, फ़क्तं आताच्या परिस्थितीतले.

हा उखाणा द्रौपदी प्रत्येकासाठी नाव बदलून दर ७३ दिवसानी घेत असणार.

धर्म, भीम, नकुल, सहदेव छळतात मला पदोपदी,
अर्जुनाचे नाव घेते, त्याचीच फ़क्तं मी द्रौपदी

हा ऊखाणा कैकयीचा.

चाकात बोट घालून लढविला मी रायांचा रथ,
रामायण तिथेच झाले सुरू, म्हणतात कैकयीचे दशरथ.


हा अर्थातच सीतेचा

वन्सं नको, वन्सं नको, जनकापाशी धरला हट्टं,
तीन तीन सासवा बघून, खवळले सीतेचे पित्तं!

एका धोब्याने केली कसली ती चुगली,
धाडले की हो रामाने मला त्या जंगली

कधी नव्हे ती एकच फ़क्तं मागितली हरणाची काचोळी,
रावणाकडल्या बंदीवासाने श्रीरामांनी भरली माझी झोळी

कितीही सेवा करून वाढविला मी श्रीरामांचा मान,
बळकावून नेतो श्रेय तो प्रभुंचा हनुमान!

रामराज्य रामराज्य म्हणतात तेव्हा होतो माझा जळफ़ळाट
जंगलात राहून झेलला मी एका धोब्याचा तळतळाट.

हा वालीच्या (आणि सुग्रीवाच्याही) बायकोचा

दोन भावांच्या भांडणात घालमेल की हो झाली,
वाली गेल्यावर सुग्रीवच झाले माझे वाली.


हा शबरीचा टोमणा (ऊखाणा नव्हे.)

नेहमीच बोरे आंबट, ऎकून घेईन मी बरी,
रामासाठी उष्टावून गोड तेवढी ठेवते शबरी.


हा मंदोदरीचा रावणासाठी

शूर्पणखेच्या कापलेल्या नाकाचा रावण घ्यायला गेले बदला,
सीतेला अशोक्वनात ठेवून म्हणतात मंदोदरीला बदला.


हा असाच, जर जटायूची बायको असती तर!

पुष्पक विमानात बसवून नेले सीतेला वेगे वायू,
नाहक प्राण गमावून बसला मधल्यामधे जटायू.

हा सीतेचाच.
मान न मान मै तेरा मेहमान,
सीतेला हटवून घुसला रामाच्या ह्रुदयात हनुमान.

आपण कोण म्हणून लव-कुश असतील अज्ञ,
घोडा अडवून थांबविला रामाचा अश्वमेध यज्ञ.


ही उर्मिला बरं का.
कोण म्हणतो राजवाड्यात घडत नाही वनवास,
लक्ष्मण गेले रामाबरोबर, उर्मिलेला वाटतं भकास.

गॉसिप सूरत स्टाईल - ४

अशोककुमार हा तसा वादातीत नट. त्याचे नाव कुठे कोणाशी जोडलेले फ़ारसे ऎकिवात नाही. पण याच अशोककुमारने स्वत:च्याच एका interview त सांगितले होते की एकदा त्याच्याच बायकोने नको त्या (अती ) संशयाने आपल्याच नवर्‍‍यावर, म्हणजे अशोककुमारवर, त्याचे निरूपा रॉयबरोबर लफ़डे आहे असा आरोप केला होता आणि तिला समजावता समजावता त्याच्या नाकी नऊ आले होते. अंबानी बंधूंपैकी एकाची बायको, धीरूभाईची सून, टिना, ही एके काळी, आपल्या लाडक्या(?) संजूबाबाची hot flame होती. रॉकीमध्ये तिला जो ब्रेक मिळाला त्याच्याबरोबर तो संजूबाबामुळेच. पुदे तिने राजेश खन्नाबरोबर life मध्ये break मिळताच, संजूचे हार्ट break केले. ती दोघे जेव्हा खंडाळ्याला एकत्र कारमधून जात होती तेव्हा त्यांच्यामागून संजूबाबाच जात होता, मित्रांनी सांगितलेल्या बातमीवर विश्वास नं बसल्यामुळे चेक करायला.टिना-राजेशचा कारमधला प्रणय पाहून, संजूचे डोळे उघडले ते वारंवार मिटण्यासाठीच. टिना व राजेश यांनी प्रेमाची व्याख्या नवीन केली होती. ते दोघे एकच tooth-brush वापरत होते. तुमचे आमचे प्रेम क्षुल्लक! कारण तुम्ही आम्ही वेगवेगळे ब्रश वापरतो.

पुढे राजेश खन्नाला सोडून तिने अंबानी घराण्याशी घरोबा जोडला, तेव्हा राजेश खन्ना म्हणाला होता, अंजू महेंद्रूला मी सोडले, डिंपल व मी समजून वेगळे झालो, पण टिनाने मला सोडले. circle पूर्णं झाले. फ़िरोझ खान व मारिओ मिरांडा हे एकेकाळी मुंबईत रूम-मेट होते. एका लॉजमध्ये. दोघेही तेव्हा खूप मोठे होण्याची स्वप्ने पाहत होते. दोघेही कफ़ल्लक आणि भणंग(संपत्तीने, टॅलंटने नव्हे), . पण दोघेही दुर्दम्य आशावादी! पुढे दोघेही आपापल्या क्षेत्रात topला पोचलेत.हाच फ़िरोझ खान जेव्हा आपल्याच भावाबरोबर, संजय(ऊर्फ़ अब्बास) खान competition मध्ये acting आणि roles करत होता तेव्हा मुमताज त्यांच्यामध्ये common होती. लग्नं तिने संजयशी केले पण फ़ायदा उचलला फ़िरोझ खानने कुर्बानी मध्ये expose करून. विचार करा स्वत:च्या वहिनीला असा कोणी दिर expose करू शकेल का? पण exactly तशीच कानकोंड्यासारखी हकीकत झाली अनिल कपूरची जेव्हा त्याच्या भावाने, बोनीने, श्रीदेवीशी, अनिलच्या गाजलेल्या नायिकेशी लग्नं केले. अनिल कपूर sensitive म्हणून तो असं बोलला की एकाच घरात मी आणि माझी वहिनी राहतोय जिच्याबरोबर मी hot scenes केलेत मला किती embaraassing वाटतं म्हणून सांगू. खरं तर अनिल कपूर हा कपूर आडनावाला शोभा देत नाही. कारण राज कपूरच्या घराण्यात, हे सर्वं common आहे.

गीता बालीने राज कपूरबरोबर जोडी जमवली screen वर (पहा बावरे नैन) पण प्रत्यक्षात ती शम्मीकपूरची बायको झाली. नीतु सिंग ने पदार्पण केले रणधीर कपूरबरोबर(रिक्षावाला सिनेमात), गाजवला screen शशी कपूरबरोबर(दीवार आणि ईतर काही), ऋषीच्या काकाबरोबर. सून झाली ती ऋषीमुळे! बबिता ही याला अपवाद नहती. तिने शम्मी कपूरबरोबर हिट सिनेमे(तुमसे अच्छा कौन है) दिले आणि settle झाली रणधीरबरोबर. ऋषीने त्याच परंपरेत, screen chemistry जमवली पद्मिनी कोल्हापुरेबरोबर(प्रेमरोग,जमाने को तिखाना है), पण तेव्हा ती चिंपू कपूरबरोबर involved होती आणि पुढे कपूर खानदानाची बहू होता होता वाचली. महान दिर-भावजय, आणि काका -पुतणसून परंपरा आपल्याला राज कपूरने दिली आहे याचे भान आहे का कोणाला?

Sunday, December 17, 2006

गॉसिप सूरत स्टाईल - ३

सूरत म्हंटलं की संजीवकुमार आठवतो. सूरतला संजीवकुमार रोड पण आहे एक त्याच्या स्म्रुतीप्रित्यर्थ! पण सूरती लोकांसाठी तो संजीवकुमार नाही तर आपडो हरीभाई (जरीवाला). हाच संजीवकुमार ह्या जगात एकटाच आला आणि एकटाच(लग्नं नं करताच!) गेला. जाताना त्याने ह्या एकटेपणाशी जो सामना दिला तो जरूर appreciate करण्यासारखा आहे. त्यातून त्याचा निरागसपणाच दिसतो. एकट्यातून दुकटं होण्याची एक धडपड दिसते.

फ़ार पूर्वी जेव्हा संजीवकुमार सिनेमाच्या glamorous world मध्ये राहूनही स्वत:ला एकही नटी बायको म्हणून वश का होत नाही हे रडगाणे मित्रांसमोर गात होता तेव्हा एका मित्राने त्याला सल्ला दिला," त्यात काय आहे, उद्या तू एक सुंदरशी आणि महागडी साडी घेऊन ये. त्याला एक चिठ्ठी लाव, जी कोणी सुंदर व्यक्ती ही साडी घेऊन जाईल ती mrs. sanjeevakumar होईल. बस सेटवर हे तू उद्या करच. " झालं. संजीवकुमारने त्याप्रमाणे एक भारीशी साडी चिठ्ठी लावून सेटवर प्रतीक्षा करत बसला. तिकडून सायरा बानू आली, तिने ती साडी पाहीली, उचलली, चिठ्ठी वाचून दूर भिरकवून दिली आणि संजीवकुमारच्या ह्रुदयावरून आपला bulldozer चालवात दुष्टपणे निघून गेली.

एवढ्यातेवढ्यावरून निराश होईल तो संजीवकुमार नव्हताच. पुन्हा त्याने रडगाणे मित्रांसमोर गायले. पुन्हा मित्रांनी सल्ला दिला, "अरे, heroinला जरा प्रेमाने जास्त जवळ घे love scenes च्या वेळेस. तुझे प्रेम जरा तिला जाणवू दे. मग पहा ती तुझ्या गळ्यात पडते की नाही ते. " लगेच आपला संजीवकुमार 'देवी' च्या सेटवर दुसर्या दिवशी नूतनबरोबर काम करताना ते लक्षात ठेवून वागला. काय आश्चर्य? नूतनने लगेच संजीवकुमारच्या श्रीमुखात भडकावली व त्याच्याबरोबर पुढे काम नं करण्याची शपथही घेतली.

अशी कितीतरी encounters सहन करत करत जेव्हा संजीवकुमार ह्या नावाला वलय लाभले तेव्हा परिस्थिती बदलली. सुलक्षणा पंडित संजीवकुमारला त्याच्या घरच्या पार्ट्यांमध्ये हवं नको ते बघायची. त्याच्याबरोबर आयुष्यभर राहण्याची तिची तयरी होती. पण हाय रे दैवा! येथे संजीवकुमारची आई आडवी आली असे म्हणतात. तिला सुलक्षणा सून म्हणून नापसंत होती. सुलक्षणाचे हे दुसरे अपयश! आधी ती किशोरकुमारच्या orchestraa बरोबर रहायची. त्यांचा 'झिम ना झिम झिम झिम नाला' ह्या गाण्यावर अख्खी vrce annual gathering मध्ये डोलत होती १९६८ मध्ये त्यात माझ्या काकांच्या क्रुपेने मी पण होतो. दोन दिवस आम्ही त्याच गाण्यावर तरंगत होतो.

त्यानंतर आली संजीवकुमारच्या आयुष्यात नीता मेहता. कर्ज आठवतो? त्यात तीच त्याची बायको होती. पण तिला डोळ्यांचा solid problem झाला आणि तिला screen पुरतंच त्याची बायको होण्यावर समाधान मानावं लागलं. हाच संजीवकुमार त्याच्या मित्रांमुळे शेवटी गेला. त्याची byepass झाल्यावर मित्रांनी त्याला ओली पार्टी द्यायला लावली. लगेच ईंद्रदेवालाही त्याची स्टाईल आवडली अन त्याने संजीवकुमारला सोमरस प्यायला वर बोलावून घेतले दुसर्या दिवशी! आमच्या भाषेत संजीवकुमार सदेह सबाटली वैकुंठाला गेला.

हे सर्वं खरंही(?) असलं तरी संजीवकुमार हा आजही लाडका आहे actors चा actor म्हणून! परिचय मधला बाप, मौसम मधला बाप आणि ऍक्टिंमधलाही बापच!

Sunday, December 10, 2006

बाबांचा अभ्यास?

स्थळ : सूरत, वेळ : संध्याकाळची, ग्रूप : वात्सल्य, बडबडीचा मुद्दा : लहान मुलांचे problems.

दोन तास मुलांचे problems समजून घ्यावे कसे एक पालक म्हणून हे डोक्यावर hammer झाल्यामुळे, मी आम्च्या सिद्धिबरोबर (वय वर्षे सहा) बोलायला सुरूवात केली. आणि अहो आश्चर्यम! मला माझ्या कामाबद्दल एक वेगळाच view मिळाला.

मी: लहान मुलांना किती प्रॉब्लेमस असतात. रोज सकाळी उठायचं. अन कित्ती कामं असतात. ब्रश करायचं. अंघॊळ करायची. मग शाळेचा uniform घालायचा. लंच बॉक्स घ्यायचा. दप्तर घ्यायचे. पाण्याची bottle घ्याअयची. home work झाले की नाही चेक करायचे. रिक्षामध्ये बसायचे. दहा बारा मुलांबरोबर दाटीवाटीने बसायचे.

सिद्धी : हो नं! आणि तुम्हा मोठ्या माणसांना काहीच काम नसतं. सकाळी उठता. आयता चहा पिता. आईने बनविलेला नाश्ता खाता. ऎटीत स्वत:च्या कारमध्ये बसून कामाला जाता. संध्याकाळी घरी येताच म्हणता , "थकलो. काहीतरी खायला दे. " बरं काही मेहनतीच tension च काम तर काही करत नाही. बसून तर असता टेबल- खुर्चीवर.

मी : आणि माझा अभ्यास! तो कसा असतो?

सिद्धी : तुमचा काही अभ्यास असतो का? एवढी घरात पुस्तके आहेत. जाडी जाडी. तुम्ही काय कोणतंही पुस्तक कधीही घेता. त्यातील कोणतंही पान काढता. मी बघते, तुम्ही एका तासात दोन पाने फ़ार तर वाचता नाहीतर दोन तासात दीड पाने लिहीता. हा काय अभ्यास आहे?

मी : मग कसा असतो अभ्यास?

सिद्धी : अभ्यास म्हणजे नीट होम वर्क दिलेलं असतं. प्रत्येक सबजेक्टच एक पुस्तक असतं. एक वही असते. त्यात सगळी प्रश्नोत्तरे लिहायची असतात. दोन तासात वीस वीस पाने लिहावी लागतात. तेव्हा कुठे अभ्यास होतो.

मी : मग मी येऊ का तुझ्या शाळॆत? अभ्यास शिकायला?

सिद्धी : काही नको. तुम्हाला गुजराथीत लिहीता येत नाही. नापास तरी व्हाल जुजराथीत नाहीतर माझ्या पेपरमधून कॉपी करताना पकडले जाल तर माझे नाक कापल्या जाईल. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्येच बरे आहात.

दिनचर्यानिष्ठांची मांदियाळी

नंदनने Tag केले होते "पुस्तकनिष्ठांची मांदियाळी"!. मी सुचवतोय "दिनचर्यानिष्ठांची मांदियाळी". तुमच्या दररोजच्या आयुष्यातला एक typical दिवस कसा गेला. ट्युलिपला यात supreme judge करावे लागेल कारण तिच्या ब्लॉग वरील articles मुळेच हा विषय सुचला.
सकाळी ६चा गजर कानात शिरतो तेव्हा आपल्याला फ़क्तं कानच आहेत हे जाणवतं. बाकी शरीराचे अवयव हे युध्धात जायबंदी झालेल्या सैनिकाच्या स्वरूपात इकडेतिकडे विखुरलेले असतात. हळुहळू मेंदू कार्यरत होतो. हात पाय पाठ पोट सर्वं काही आपापल्या ठिकाणी रात्री जसे होते तसे आहेत याची अंधुकशी कल्पना येते. पण चहा ही एकमेव गोष्टं सर्वं आळसावर मात करायला लावते. जे काम मेंदू करू शकत नाही ते एक चहाच करू शकतो. (तिरडीवर ठेवलेल्या माझ्या कलेवराला जर एक कप चहा देतो म्हंटलं तर हा तिरडीवर उठून बसेल - माझ्या जवळच्या मित्रांची comment).
आपण आपल्याच घरात आहोत या जाणिवेने मन आळसावते आणि झोपेत चालाल्यासारखा एक human robot चहाचे सोपस्कार सुरू करतो. ओठात अडकवलेला tooth-brush, हातात चहाचे भांडे, दुसर्या हाताने गॅसला व स्वत:ला ठिणगी देण्याचे पुण्यकर्म ह्या सोपस्कारातून जेव्हा हळूच red lable चा खुमार नाकात दरवळतो तेव्हा tooth-brush जोरजोरात चालतो. ब्रश करून येईस्तोवर, दूध वरती येवू पहातं त्याला उचलून त्याच्याखालचा जाळ थोपवितो.
एक बंपर कप भरून चहा, जवळच्या बेकरीचे खारी टोस्ट, दरवाज्यात अडकवलेला पेपर सफ़ाईने काढून टेबलावर. ट्युबलाईट , पंखा हे केव्हा ऑन केलेत ते यांत्रिक माणसाला कळत नाही. पेपर वाचल्यानंतर, सत्यम शिवम सुन्दरम! (राज कपूरचा सत्यम शिवम सुंदरम पाहिल्यानंतर shit, shave, shower ह्याऎवजी सत्यम शिवम सुंदरम हीच terminology वापरतोय. nature's call हे सत्य, दाढी हे शिवम व अंघोळ हे सुंदरम!) लगेच तयार होवून अडीच किलोमीटरवर असलेल्या officers' gymkhana त दाखल होतो. थंडीतही पोहोण्याची सवय फ़ार चांगली. अख्या क्लबमध्ये मी एकटाच swimming करणारा हिवाळ्यातसुध्धा! पण त्यामुळे हा swimming pool माझा एकट्याचा असल्यासारखा. (मला आता परदेशात जायची गरज नाही. कारण तेथेही काय करणार तर मोठे घर घेवून त्यात एक स्वत:चा swimming pool बांधणार. मग हे काय वाईट आहे?)
stereoवर गाणी ऎकत रोजचा पल्ला गाठला की वर येवून, तापीच्या विशाल पात्राचे दर्शन डोळॆ भरून घेतो. क्लब तापीच्या किनार्यावर. सकाळच्या अंधूक, misty वातावरणात, अलगद नागमोडी वळण घेणारी तापी फ़ार सुंदर दिसते. जवळच्या पुलावर अजून क्लासला जाणार्यांची व सकाळचा व्यायाम आटोपून जाणार्यांची दरवळ असते.
तयार होवून परत जाताना रात्री तपासलेल्या उत्तरपत्रिकांमधील मासलेवाईक उत्तरांची आठवण गालातल्या गालात हसवून जाते. परीक्षा देताना जास्तं चांगलं होतं. परीक्षा दिली आणि उंडारायला मोकळॆ. आता नाण्याची दुसरी बाजू कळते. ती जास्तं दु:खदायक असते. 'आपुललीच प्रतिमा होते आपुलीच वैरि' प्रमाणे विद्यार्थी theoretical प्रश्नात भलतेच काही तरी लिहीतात. माझा मित्र म्हणतो त्याप्रमाणे, "तू जसं तुला पाहीजे ते विचारतोस, तसे त्यांनाही जे हवे ते लिहीण्याचे स्वातंत्र्य आहे" . कोणत्याही structure मध्ये अमुक एका गोष्टीचे महत्व विचारले की, " It is very impotant to have this in the design. As design is based on this, it is rquired to have this. However, without this, design cannot be achieved. .... Finally, it must be said that this has to be in the design" . डोक्याचं नाव कपाळ!, माठात भरलं नाही पाणी, बाप म्हणतो खोदेल सोन्याच्या खाणी! संपूर्ण पेपर तपासण्याच्या कटकटीतला हाच तो तेवढा हसवणारा प्रकार जो खरं तर black humour ह्या प्रकारात मोडतो. कारण मीच करता आणि करविता, पण शरण तुला भगवंता!
साडेनऊ वाजता डिपार्टमेंटमध्ये पाऊल टाकताच, टेबलवर, दुपारच्या मीटिंगचा फ़तवा पडलेला असतो. साडेदहाचे lecture . प्युनला सेमिनार रूम उघडून ठेवायला सांगतो. लेक्चर ची कवच कुंडले (खडू- मस्टर, वगैरे), तयार ठेवून, एक कप चहा ढोसून, दिवसाची सुरूवात होते , साहित्यीक भाषेत, मेंढरे हाकायला. आमच्या professionची "लाल" करायची तर साक्षात भगवान मुरलीधर आमचा पहीला मेंढपाळ!. फ़क्तं बासरीऎवजी खडू आणि गाण्यांऎवजी रूक्ष गद्य आवाज(ज्याला नरडे म्हणतात). वर्गात नेहमीप्रमाणेच. फ़क्तं कोणी मुलाने difficulty विचारली तर सर्वांचे चेहरे त्रासिक. काय हा वेळ खातोय. पण तेच जर ती डिफ़िकल्टी एका सुबक ठेंगणीने विचारली असेल तर सगळा क्लास खडबडून जागा होतो व त्या थोर मुलीकडे एकटक बघतो. मी जरा उत्तर जास्तच elaborate करावे हे त्यांच्या डोळ्यात स्पष्टं दिसतं.
लेक्चर आटोपून परतताना निरोप येतो, post-graduate in-chargeचा, आज सेमिनार आहे. आल्या पावली सेमिनाररूमम्ध्ये स्थानापन्नं! वातावरण गंभीर. थोडीशी कुजबूज. आमच्या चेहेर्य़ांवरून आम्हा परीक्षकांच्या मूडचा अंदाज घेण्याचा जमलेल्या विद्यार्थ्यांचा एक केविलवाणा प्रयत्न. बाहेर दोन प्युन दिमतीला हजर. एक योग्य(? प्र्श्नोत्तरांच्या) वेळेला चहा द्यायला. दूसरा काही हवं नको बघायला.
पहीला विद्यार्थी सुरू करतो. दहा ऎवजी वीस मिनिटे घेतो. डोकं चढून जातं. कारण रिपोर्टमध्ये references, alphabetically आणि पाहीजे त्या formatमध्ये नसतात. conclusion च्या नावाने आनंद असतो. English construction आणि grammar ह्यांचा केव्हाच घटस्फ़ोट झालेला असतो. दोन चार प्र्श्नं विचारून त्याची गच्छंती करतो. दुसरा येतो. तो राम तर हा लक्ष्मण. मागे एक सीता ऊभीच असते आणि हनुमान तर कित्येक. कारण प्रत्येकालाच ह्या अग्निपरीक्षेतून जायचेय. पण आम्हाला तर हे सेमिनार ऎकून धरणी आम्हाला पोटात घेईल तर बरं असं वाटतं.
एव्हाना पोटात कावळे कोकलायला लागतात. दोन चार महत्वाची circulars, कागद sign करून कार स्टार्ट होते तेवढ्यात दुपारचे १.३० झालेले घड्याळ दाखवतं. रेडिऒ सुरू होतो आणि आवडते गीत सुरू होतं,"तुम्हारा चाहनेवला खुदाकी दुनियामे"
घरी सौ.नी चिठ्ठी ठेवली असते त्याप्रमाणे, भाजी गरम करून, केळ्याचे शिक्रण बनवून, जेवायला सुरूवात होते. सोबत दिवाळी अंक. सानियाचे जपानमधील फ़ुलांचे वर्णन सुगंधाशिवाय सर्वं काही transfer करून सोडतं मनात. १५ मिनिटांची एक डुलकी घेऊन परत कॉलेजच्या वाटेवर. सदाबहार गीते प्रोग्रॅम चालू असतो रेडिओवर.
मीटिंग सुरू होताच जेवणाची व गाण्याची नशा उतरली असते. एक official, ruthless गेम सुरू झाला असतो. मीटिंग अमक्याने बोलावलीय म्हणजे प्रॉब्लेम हाच असणार. मीटिंगच्या आधीच agenda चे सूतोवाच होतं. सगळ्यांनी आपापल्या positions कित्येक वर्षांपासून घेतलेल्याच असतात. कोण कोणाचा चमचा आहे, कुणाचा स्वार्थ कुठे दडला आहे हे open secret असतं. तरीही हा गेम खेळायचा असतो. त्यात जर खरोखर students चे भले झाले तर थोडा दिलासा!.
मिटिंग संपते. प्रत्येकजण आपापली हत्यारे, तलवार, सुरा, पिस्तोल, म्यान करतात.(जो साधा protest करतो तो सुरा, जो दुसर्याचे म्हणणे हाणून पाडतो तो तलवार वाला, व मीटिंगचा चेअरमन हा पिस्तोलवाला. सर्वांना silent करण्याचे काम त्याचे!.

पाच वाजता खरं academic काम सुरू होतं. दुसर्या दिवशीचे lectures काय, books काढून ठेवणे, transparencies एकदा डोळ्यांखालून घालणे. इतर colleaguesना intercom वरून सूचना देणे. आता हुश्शं म्हणणार तेव्ढ्यात m.Tech. आणि research चे विद्यार्थी गळ टाकून बसले असतात त्यांच्या गळाला मी लागतो. त्यांच्याशी discuss करता करता सात सहज वाजतात. अचानक मोबाईल वाजतो. ": कुठे आहात? घरी केव्हा येणार? " फ़ोनवर सौ.ना तटवून ३० मिनिटांनी स्वारी घरी दाखल जालेली असते. सिध्धी नेहमीप्रमाणे,' बाबा , आज काय गम्मत झाली कॉलेजमध्ये ते सांगा.' त्यावर एक जुनी आठवलेली गंमत तयार करून बसतो.
आज बसलोय मराठीब्लॉगसमोर नसलेली गंमत असलेली करून दाखवण्यात!

आता tag करतोय मी randomly यांना

नंदन
ट्युलिप
गायत्री
सुमेधा

गॉसिप सूरत स्टाईल - २

हमसाया सिनेमा त्यातील गाण्यांमुळे आणि ओ.पी च्या music मुळे गाजला तितकाच माला सिन्हा आणि शर्मिला टागोरच्या कचकचीत भांडणामुळे पण गाजला होता. नंतर तीच भांडणाची परंपरा शर्मिलाने चालू ठेवली "दाग" पर्यंत. राखी तेव्हा नवीन होती. तिला शर्मिला व राजेश खन्नाने नवशिकी म्हणून भरपूर छळून घेतले. पण दैवाने तिच्याशी अजून एक विषारी खेळी खेळायची बाकी होती.
गुलज़ारशी लग्नं केल्यानंतर तिची ओळख, शेवाळी हिरव्या डोळ्यांची, समरसून acting करणारी नटी अधिक, गुलझारची बायको अशीही झाली. पण त्या गुलझारने स्वत:च्या सिनेमात तिच्याऎवजी शर्मिलाला घेतले आणि त्यांच्यात एक ठिणगी पडली. मौसम मुळे बोस्कियाना(गुलझारच्या घराचे नाव) तला बहराचा मौसम गेला असे म्हणतात. शर्मिलाचा जय झाला. राखीमधली नटी अत्रुप्तच राहीली.
याच शर्मिलाचा जेव्हा सगळी कडे जयजयकार चालू होता तेव्हा राज कपूर "मेरा नाम जोकर" साठी तिचे नावही घ्यायला तयार नव्हता. कारण सरळच होतं. राज कपूरच्याच शब्दात सांगायचं तर, शम्मी कपूर तेव्हा शर्मिलाबरोबर लग्नं करायचे की नाही या विचारात होता. जर त्याने खरोखरच लग्नं केले तर"कपूर खानदानातली बहू" बिकिनीत कशी दाखवणार? पण हाच प्रश्न त्याला क्रमाक्रमाने मुमताज व सायरा बानू बद्दलही पडला पुन्हा शम्मी कपूरमुळेच! शेवटी त्याने लग्नं केले ते नीलादेवीशी हे तर सर्वश्रुतच आहे. या सगळ्या भानगडीत आपल्याला जोकर मध्ये "त्सॅना रॅबिन्किना " आवडून गेली. "जुदा नही होंगे तो मिलेंगे कैसे" ह्या ओळी अजूनही ह्रुदयात घर करून आहेत.
राज कपूरला एकदा एका पत्रकाराने खंवचटपणे विचारले होते," तुम्ही तुमच्या प्रत्येक नटीशी लफ़डं का करता?" राज कपूरचे उत्तर फ़ार मासलेवाईक होते," इतरही producer लफ़डी करतात, पण ते माझ्याइतके हीटस देत नाहीत आणि माझा सिनेमा हीट नाही झाला तरी लोकांना वेड लावून जातो. जागते रहो, बूट पॉलीश बघतच राहतात. राज कपूरचे नुकतेच लग्न झाले होते त्यानंतर क्रिश्ना कपूरला घरी आल्या आल्या छोट्या शशी कपूरने तिला विचारले, "तुम यहा क्यू आयी हो? अपने घर क्यों नही जाती?" क्रिश्ना कपूरने एका interview त सांगितले होते की मी तेव्हाच छोट्या शशीचा हा सल्ला ऎकला असता आणि माहेरी परत गेली असती तर बरं झालं असतं. राज कपूरबद्दल एवढं पुरेसं आहे. त्याने इतरांना कायम हसू दिलेत पण क्रिश्नाला कायम आसू दिलेत. हसू आणि आसू राजच्या वैयक्तिक जीवनातही त्याची पाठ सोडायला तयार नव्हते.

Monday, November 20, 2006

जोडगाणी

जोडगाणी!
उन्हाळ्यात रात्री फ़िरताना दिवस सुरू व्हायचा. सहज मैल दोन मैल चालणे व्हायचे. गप्पागप्पात विषयही कुठून कुठे भरकटत जायचे. तेवढ्यात एक लकेर सुरावटीसह कानावर येऊन आदळायची. "ना तुम हमे जानो, ना हम तुम्हे जाने, मगर लगता है कुछ ऎसा, मेरा हमदम मिल गया". हेमंतकुमारचा धीरगंभीर आवाज काळजाला छेद देऊन जायचा. त्याचा अवाज विरतो न विरतो तोच, सुमन कल्याणपूर तिच्या मधाळ आवाजात तेच आवाहन पुन्हा करायची. लाटेवर स्वार होवून डुंबायला हवे काय अजून? त्या गाण्याची गोडी संपते न संपते तोच, मुकेश त्याच्या अनुनासिक स्वरात, " रात और दिन दिया जले, मेरे मनमे फ़िरभी अंधियारा है, जाने कहा है वो साथी, तू जो मिले जीवन उजियारा है" आमचे ह्रुदय पिळवटून टाकायचा. त्याचे दु:ख कमी होते की काय असे वाटायला लावणारा स्वर पाठोपाठ यायचा लताचा, तेच सूर घेवून, पण काळजाला ऊभा छेद देवून.
एकाच गीताच्या दोन बाजू फ़ार हुरहूर लवून जातात. त्याच पठडितले हे पहा,"ऎ दिल कहा तेरी मंझिल, ना कोइ दिपक है, ना कोइ तारा, गुम है जमी, गुम आसमा, ऎ दिल कहा तेरी मंझिल!"
यातून वर येतो न येतो तोच "तुम मुझे यू भूला न पाओगे, जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे" वेड लावतं. तीच मजा, " चंदनसा बदन, चंचल चितवन" दोन वेगवेगळ्या आवाजात ऎकताना येते. तोच मुकेश, तीच लता किंवा आशा अथवा सुमन असो, "tandem" उर्फ़ "जोडगाणी" ऎकताना एक वेगळीच नशा चढवून जातात.
पुरूष आणि स्त्री आवाजात तर जोडगाणि आहेतच, पण पुरूष आणि पुरूष ह्यांचीही जोडगाणी आहेत. त्यातले खास गाजलेले म्हणजे, "तुम बिन जाऊ कहा" हे रफ़ी आणि किशोर दोघांनीही समरसून गायलेले. पण तेव्हा यॉडलिंगचा जमाना होता आणि किशोरची नशा होती. बाजी किशोरच मारून गेला यात संशयच नव्हता. रफ़ीचे चाहतेसुध्धा हे तेव्हा कबूल करत होते. त्याहून वेगळे म्हणजे जिवाला चटका लावणारे, अमिताभ आणि लताचे, "नीला आसमा सो गया". सभोवतालचा धूसर निळा परीसर, आठवणीने आर्त झालेले डोळे, बोलका चेहरा, वियोग personified, असे हे चित्र, प्रेमभंगाला पण एका ऊच्च पातळीवर नेऊन ठवतं. नव्हे, आपला पण असा एक तरी प्रेमभंग झाला पाहीजे, ही ईच्छा उफ़ाळून वर येते. किती नशिबवान हे प्रेमभंगाने पोळलेले लोक हेच प्रकर्षाने जाणवते.
"परदेसियोंसे ना अखिया मिलाना", "वादिया मेरा दामन, रासते मेरी बाहे, जाओगे फ़िर कहा, तुम मुझे पाओगे", " जिया हो जिया हो जिया हो कुछ बोल दो", किंवा, "सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था", "जब जब बहार आयी, और फ़ूल मुस्कुराये, मुझे तुम याद आये", "एहसान तेरा होगा मुझपर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहोबत हो गयी है मुझे, पलकोंकी छांवमे रहने दो"
ही यादी थांबणारच नाही. एक ह्रुदय कमी पडत होते की काय म्हणून एकाच्वेळेस एका ह्रुदयात दोन जीवांची आग लवून जातात ही गाणी.

Thursday, November 09, 2006

गॉसिप - सूरत स्टाईल

तुमच्या वेळेस गॉसिपींग कसं काय चालायचं.
कसं काय म्हणजे? धूम चालायचं.
दाखवा
कि मग एक झलक.
एक कशाला, भरपूर देइन. पण म्हणतात ना, नदीच मूळ, ऋषीचं कूळ, तसंच, नटीचं खूळ शोधू नये.
सुरूवात करो या, अमिताभपासून. हा जो पहिल्यांदा जयाला एका पार्टीत भेटला तेव्हा याची girl-friend होती, तेव्हाची ५ फ़ूट ७ ईंच स्लीम शीला जोन्स! जया तेव्हा नुकतीच, फ़िल्म FTII च्या भास्कर चौधरीला (तिचा instructor) प्रेमाचं नाटक करून, चकवून आली होती.
FTII वरून आठवलं, शबाना तेव्हा FTII च्याच class-mate बेंजामिन गिलानीबरोबरची engagement तोडून अंकुर साईन करायला शिकली होती. शबाना आली तर मागून स्मिता पाटीलही येणारच. तमाम IIT च्या जनतेबरोबर, गौतम राजाध्यक्ष्सुध्धा सामिल होता. मराठी येत नसतानासुध्धा IITतली जनता तेव्हा मुंबई दूरदर्शेनवरील मराठी बातम्या "बघायची".
अमिताभने एका सिनेमात व्हीलनचा रोल केला होता परवाना त्यात हीरो होता "नवीन निश्चल". दुसऱ्यात हीरो होता जीतेंद्र. याच जीतेंद्रने शोभा सिप्पीबरोबर steady असताना हेमा मालिनी बरोबर लग्नं करण्याचा घाट घातला होता. तो लगेच शोभाने धर्मेंद्रची मदत घेवून हाणून पाडला. धर्मेंद्र त्याआधी लीना चंदावरकर बरोबर गळाडूब प्रेमात होता, तर हेमा संजीववर फ़िदा होती. पण हेमाच्या आईने संजीवकुमारला डांसरबरोबर पकडल्याने, तो हेमाच्या मनातून उतरला.
शबाना कमर्शियल सिनेमात येण्यासाठी शशी कपूरबरोबर प्रेमाचे नाटक खेळतेय हे कळल्यावर, जेनीफ़रने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ईकडे रेखाने एकामागोमाग एक बॅचलर पळ्वायला सुरूवात केली होती, विनोद मेहरा, किरणकुमार, वगैरे वगैरे. तर, श्रीदेवीने मध्येच मिथुनबरोबर चोरटे लग्नं करून नंतर ते मोडले पण. मिथुन ममता शंकर बरोबर लग्न करता करता राहिला. पण त्याने हेलेना बरोबर लग्न करून मोडले त्यानंतर. ईकडे मजहर खानने नंदिनी सेन बरोबर लग्न करून पुन्हा मोकळा झाला. पुढे त्याच मजहरने झीनत अमान बरोबर लग्न केले त्याआधी तिने संजय खान बरोबर चोरून लग्न केले होते. संजय खान म्हणजे रितीकचा सासरा.
हीच झीनत एकदा राजेश खन्नाबरोबर खोट्या प्रेमाच्या शपथा घेताना डिंपलने ऎकले होते. तीच डिंपल, जी एके काळी महाराष्त्राच्या मुख्यमंत्र्याच्या मुलाबरोबर dating करत होती, तर राजेश अंजू महेंद्रू बरोबर रहात होता. तीच अंजू जी वेस्ट ईंडिजच्या सोबर्सवर भाळली होती.
जावू दे. सध्ध्या पहीला अध्याय येथेच समाप्तं करतोय.

Sunday, September 24, 2006

कसं असतं आजारपण?

(नसलेल्या) डोक्याची जड होण्याची जाणीव. सूर्याने डोळ्यांची जागा घेतली की काय असे वाटायला लावणारा दाह, हातापायांचे अस्तित्व हे कामचुकार मुलांसारखे. लाड करून घ्यायला तयार, पण काम सांगितले की स्वत:ला पुढे उचलायला संपूर्ण नकार. हळुहळू चहाचा घोट व (गरम) पाण्याचा घोट सारखाच वाटतो. स्वयंपाकाचा सुगंध आसमंतात दरवळूनही पोटावर त्याचा परिणाम होत नाही.
अचानक vibrating table सारखे शरीर उडायला लागते. आत नीट ठेवलेली blankets घाइघाईने काढल्या जातात ती शरीराबरोबर थाडथाड उडण्यासाठी. हळुहळू हिही थरथर नाहिशी होते वादळापूर्वीच्या शांततेसारखी. लवकरच कान हे स्वत:चे नसून किटलीचे आहेत हे जाणवायला लागते त्यातून निघणार्या वाफ़ांमुळे. अंगाची भट्टी पेटायला लागते. थर्मामिटरशी दोस्ती होते आणि ती वाढतच जाते. डॉक्टरशी जवळचे नाते निर्माण होतं. हॉस्पिटल व पलंग आपले वाटायला लागतात. अन्नावरची वासना उडताच सर्वं प्रकारचे पदार्थ सेवेशी हजर होतात. पण कडू गोळी, capsules, व ईंजेक्शन हेच काय ते खरे साथीदार बनतात. ceilingकडे बघणे, पंख्याशी संवाद मनातून करणे, हे नित्याचे छंद होतात. घड्याळ फ़ार हळू चालतय असं वाटतं. stereo चे सूर बेसूर होतात, ग्लानी आणि झोप, खाणे आणि गिळणे, बघणे आणि डोळे उघडॆ ठेवणे, यातील फ़रक नाहीसा होतो.
आणि अचानक कायापालट होतो. दरदरून घामाची अंघोळ होते. शब्दं फ़ुटतात ओठातून व कधी एकदा अंघोळ करून हे आजारपणाचे सुतक काढून टाकतो असे होते. बरं वाटल्यानंतर , मला बरं वाटत नव्हतं, ह्यामुळे बरं नं वाटायची काहीच गरज उरत नाही.


हेमंत_सूरत

Tuesday, September 19, 2006

सूरती फ़रसाण - ४

हा माझा आणि सौ. चा एक संवाद.
"आपल्याला सूरतला येऊन इतकी वर्षे झालीत, पण आपण काही बाबतीत अजिबात सूरती झालो नाही."
सौ.चा प्रश्न,"नक्की कोणत्या बाबतीत म्हणताय?"
"फ़ाफ़डा, खाकरा, लोचो, गोटा, सेव-टामेटानी शाग हे सर्व आपल्याला कधी बोलावताहेत असे वाटलेच नाही. अजूनही कांदे-पोहे, शिरा, उपमा ह्याचीच इच्छा होते."
"तुम्ही चान्स असूनही गुजराती मुलीशी लग्नं केलं नाही, तेही सूरतमध्ये राहून, त्याचा शाप तुम्हाला लागतोय."
"म्हणजे काय? मी नाही समजलो."
"माझ्याशी लग्नं करण्याआधी चक्कं आठ वर्षं तुम्ही सूरतच्या मोहजाळात होतात, तरीही माझ्यासारख्या मराठी मुलीशीच तेही arranged marriage करण्याचा आग्रहं तुम्ही धरलात तर तुम्हाला कशी ह्या गुजराती फ़रसाणाची गोडी लागेल?"
" हो, माझे colleagues म्हणत होते गंमतीने, कर की एखाद्या गुजराती मुलीशी लग्नं. त्याच वेळेस सचिन गुजराती अंजली मेह्ताच्या प्रेमात पडून लग्नं करून बसला होता."
"तेच कशाला, त्याहीपूर्वी, अनूप झलोटा सोनालीच्या प्रेमात पडून नंतर मोकळा पण झाला होता रूपकुंवर राठोडला line clear देऊन."
"मग माझे काय झाले असते जर मी एखाद्या "पटेल" मुलीशी लग्नं केले असते तर?"
" काही विशेष नाही. तिने मजबूत बांध्याची असल्याने मोलकरीण घरात अजिबात ठेवली नसती. सर्वं कामं स्वत:च केली असती. सकाळी ५ला उठून पाणी भरून अंघोळ करून कपडे धुऊन ६ वाजेपर्यंत बाहेर गॅलरीत वाळायला पण टाकले असते. आणि जर तुम्ही तोपर्यंत उठला नसता तर तुम्हालाही पिळून दांडीवर वाळत टाकले असते."
"बाप रे!" मी विव्हळलो.
"हे तर काहीच नाही. आता कसे तुम्ही एकाच मुलीवर थांबला आहात. तिने नसते सोडले तुम्हाला जोपर्यंत एक तरी मुलगा होईपर्यंत. मग भलेही त्याआधी चार मुली झाल्या असत्या. माहीती आहे नं, पटेल बाया काय म्हणतात ते - बाबो एक तो जोइएज (मुलगा एक तरी हवाच).
" मग त्या चार मुलींचा हुंडा मी कुठून दिला असता?"
"त्यासाठी तिने तुम्हाला इच्छा नसतानाही tuition किंवाconsultancy जबरदस्तीने करायला लावली असतीच."
"नको रे बाबा पटलाणीची मुलगी"
"पण एक फ़ायदा असता अजून."
"कोणता?"
"तुम्ही घरी नसताना दिवसा- रात्री चोर कधीच तुमच्या घरी येऊ शकला नसता. अहमदाबादला नाही का तुम्ही बघितले तुमच्या मित्राकडे, अख्ख्या पटेल वाडीत दरवाजे सताड उघडे असतात. आहे कोणा चोराची पटलाणीच्या हातचा मार खऊन मरायची?"
मला अजून जरा चिडवायची लहर आली.
"मग देसाइ मुलीशी केले असते लग्नं तर?"
" वा! मग काय तुम्हाला एकडची काडी तिकडे करावी लागली नसती. दोन वेळा हातात भरलेलं ताट घेऊन आली असती रोज तुमच्यापुढे. तीही घरात असूनसुध्धा नटून."
"मग तर फ़ारच छान."
"घी देखा लेकिन बडगा नही देखा बच्चमजी. देसाई मुलगी बरी सोडेल अशीतशी. "
"काय केलं असतं तिने?"
"निदान दर वर्षी पाच तोळे सोनं, दहा हजाराची gift द्यायला लावली असती. शिवाय जमीनीसाठी हट्टं धरला असता. घरात तिचे पूर्णं वर्चस्वं. ती पंतप्रधान, तुम्ही प्रेसिडेंट. मोरारजी देसाई काही उगीच prime minister नव्हते. तेच पाणी देसाई मुलींमध्ये आहे. "
" हे थोडंफ़ार नागर मुलींकडे जातय."
"ते मी सांगतच होते. देसाई मुलीपेक्षा नागर जास्तं dominating. मोजकंच करेल, काही उरू देणार नाही, प्रत्येक बाबतीत तिची परवानगी घ्यावी लगेल. येणार्या-जाणार्यावर लक्षं ठेवून राहील. वर चिक्कूपणाचा अर्कं!"
"मग तुम्हा कोब्रांसारखीच.(सौ. माहेरची कोब्रा)"
" हां. पण आम्ही वचावचा नाही बोलत त्यांच्यासारखे. आणि भांडवल नाही करत आमच्या सौंदर्याचे."सौ.च्या शेपटीवर पाय देताच तिने फ़णा काढला. आता जरा सावरून घ्यायला हवं. तेव्हा विचारले-
"घांची मुलीचं काय?"
एकदम हसता हसता तिने ठसका दिला आणि बोलली,"तुमच्या वडिलांना चालेल का सुनेबरोबर दारू प्यायला?"
"काय?" आता आशचर्य करण्याची पाळी माझी होती.
" घांची , खत्री ह्या एकदम धूप्पं गोर्या. skin एकदम चांदीची. पण brain power कमी. सासू-सासर्यांबरोबर दवा-पाणी किंवा रम-पाणी हे नेहमीचेच. शिवाय खत्रींचे तपेलू(एका भांड्यात मटण शिजवणे.) regular"
"मग ह्याचा खर्चंही फ़ार येत असेल."
"सौंदर्याची maintainance price असतेच नं"
मी जरा हबकलोच हे सर्वं ऎकून.
"मग काय ठरलं तुमचं? की अजून पारशी, वाणिया, जैन याबद्दल माहीती हवीय?"
"नको नको. तूच माझी वहीदा. तूच माझी dimple आणि तूच माझी आशा पारेख." व.पु. काळेंची गोष्ट मी आठवून मी म्हणालो.
"त्यापेक्षा तूच माझी माधुरी म्हंटलं असतं तर बरं नसतं का वाटलं."

हेमंत_सूरत

Sunday, September 17, 2006

सूरती फ़रसाण - ३

खो-खो चा आणि driving चा काय संबंध आहे हे सूरतच्या रस्त्यावर मला फ़ार प्रकर्षाने जाणवले. घरापासून तसा फ़क्त सहा किलोमीटरचा stretch, परंतु भौगोलिक परीस्थिती न जाणता एखाद्याने स्वत:च्याच मस्तीत हा प्रवास(?) करायचे ठरवले, तर काय आफ़त येऊ शकते , ते तुम्हाला कळेल. पहिला किलोमीटर संपताच तापी नदीवरचा पूल लागतो. पुलाच्या आधी एक मोठ्ठा elliptical iseland चा अडसर आहे. ह्या iseland ला वळसा घालून जाताना नेमका चढाव आहे. आमच्या अडाजणमध्ये अर्धा डझन driving schools आहेत. त्यातली एक तरी शिकाऊ कार नेमकी चढावावरच बंद पडते तीही तुमच्या समोर. बाकीचे त्याला अणि तुम्हाला हुशारीने वळसा घालून खो-खो चा खंबा टाळून कसे जातात हे rear-view mirror मध्ये स्पष्टपणे दिसतं.
जरा पुढे गेल्यावर bridge च्या शेवटी flyoverचे bifurcation आहे. त्या bifurcationच्या आधी समोरची स्कूटर turn घेणार की नाही हे खो-खो मध्ये हूल मारताना खेळणार्याच्या पदन्यासावरून आणि कुल्ल्यांच्या हलचालींवरून ओळखण्याचे बाळकडू (चुकलं की विंचुरकर सर ओरडायचे,"पोट्ट्या रट्टा हाणू का पाठीवर?" हे बाळकडूच) मिळाल्याने मला काहीच त्रास नाही. पण मी हे कसं ऒळखतो याचा त्रास बरोबरीच्यांना किंवा मागल्यांना होतो.
अठवा गेटचे दुसरे सर्कल ओलांडून गेले की खरी परीक्षा सुरू होते. आम्हा काका लोकांची पंचाईत ही की समोरचे vehicle ह्या collegesच्या जंजाळात नेमके कोणत्या college कडे वळेल. teenager मुलगी असेल समोरच्या vehicle वर तर फ़ार जपून रहावे लगते. (छोटा जरी accident झाला तरी खरी सहानुभूती तिलाच मिळणार ना!). आता सवयीने माझे ठोकताळे पक्के होताहेत. एकदम मॉड ड्रेस, exotic life-style दाखविणारा केशसंभार, तर हमखास समजावे की ती opposite sideच्या वाडिया women's college चीच कन्यका. ती swiftly right turnमारणारच. जर ती sophisticated dress sense असणारी असेल तर architecture college जे left side ला आहे, तेथे वळणार. जर ती fast जाते आहे आणि अचानक तुमच्या दोन्ही बाजूंनी hero honda splendour वाले जायला लागले की समजावे ही बया २ किलोमीटर दूर असणार्या SPB English Medium Commerce College चीच! दूसरी असूच शकत नाही.(तिचे चाहते तिच्यासाठी पायलट बनून रस्ता मोकळा करणार). त्याहीपुढे जाणे मला तर अपरिहार्य आहे. पण या घोळक्यात एखदी साधी, कानात काहीच नाही, गळ्यात काही नाही हे मानेवर न चमचमणार्या, न reflect होणार्या rays मुळे कळणारी, सोज्वळ मुलगी असेल spirit वर तर ती खुशाल आमच्या svnit ची आहे ह्यावर शर्त मारावी. पुढे कॉलेजमध्ये शिरल्यावर जर एखादी मुलगी तुमच्याहीपेक्षा fast जातेय असे दिसले तर ती south gujarat university campus (जो आमच्या च्या campus मागे आहे) ची rare species मधली आहे (युनि. त मुली एकंदर कमीच) हे ओळखायला कशाचीच गरज पदत नाही.
ह्या सर्व संकटांवर मात केली तरी एक जास्तीचे गंडांतर नेहमीच भेडसावते. सूरती बायका, खास करून married catagoryतल्या, आपल्या स्व्त:च्या blouse ची पाठ, एकदम competition मध्ये ऊघडी टाकतात. एकदा तर माझ्यामागे बसलेली सौ. ,समोरचीची शर्मिला टागोरची मागून फ़क्तं गाठ मारलेले blouse बघून माझ्या कानात किंचाळली," ह्या सूरती बायकांना काही लाजा दिसत नाही". मी तिला म्हंटले, "बघ, कितीतरी accidents ह्यांच्या blouses मुळे होता होता वाचलेत याची यांना कल्पना नाही."
हा सुरती फ़रसाणचा तिसरा अध्याय येथे समप्त करतोय. चवथा यथावकाश.
हेमंत_सूरत

Friday, September 15, 2006

सूरती फ़रसाण - २

सूरतला आल्यावर आम्ही वाट बघत होतो प्रथम कोण येतं आमच्याकडे. नवीन क्वार्टर, नवीन जॉब, नवीन शहर, सगळंकाही शेअर करायचं होतं. अपेक्षित नसताना एक पोस्ट-कार्ड दर्वाज्याखालून सरकलं. गोविंद पाचपोर येणार होता केव्हातरी येत्या पंधरवड्यात. खास टीप होती, कोणालाही कळवू नये येण्याबद्दल. काय गौडबंगाल आहे हे कळेना. शेवटी आल्यावर कळेलच तेव्हा speculation चा नाद सोडला.
एके दिवशी संध्याकाळी डोअरबेल वाजली. स्वारी गोविंदची होती. surprise of surprises म्हणजे सोबत एक देखणा चेहरा होता.
"अरे, love marriage आटोपून आलोय."
"मग ये की. आत बस. पाणी घे. त्यानंतर सांग सविस्तर."
"अगं सोनल, बस. हेमंत आपलाच आहे. "
"मी आत जाते. चहा ठेवते सर्वांसाठी. तुम्ही बोला निवांत."
"सापडेल का चहा साखरेचं?"
"नवरा मिळवला गोविंदसारखा आणि तोही त्याच्या आईच्या नजरेखालून पळवून तर चहा-साखरेच्या डब्याची काय बात?" सोनल आत गेली.
" पण गोविंद, मला तर तू तिला पळवून आणलंय असं वाटतय."
" हो. मीच पळवून आणलय तिला"
"मला एक सांग. लग्नं करणारे प्रेमी जीव, लग्नानंतर ऊटी, मथेरान, माऊंट अबू येथे जातात. तू जरा अरसिकच दिसतोय. माझ्यासारख्या ब्रह्मचार्याच्या मठीत तेही सूरतसारख्या dry (सर्वार्थाने) शहरात तू तुझ्या बायकोला आणलेय. काय कारण तरी काही आहे नाहीतर ती बिचारी आयुष्यभर तुला सुनावत राहील मला सूरतला नेले, मला सूरतला नेले. जगातली सगळी रमणीय स्थळे नाहीशी झाली होती माझ्या honeymoon च्या वेळेस."
तेवढ्यात चहा घेऊन सोनल आली,"नाही हं. मी काही म्हणणार नाही. माझा नवरा चांगला डोकेबाज आहे सूरतची निवड करण्यात. ऎका त्याच्या तोंडून."
लगेच गोविंदचा धबधबा सुरू झाला.
" अरे, मी हिला कॉलेजमधून मैत्रिणीकरवी निरोप देऊन वर्ध्याला नेले. तेथे भटजी तयार होता. चार मित्रं साक्षीदार होतेच. सात फ़ेरे घेवून तासाभरात नवजीवन express मध्ये बसून सूरतकडे कूच केले. ह्या सगळ्यामागे एकच हेतू. मी वर्ध्याला जाऊन लग्नं करणार हे कोणी स्वप्नातही ओळखणार नाही. त्यानंतर तू म्हंटल्याप्रमाणे, हिच्या घरचे, माझ्या घरचे hill station, goa वगैरे ठिकाणी शोध घेतील. सूरतला अम्ही राहू ह्याचाही कोणी विचार करू शकणार नाही. सोनलचे भाऊ जरा भडक डोक्याचे. कुर्हाड हाणायलाही कमी करणार नाहीत माझ्या डोक्यात. आम्ही दोघेही जातीबाहेर जाऊन लग्नं केल्यामुळे दोघांच्याही घरी आगी लावून आलो आहोत. शिवाय दूसरे असे की तू academic institute च्या campus मध्ये. by law, पोलीसांना तुझ्या principal च्या परवानगीशिवाय मला हात लावता येणार नाही. मी तुझ्या मठीत सुरक्षित आहे. राहिली गोष्टं तुझ्या अडसराची. तर तू माझ्या नावाने institute guest house book केलेच आहे तर तूच तेथे रात्री रहा. सगळं काही स्थिरस्थावर होईपर्यंत आम्ही quarter ला राहू. आता काही अडचण?"
मी गोविंदला साष्टांग प्रणिपात घालायचाच तो काय बाकी होता.
३ दिवसांनंतर, honeymoon couple चे चेहरे ऊजळलेले दिसत होते.
" नागपूरहून फ़ोन आलाय मित्रांचा. आमचे सामान जे आई-बाबांनी बाहेर अंगणात फ़ेकले होते ते परत घेतले. सोनलच्या भावांनी कुर्हाडी भिंतीवर टांगून ठेवल्यात. आता आमचा खरा honeymoon सुरू. आम्ही चाललो mount abu ला. परत आल्यावर भेटू"
त्या ३-४ दिवसात जे माझ्यासारख्या ब्रह्मचार्याचे जे लाड झाले खाण्यापिण्याचे सोनल वहिनींकडून ते मी कधीच विसरू शकणार नाही. अतिशय जड अंत:करणाने मी त्यांना निरोप दिला. आताही मी जेव्हा जेव्हा गोविंदकडे नागपूरला जातो तेव्हा तेव्हा माझी खास बडदास्त ठेवली जाते. एक संध्याकाळ गोविंद-सोनल कडे ठरलेलीच. माझे लग्नं झाल्यानंतर त्यात स्वातीची भर पडली एका जास्तीच्या ताटाची.

Friday, September 08, 2006

सूरती फ़रसाण

१९८० ला बंगलोरच्या टाटा इंस्टिट्युट (I.I.Sc ला टाटा इंस्टिट्युट म्हणतात) मधून मास्टर ऑफ़ इंजीनियरींगची पदवी डोळ्यांसमोर इतरांना मुंबई, दिल्ली, टेक्सास, ह्रोड आयलंड अशी स्वप्ने दाखवीत होती तेव्हा अस्मादिक पाय जमिनीवर घट्ट रोवून २-३ जॉब हॉपिंग करत एक दीड वर्षांनी सूरतला येऊन पोचलेत तेव्हा हा कामातून गेला हे मला सर्वांच्या डोळ्यांतून न सांगता जाणवलं. सूरतला सेटल होण्यासाठी नागपुर स्टेशन सोडले तेव्हा आईच्या डोळ्यात जे पाणी साचले होते ते शिकण्यासाठी बंगलोरला जातानापेक्षा जास्त होते हे सहज जाणवले. साहजिकच आहे, बंगलोर दोन वर्षात सोडायचे होते पण सूरत केव्हा सोडणार याची शाश्वती नव्हती. वडिलांच्या डोळ्यात एवढाच पगार नागपूरला मिळतोय तर सूरतला जाण्याची गरजच काय हे डोकावत होते. मित्रं हाच विचार करत होते की कोणीही अशी ambition ठेवतो मी मोठ्या मेट्रो सिटीन जाईन किंवा फ़ॉरीनला जाईन मग हा खुळा सूरतला जाण्याचे वेड काय डोक्यात घेवून बसलाय?
माझं उत्तर सोपं होतं. campus based life मला हवं होतं. जेथे quarter मोठे मिळणार, स्वत:चे हक्काचे सर्कल जमवणार. वेगळ्या अशा ठिकाणी माझी identity बनवणार. असे शहर, जेथे शहराचे सर्वं फ़ायदे असणार पण मेट्रो सिटीची लगबग धावपळ आणि जिवघेणी rat race नसणार, ते मला सूरतच्या रूपाने मिळाले. मग गुजराथी भाषा, नवीन लोक, नवीन जेवण ह्यांचा काहीच अडसर वाटला नाही. सूरतच काय, दूसरे कोणतेही तसेच शहर चालले असते.
लवकरच मित्रांची पत्रे यायला लागलीत. एक एक करून सूरतचा पाहुणचार घ्यायला आलेत. कॉमेंटस, गप्पांच्या फ़ैरी झडायला लागल्यात.

सूरतला यायचे कधी ठरवले?
appointment letter मिळाल्यावर!
यायचे कसे प्लान केले? आधीचे काही observation? कोणी ओळखीचे?
history मध्ये शिवाजीने लूटले होते एवढीच ओळख.
नकाशात तरी पाहीले होते का?
पोरबंदरच्या अलिकडे आहे एवढाच अंदाज होता.(तो फ़ारच चुकीचा निघाला. अलिकडे शब्दाचा अर्थच बदलेल एवढं अलिकडे निघालं सूरत.)
थिएटर्स आहेत का?
२१ आहेत.
बघण्यासारखे काही आहे का?
आम्ही सोडून काहीच नाही.

दुपारी जेवणानंतर ३ वाजताचा "चष्मेबद्दूर" टाकायचे ठरले.
१ वाजता जेवण तट्टं झाल्यावर आमच्या मित्राने जी ताणून दिली ती थेट साडेचार वाजेपर्यंत. ऊठल्यावर महाराज विचारताहेत," सूरतला ऊन्हं लवकर कलतात वाटतं?'
"आमच्याकडे या वेळेला एवढीच ऊन्हे कलतात."
"चला, चहा घेवून, सिनेमाला जाऊ. सहा नंतर फ़िरणं तरी होईल."
"आता सहाचा शो मिळेल जर चहा थिएटरमध्ये घेतला तर कारण तयार होवून पोचेस्तोवर साडेपाच होतील. बुकिंग विंडोवर काही तुमचा काका बसलेला नाही ऊशिरा पोचलो तर"
"काय एवढा वेळ मी झोपलो होतो?"
"सूरतच्या भाज्या काही उगाच नाही वाखाणल्या जात! एवढी ढेरपोटी माणसे आजूबाजूला फ़िरताहेत ती ह्या सूरती जेवणामुळेच"
सूरतची अजून काय स्पेशालिटी?

येथे engagementला "half marriage" म्हणतात.
"स"चा उच्चार "ह" असा करतात. गुजराथीत साडेसात वाजता ये असे म्हणायचे असेल तर, "साढासात वागे आवजो" असे कोणीही गुजराथी व्यक्ति म्हणेल. पण सूरती माणूस,"हाडाहात वागे आवजो" असेच उच्चारेल. sober, elegant, class हे शब्दंच सूरती लोकांच्या डिक्शनरीत नाहीत. त्याऎवजी, cheap, gaudy हेच आढळतील. general knowledge म्हणजे सिनेमा, स्टार्सची लफ़डी, कपड्यांची फ़ॅशन, गॉसिप हेच! अख्ख्या भारताचे जेवढे per capita तेलाचे consumption आहे त्याच्या दुप्पट गुजराथचे आहे. येथे तळलेले पदार्थ एवढ्या चवीने खाल्ले जातात की आम्ही सूरतमध्ये " एव्हरीडे इज फ़्रायडे" हेच बघतो. प्रत्येक गोष्ट. जराही आवडली की ती "फ़ाईन"च असते. फ़ाईन शब्द सूरतला एवढा वापरतात की आम्हाला तो आता गुजराथीतूनच english मध्ये आला हे ठामपणे वाटतेय. बहू फ़ाईन अर्थात फ़ार छान हे सर्वदूर ऎकू येतं. पण फ़ाईन आर्ट, exhibition, paintings, classical concerts हे मुळी ९०-९५ पर्यंत येथे अस्तित्वातच नव्ह्ते.
मग अस्तित्वात काय आहे? साध्या कपड्यात फ़िरणारे करोडपती, जे आठ आण्याच्या भाजीसाठी घासाघीस करतील, पण अंबालाल सारभाईचा चार करोडचा (१९८० चा)पब्लीक ईश्यू एका दिवसात over-subscribe करतील. शेअर मार्केट चे खिलाडी आहेत. लाख दोन लाखाचे शेअर चहा-पाण्याच्या खर्चाईतके पटकन घेतील. जेवायच्या वेळी गेलो तर आग्रहाने जेवायला बसवतील (फ़ार ओळख लागत नाही त्यांच्याबरोबर जेवायला.) तित्क्याच सहजतेने कोटी रुपये दान देवून टाकतील आणि बोलणार पण नाहीत.
प्लेग आणि पूर आलेत तरी भजी खायला चुकणार नाहीत. कुठे काय खायला चांगले मिळेल ते जिभेवर पक्के लक्षात ठेवतील. अमर्नाथ, वैष्णोदेवी, काश्मीर, मलेशिया, सिंगापूर सगळीकडे जणू काही घराच्या बाजूला आहे ह्या थाटात जातील. बसने प्रवास below dignity मानतील. कपडे कायम (तरूणाईचे) latest fashion चे. मोरारीबापू, स्वामीनारायण, आशारामबापू, परीकरीदेवी, ईंदिराबेटी, सर्वांकडून सत्संग आवडीने करवून घेतील.
आत्ताच्या पूरानंतरही एका आठवड्यात सूरत चालते-फ़िरते करणे हेही सूरती लोकांनाच जमते. तेही तक्रारींशिवाय. (त्याशिवाय भजी खावून मिरवता कसे येइल?)

हेमंत सूरत

वारूळ सूरतचे!

मुंग्यांच्या वारूळावर पाणी धो धो कोसळले आणी सर्वं मुंग्या गांगरून गेल्यात. ज्या मुंग्या साखर आणायला दूर दूर गेल्या होत्या, त्यांना परत येण्याचा मार्गंच बंद झाला. कामकरी मुंग्या जवळपास होत्या त्यांनी लगेच तुरु-तुरु चालत आपापले खोपे गाठले. बाळ मुंग्यांनी एकच आकांत मांडला. कोठार सांभाळणार्या मुंग्यांनी दरवाजे लावून घेतले. जो जेथे आहे तेथे त्याने पाय घट्टं रोवून उभे राहावे असे राणी मुंगीने फ़र्मान काढले. तिने अंडी देण्याचे काम तात्पुरते थांबविले. बरोबर लवाजमा घेतला आणि फ़िरतीवर निघाली. तिला खास पंखांच्या मुंग्यांनी वर उचलले आणि लगेच फ़र्मान सोडले, उजव्या बाजूला जे पाणी साचले आहे ते वारूळाला धोकादायक आहे. तेथे लगेच मोठे छिद्र करून त्यातून पाणी बाहेर जावू द्या. त्याबरोबर काही कामकरी मुंग्या वाहून गेल्यात तरी हरकत नाही पण बाळ मुंग्यांना अन कोठाराला धक्का लागता कामा नये. त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली. थोड्या मुंग्या वाहून गेल्यात. पण बाकी वाचल्या.
पाणी ओसरताच सर्वांनी कामाला लागावे हे ठरलेच होते. पण पाणी कोसळायचे थांबेचना. प्रत्येक छोट्या कोठारातील अन्नकण संपून गेलेत. हवा कोंदट व्हायला लागली. पाण्यामुळे बाहेरून मोकळी हवा येणे केंव्हाच थांबले होते. सर्व मुंग्यांना आता प्रार्थना करण्याशिवाय काहीच करता येणे शक्य नव्हते.
अखेर आठवड्याने पाणी कोसळणे थांबले. प्रथम काही मुंग्या पोहत शेजारच्या वारूळात राणी मुंगीचा संदेश घेवून गेल्या. शेजार्च्या राणीने तिच्या कामकरी मुंग्या मदतीला पाठवल्या. आता नवीन हुरूप आला. हवा मोकळी झाली. अन्नं सुकलेलं मिळालं. बाळ मुंग्या खूष झाल्या. राणी मुंगी जातीने मोठे कोठार उघडून मदतीला धावली. छोट्या छोट्या कोंदणात लपून बसलेल्या मुंग्या आता उत्साहाने समोर आल्यात. किती गेल्या, किती हरवल्यात, कोण किती कामाला आले याचा हिशोब ठेवू लागले.
ऊन आले. दणकट मुंग्या पुन्हा कामाला लागल्या. कोणी साखर आणली, कोणी रवा आणला, कोणी कणिक आणली. कोणी कोठार दुरुस्त केलं. कोणी दरवाजे ठिक केलेत. ज्याला जे जमले ते ते त्याने केले. तरीही एक्स्प्रेस मुंग्या त्यांच्या एक्स्ट्रा पायांशिवाय अडून बसल्या. पण काम अडून बसलं नाही. आता मुंग्यांच्या राज्यात आलबेल आहे. पण हल्ली प्रत्येक मुंगी कामाला जाताना वर आभाळाकडे बघून ढगांचा अंदाज घेतल्याशिवाय कामाला सुरूवात करत नाही.

हेमंत सूरत

Sunday, August 27, 2006

विसरलेला

"भरकटलेला" ब्लॉग ह्यासाठी सुरु केला कारण (माझ्यासारख्या) माणसाचे विचार कायम भर्कटलेलेच असतात.फ़ारच कमी वेळा आपण सुसंबध्द विचार करतो (आपण नव्हे मी लिहा - सौ.). क्रुती करतांनाच ती सूत्रबध्द करावी हे बाळकडू आपल्याला स्वत:च्या एकेकाळच्या झिणझिण्या (मार खाल्ल्याच्या) आजही(?) शिकवून जातात (हो कां. मग लग्नानंतर मी तेच सांगतेय ह्याचा विसर कसा पडला? - पुन्हा सौ.च!). पाच महीन्यांपूर्वी सुरु लेलेल्या "भरकटलेला" झंझावाताने थोडा(?) विश्राम घेतला. दरम्यान सुस्तावलेले विचार (हो विचार सुध्दा सुस्तावतातच. त्यांनाही सुस्तावण्याचा हक्कं आहे.) पुन्हा भरकटू लागले. पण हाय रे दैवा! युझर आयडी आणि पासवर्ड दोन्हीही पार विसरून गेलो.(बॅंकेचा पासवर्ड कसा नाही विसरत? हा टोमणा दुर्लक्षित करावाच लागला.) हा पासवर्ड वेगळा हवा म्हणून वेगळा केला. नेहमीच लिहायचे आहे म्हणून लिहून ठेवला नाही. आता भोगा आपल्याच कर्माची फ़ळे (कुठे गेले ते गीता ज्ञान!). साधारण एक आठवड्यापासून पीसी टर्मिनलशी कुस्ती खेळायला सुरुवात केली. पण एखाद्याचा पत्ता तुम्ही निव्वळ त्या व्यक्तिला एकदा भेटला आहात आणि नाव व शहर माहीत नाही यावर कसा काय शोधून काढणार? तरीही सुरुवातीचा उत्साह आणि काही तासानंतरची अवस्था (झोपाळू डोळे व त्यात काहीतरी महत्वाचे हरवल्याचा अविर्भाव सौं.ना कळतोच! )

"आता मी नवीन ब्लॉग सुरु करतोय. काय नाव ठेवू?"
"विसरलेला ठेवा म्हणजे आठवायला सोपा जाईल".(बोचकारण्याची अशी सुवर्णसंधी सौ. थोडीच सोडणार)
"त्यापेक्षा बाबा हरवलेला ठेवा. आधीच्या नावाला जास्तं मॅचिंग होईल" (टिनएजर मुलगी मॅचिंगशिवाय दुसरे काय सांगणार.)
नाईलाजाने "भारावलेला" नाव ठेवलं. (कानात एक कॉमेंट घुमली - नाहीतरी माझ्यामुळे तुम्ही फ़ारच भारावून जाता.)
ईतरांमुळे आपण फ़ार भारावून जातो. कलीगने सांगितलेली ट्रॅजेडी, मित्राने कानात ओतलेली सिनेमाची स्टोरी, शिरीष कणेकरांची वात्रटिका, पं अरविंद गजेंद्रगडकरांची सुरस रम्यं अरबी घोड्याची गोष्टं, सानियांच्या कथांमधील नात्यांचे अधीकच गूढ होणारे वेगवेगळे पदर, ईतरांच्या आत्मचरित्रांमधील सॉफ़िस्टीकेटेड "लाल", ह्या सर्वांनी मी तर फ़ारच भारावून जातो हे मला आधी कळण्यापेक्षा मित्रांनीच ओळखून "बहकलेला" हे टायटल सुचवले असते.

रोज लेक्चर घ्यावे लागते तेव्हा "बकलेला" का नाही?
त्यावरून सुचले,
शाळेत जाणार्या मुलाने ब्लॉगचे नाव ठेवावे - "घोकलेला"
प्रेमात मार खाणार्याने - "पोळलेला"
दुसर्याच्या प्रेमावर वाईट नजर ठेवणार्याने - "जळलेला"
लग्नं होवून कायम बायकोचे ऎकणार्याने - "पाळलेला"
नको त्या व्यक्तिवर पन्नास टक्के प्रेम करून नकार ऎकणार्याने - "होरपळलेला"
सफ़ाई कामगाराने सुरु केलेला ब्लॉग - "मळलेला"
नुसत्या कामाचे नाव ऎकताच हतबल होणार्याने - "गळलेला"
सूरतला भज्यांवर दोन बंगले बांधणार्याने - "तळलेला"
तुरूंगात कायम राहणार्याने - "अडकलेला"
आता वाट बघताहेत शब्दं "कळकलेला", "हडकलेला", "उतलेला", "मातलेला", "फ़सलेला", "फ़ेकलेला", बघू या कोण कोण त्यांना वापर्तय ते. माझ्यातर्फ़े फ़्री !

विसरण्यात एक मजा असते. पुन:प्रत्ययाचा आनन्द पुन्हा तसाच मिळतो. दर वेळेस मी आमच्या ज्या ज्या ओळखिच्यांकडे जातो, तेव्हा कोणत्यातरी एका वस्तूकडे नीट बघतो. तिचे कौतुक करतो, डिटेल्स विचारतो. दुसर्या वेळेस, दुसरी वस्तू बघून विचारतो.

"छान आहे. केंव्हा आणली?"
"आधीचीच आहे."
"मग जागा बदलली असेल".
"गेल्या पाच वर्षांमध्ये त्या वस्तूला कोणीही तेथून हलवले नाही."
(मीच फ़क्तं हलतो. गेल्या जन्मी अर्जुनासारखं फ़क्तं माशाचाच डोळा बघायची सवय आणि तेही ईतर माशांना विसरून! हे या जन्मातही सोबत करतय तर.)

चेहरे ऒळखणे हेही माझ्यासाठी एक दीव्यंच! सांगून खरं वाटणार नाही पण सांगण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करतो.
सन १९७३. वेळ सायंकाळची. मित्रमंडळीत चालणारी त्यावेळेसची एकमेव लक्झुरी म्हणजे रेकॉर्डप्लेयर्वर हिंदी सिनेमांची गाणी ऎकणे. एक गाणं ऎकताना मी उद्गारतो, "काय नाचलीय बबीता ह्या गाण्यावर!" (बबीता म्हणजे लोलो ऊर्फ़ करिष्मा किंवा बेबो ऊर्फ़ करिनाची आई. नवीन पीढीसाठी खास माहिती) . यावर सर्व मित्रं एकसाथ ऊसळतात,"अरे बेट्या, ती हेलन आहे. बबीता हिरॉईन आहे त्या सिनेमाची. जा पुन्हा एकदा पहा सिनेमा नाहीतर १० रुपयांची बेट." खिशात सायकलमध्ये हवा भरण्याचे वीस पैसे एवढाच माझा ऎवज असल्याने
माझ्या चेहर्यावर हार मानली तरी ती दिसत नव्हती. एक शेवटचा डिफ़ेंन्स म्हणून मी धैर्य एक्वटून बोललो, " हिरॉईन असली म्हणून बबीता काय नाचू शकत नाही का?" यावर फ़ायनल शिक्कामोर्तब झाले ह्या ब्रम्हंवाक्याने,"जोपर्यंत हेलन तुझी कॉमेंट ऎकून एखाद्या विहीरीत ऊडी घेत नाही तोपर्यंत बबीताला चान्स नाही. हा तू प्रोड्युसर झाला तर गोष्टं वेगळी!."

सन २००५. जानेवारी २ . शाळेपासूनच्या सर्वं मित्रांचे ३३ वर्षांनी गेट -टुगेदर.
"आता तरी कळले का ती हेलन होती?".
दुसरा," नसेल तर करिश्माला विचार."
तीसरा हात धुवून घेतो," छे छे सल्मानला विचार. हेलन आता त्याची मानलेली आई."
"नको, ऊगाच विवेक ओबेरॉय त्यात ओढला जायचा" चवथ्याने पण संधी सोडली नाही.
मला आता तरी ती हेलनच हे ऍक्सेप्ट करण्यावाचून गत्यंतरच नव्हते.

ह्या सर्वांवर कळस झाला तो २००२ साली. फ़ॅशन शो म्हणजे कॉलेजमधल्या बाळगोपाळांसाठीपर्वणीच! पोरीबाळींना (ईंजीनियरिंगच्या ज्यांना आम्ही काहीही दागिने घालत नसल्यामुळे लंकेच्या पार्वत्या म्हणतो) मॉड ड्रेसमध्ये, त्यांच्या नाकावरच्या चष्म्याशिवाय बघणे हे तर सर्वांचे आद्यकर्तव्यं. अशा ह्या ईव्हेंटला विद्यार्थी जज पण तेवढीच फ़टाकडी आणतात. मी आपला प्रोफ़-ईन-चार्ज पदामुळे माझ्यावरच्या एका वाक्याच्या स्वागताने त्या फ़टकडीची बोळवण करण्याची जबाबदारी पार पाडण्याची वाट बघत होतो. ठरल्यावेळेबर्हुकूम एक स्मार्ट व्हॉलंटियर एका मदालसेला एस्कॉर्ट करून येत होता. ती चंद्रिका मॉडेल्सला लाजवेल असा पदन्यास करत येत होती. एखाद्या चवळीच्या शेंगेला ऊत्तम सिल्कची साडी, स्लीव्हलेस, हाय हिल्स, पर्फ़्युम आणि मोजकेच दादिने घालून सजवले तर ती कशी दिसेल? तर तशी ती ऊर्वशीच्या अविर्भावात, मधाळ हसत, तेही माझ्याकडे बघत येत होती. मी कसाबसा प्लास्टीक स्माईल देत कोरडेपणाने उद्गारलो," वेलकम मिस. प्लीज बी सीटेड." आणि ती जवळजवळ मला खेटूनच बसली. परस्त्री जर एका फ़ूटाच्या आत जवळ बसली तर साहजिकच मला एम्बरासिंग वाटते.
बाजूच्या माझ्या मित्र कम कलीग रश्मीनला मी विचारले,"मॅडम लोणत्या कॉलेजमध्ये शिकवतात - फ़ॅशन टेक्नॉलॉजी की टेक्सटाईल टेक्नॉलॉजी?",
रश्मिन लगेच माझ्यावर ऊसळला,' अरे, मॅडम काय म्हणतोस, ती आपली स्टुडंट आहे- शमिता देसाई."
मी अवाक. भान ठेवून विचारले," कोणत्या ब्रॅंचची?"
- "सिव्हीलची! दोन वर्षांपूर्वीची ग्रॅज्युएट".
-"मग माझ्या क्लासला येत नसेल."
हे सर्वं ती ऎकतच होती(खरे संभाषण ईंग्लीशमध्येच चालू होते).
ती लगेच ऊसळून बोलली," सर, मी तुमचे सर्वं क्लासेस अटेंड केलेत रेग्युलरली." -
मग माझ्या कसे लक्षात आले नाही? मी विचार केला, नक्कीच तिने पहील्यांदा एवढे चांगले कपडे घातले असतील.
माझे विचार जसे काही जाणून रश्मिन म्हणाला," शी वॉज फ़ेमस फ़ॉर हर आऊटलॅंडिश ड्रेसेस".
आता मात्रं मला वाटंत होते की धरणी दुभंगून मला पोटात घेईल तर बरं. नेहमी बूंदसे गयी वो हौदसे नही आती म्हणतात. माझे मात्रं हौदसे गयी वो दर्यामेभी न समायी झाले.

हो पण ह्या विसरण्याच्या ढगाला एक सिल्वर-लाईनिंग पण आहे. काही मोजक्या गोष्टी मी अजीबात विसरू शकत नाही. आणि त्या मला सारख्या आठवतात हे पण सांगू शकत नाही.
क्रियाकर्म करताना समोरच्या फ़ोटोतला आईचा शांत पाणीदार चेहरा, हॉस्पिटलमधून शववाहिनीत ट्रान्स्फ़र करताना एरवी हलक्या असणार्या आईचे जड झालेले शरीर, प्रत्येक नातेवाईकाने भेटताच फ़ोडलेला हंबरडा, रडणारे लाल डोळे, पण माझ्या डोळ्यातून अजूनही ओलावा घरंगळलेलाच नाही. मी जो थिजलोय आणि थबकलोय ते मी विसरूच शकत नाही .

हेमंत पाटील
सूरत
२८ जान.०६

Wednesday, March 08, 2006

"किनारा - एक परीक्षण"

७८ साली "किनारा" पाहीला होत. त्यात "मांडू" दर्शन झाले. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी मांडू बघण्याचा योग याचिदेही याचिडोळा आला. साहजिकच, "किनारा" बघण्याचि ऊर्मी पुन्हा उसळून आली. नुकताच तोही मोका साधला. ह्या सगळ्यात विजय झाला तो कॉमेंटसचा! गुलझार, जीतु, हेमा, व धरम, ह्यांचि क्षमा मागून (त्यांना मराठी कळतं, व ते मला ओळखतात हे आपण धरून चालू) त्यांच्यावरच्या कॉमेंटस सादर करतोय. सुक्याबरोबर ओलंही जळतं ह्या न्यायाने ईतरांचाही त्यात समावेश करतोय. ( त्यांची वेगळी माफ़ी मगायची गरज नाही).
तमाम हिस्टरीच्या प्रोफ़ेसर्सचा तेव्हा किती हेवा वाटला होता. हेमा ज्या धरमच्या प्रेमात पडते तो चक्कं हिस्टरीचा प्रोफ़ेसर! जीतेंद्र हा आता मात्र हेमाचा धाकटा भाऊ दिसतो. संपूर्ण सिनेमात तो गुलझारला किंवा ऍक्टिंगला शोधतोय असंच वाटतं. गुलझारनेच केलेली जीतुबद्दलची कॉमेंट आधी देतो. "जीतेंद्र हा असा कलाकार(?) आहे जो रडला की पब्लिक हसते आणि तो हसला की जनता रडते. त्याची ही शोकांतिका असली तरी लोक जीतुला पहायला का येतात हे मलाच पडलेले कोडे आहे". जेव्हा अगतिक होवुन (दुःखं दाखविण्याच्या ऍक्टिंगपुढे हतबल होवुन) तो तोंड फ़िरवतो व पाठ दिसते तेव्हा ती पाठच रडतेय असेच वाटते. कोण म्हणतं जीतू ऍक्टिंगला पाठ दाखवतो? उलट ऍक्टिंगसाठीच तो पाठ दाखवतो.
निवडणूकीत आपण दोन खराब उमेदवरांमध्ये त्यातल्या त्यात जो कमी वाईट त्याला मत देतो. तसे धर्मेंद्र आणि जीतेंद्र मध्ये, धरम बाजी मारुन नेतो. अर्थात त्याला कारण हेमा! ती समोर असल्याने धरमला प्रेमात पडण्याची ऍक्टिंग करावीच लागली नाही. तो प्रेमात पडलाच होता.
तसा गीत गाया पथ्थरोंने मध्ये दगडांच्या मूर्ती जिवंतपणाच्या जास्तं जवळ होत्या (जीतूपेक्षा) ही मल्लीनाथी चित्रपती शांताराम ह्यांच्यावतीने करण्यास हरकत नाही. गब्बरच्या भाषेत म्हणायचे झाले तर,"जीतूके ऍक्टिंगसे तुम्हे सिर्फ़ एक ही चीज बचा सकती है और वो है सिर्फ़ 'वेरूळ की लेणी'"!जीतूची आत्ताची थोरवी काय सांगावी? मला तो एका ऍंगलमध्ये त्याच्या त्यावेळच्या वाढविलेल्या केसांमुळे, तो सुपीरियर धनराज पिल्ले वाटला. माझ्या मुलीला (वय वर्षे १५) तो थोडा थोडा गांगुलींच्या सौरवसारखा भासला तर आमच्या सौंना (वय वर्षे सांगत नाही) तो लक्ष्या बेर्डेच चकवून गेल्यासारखा वाटला.
हेमा ३० वर्षांपूर्वी सौंदर्याचा पुतळा होती. आमचा बंगलोरचा रिसर्च स्कॉलर मित्र, परतीच्या प्रवासात, अती मूसळधार पावसामुळे, विजयवाड्याजवळ ट्रेनमध्ये २४ तास अडकला होता. ते २४ तास त्याने कसे काढले माहीती आहे? निव्वळ समोरच्या मालगाडीवरच्या डब्यावर खडूने लिहीलेले होते,"हेमामालिनी दुनियाकी सबसे हसीन औरत है" ह्या एकमेव युनिवर्सल ट्रुथवर!ह्याच हेमाने आमच्या एका स्कॉलर प्रकाश बापटला कसे वेडे केले होते ते आय.आय.एस्सी बंगलोरची रूम नं. एच ५० च जाणे. आयडियल फ़्लुइड फ़्लो च्या पुस्तकाला तेव्हा खूपच डिमांड होती परिक्षेच्या काळात. बापटलाही ते पुस्तक हवे होते. रात्री तो ते पुस्तक घेवून गेला आणि सकाळी ठरल्याप्रमाणे परत करायला आला तो तणतणतच!
"पाटील, ह्या पुस्तकाला तू हे फ़िल्मफ़ेअरचे कव्हर का चढवले?".
"त्यात काय, हेमामालिनीचाच तर फ़ोटो आहे".
"अरे त्यानेच तर घात केला. हेमा माझा वीक पॉइंट आहे. रात्रभर मी पुस्तकच उघडू शकलो नाही. कव्हरवरच नजर खिळवून होतो. आता परिक्षेत काय लिहू?".
"हेऽऽमा!"
अजून काही मासलेवाइक नमूने आमच्या सिनीयर मित्रांचे."वो कौन थी" मधली साधना - स्लीवलेस घालावे ते साधनानेच!हे रिंकू उर्फ़ शर्मिलाच्या एका चाहत्याने ऎकले आणि तो विव्हळला,"का? ऍन ईव्हिनींग इन पॅरीस" मधल्या रातके हमसफ़र थकके घरको चले गाण्यात, बोटीतल्या शर्मीलाचा स्लीव्हलेस जास्तं चांगला होता."हे तर काहीच नाही, अंबाडा बघावा तर असली नकली मधल्या साधनाचाच, तेरा मेरा प्यार अमर ह्या गाण्याच्या वेळचा". पुन्हा तो साधना वीर खिंकाळला.एका वेळेस शंभर सामान्यजणीतून कोणीही मिळण्याची आशा नसलेला आमचा सदाबहार मजनू मित्र "मेरे मेहबूब" बघून करवादला होता,"आपल्याला तर बुवा मेरे मेहबूब्मे क्या नही" नाचणार्या दोघीजणीत कोणाला सिलेक्ट करावे ह्याचा प्रश्नच पडणार आहे.
अभिजात सौंदर्य म्हणजे जाडं, स्थूलत्वाकडे डोकावणारं, हे नंदा, मीनाकुमारी, हेमामालिनी, हे समीकरण "घर" मध्ये अचानकच "रेखा"ने तोडल्यावर ती खरोखरंच किती खूबसूरत आहे ह्यावरच कित्येकांनी तोंडसुख घेतले. जयाप्रदाने श्रीकांत नाहटाच्या प्रेमात स्वतःला पागल केले हे वाचून, आय.आय.टी.तला आमचा मल्लिकर्जुन, रूममधली जयाप्रदाची सर्वंच्या सर्व पोस्टर्स काढून २ दिवस खिन्नं बसला होता.
तीच ती कालची सुंदर वाटणारी हेमा आज तिचे कपाळच नव्हे तर भाग्य पण थोडे आत गेल्यासारखे वाटते. शरीर बोजड वाटते. तिच्याऎवजी राखी असती तर तिने भूमिकेला जास्तं न्याय दिला असता हेही चटका लवल्यासरखे तरळून जाते.
खरा हिरो, बघण्याचा, मांडू! ऎकण्याचा खरा हिरो, आर्डी बर्मन! आजही त्या गण्यात हरवून जातो. "नाम गुम जायेगा" ही पॉकेट मनी ची रक्कम खर्चं करून पार्टिंग गिफ़्ट म्हणून अशोक कुमार सिंगला दिलेली एल्पी रेकॉर्ड वाया गेलेली वाटत नाही. आणि ह्या सर्वं उण्यादुण्यावर पांघरूण पडतं.
गुलझार ऎवजी आमची सौ. जर डायरेक्टर असती शेवटच्या प्रसंगात, तर तिने म्हंटलं असतं, हेमाच्या आईच्या तोंडून, हेमाला, (वीमेन्स लीबच्या सर्वं कार्यकर्त्यांची क्षमा मागून)"अगं भवाने, आधीच त्या धर्मेद्रला खपवलंस, आणि त्यात आता डोळे घालवलेन! बरं तर बरं, तो जीतू आपणहून तुला पत्करायला तयार आहे. आणि तू, कलमूही, दिलजली, त्याला नाही म्हणून पर्तवून लावतेस? असेल रूप दिलं तुला, पण तुला "हो" तरी म्हणणार कोण? बराय आर्किटेक्ट आहे, दिवसभर पडून राहील ऑफ़िसमध्ये, घर ठेवेल सुबक,आणि वस्तू जागच्या जागी! तुला आंधळीला सगळं बरोबर सापडेल. चल मुकाट्याने "हो" म्हण आणि गाठ त्याला मंदिराच्या पायरान्वर आणि लाव लग्नं तो "रामदास" होण्या आधी. बाइ गं, बाइच्या जन्माला आलीस आणि असं भरलं ताट लाथाडून तरी कसं जाता येतं तुला?"
मग येइल गोड शेवट!
सिनेमाचा आणि परीक्षणाचा!
हेमंत पाटील - सुरत

Friday, March 03, 2006

सौंदर्य

सौंदर्य
ब्युटी किती प्रकारची असते?
सर्व सेलेब्रिटीजची क्षमा माहून ही लिस्ट सादर करतोय.
पार्श्वगायन सौंदर्य : सगळं सौंदर्य आवाजातच एकवटलेलं असतं. याला अपण नभोवाणी सौंदर्य पण म्हणू शकतो. कोणी याला डबिंग सौंदर्य पण म्हणतात. बाकी बोलण्याचि गरजच नाही.
ऐश्वर्या/ सुश्मीता सौंदर्य : निव्वळ सौंदर्य असे काहि जळकुकडे लोक म्हणतात. त्यांचे जळणे सौंदर्यासाठी नसते तर ते या सौंदर्यामुळे मिळण्यार्या बाकी फ़ॅसिलिटीज मुळे असते. सिनेमा, पैसा, प्रसिद्धी, ह्यामुळे ते जळतात. अशीच अमुचि बायको असती, आम्हीही त्यांचे नवरे झालो असतो, ह्या सुप्रसिद्ध ओळी त्याअंच्याच तोंदच्या बरं का!
सांपत्तिक सौंदर्य : कितीही ढालगज असेल मुलगी तरी तिच्या वडिलांच्या बॅंक बॅलन्सकडे बघून आणि रिअल ईस्टेट्च्या गूंतवणूकीमुळे तीच मुलगी सुंदर भासते.
तारुण्याचे सौंदर्य : एका विशीतल्या मुलीला त्रेंडी कपडे घाला, ब्युटी पार्लर मधून सजवून आणा किंवा सिल्कच्या साडीत मिरवा, सर्वांनाच ती सुंदर दिसेल.
शेजारचे सौंदर्य : रोज रोज बघितल्यामुळे, तेही वयात येत असतांना, किंवा त्यानंतर लगेच, ती मुलगी सुंदर जाणवते.
गध्धेपंचविशी सौंदर्य : उजाड विराण वाळवंटात, जेथे ज्याला जी कुणी तहनलेल्याला पाणी प्यायला देणार ती त्याला सुंदर वाटणारच!
प्रोफ़ेशनल सौंदर्य : डॉक्टर-नर्स, टिचर-स्डुडंट, साहेब-सेक्रेटरी, हे ह्या कॅटॅगरीत मोडतात. कधी कधी ह्यात डॉक्टर-डॉक्टर, टिचर-टिचर, असाही विरळ योग बघायला मिळतो.
ट्रॅव्हल सौंदर्य : दहा-पंधरा दिवस ट्रिप मध्ये बाहेरच्या स्रुष्टीसौंदर्यापेक्षा बस, कोच किंवा व्हेसल मधलेच सौंदर्यच जेव्हा जास्तं आवडतं.
घ्रेलू सौंदर्य : साध्या घरच्या साडीत, रोजच्या कॉन्फ़ीडंट अवतारात, एका हास्याने व एका छोट्याशा दिलेल्या दादेने दिसणारे सौंदर्य!
ईंजिनीअरींग सौंदर्य : आय आय टीअन्स ह्याल नॉन-मेल सौंदर्य असे कुजकेपणाने म्हणतात.
सकाळचे सौंदर्य : जॉगिंग किंवा मॉर्निंग वॉकला हल्ली हल्लीच सूरतला दिसायला लगलेय.
खरे सौंदर्य : आमच्या एका चुलत मित्राने(मित्राचा मित्र) सांगितले होते की मुलगी बघायची तर ती सकाळी उठल्याबरोबर, बिना मेक-अप मध्ये, पहावी. जर ती तेव्हा सुंदर दिसली तरच ती खरी सुंदर! (शहाण्यांनी ह्या वाटेला जाऊ नये हा मित्रत्वाचा सल्ला!)
ग्रुहीणी सौंदर्य : जेव्हा आपली स्वतःची बायको जेवायला चवीष्टं, पोटभर आणि प्रेमाने देते तेव्हा ती फ़ारच सुंदर दिसते. (जगातल्या तमाम ऐश्वर्या, सुष्मिता तिच्यापुढे फ़िक्या पडतात.)
हेमंत पटील - सूरत

Thursday, March 02, 2006

भूत!
भूत म्हंटल्याबरोबर आप्ल्यासमोर एक भिववून टाकणारी आक्रुती ऊभी राहते. भूत हे नेहमीच मानगुटीवरच बसतं. ते रत्रीच निर्जन स्थळी एकट्या दुकट्याला पकडून जखडतं हेही लहान्पणापसून आपल्या मनात ठसलेलं आहे.
खरं तर मेलेल्या माणसांच्या भूतांपेक्षा जिवंत माणसंच खर्या भूतांसारखि असतात. प्रत्येकजण भूत बनून कोणत्या ना कोणत्या आयडियाच्या मानगुटीवर बसलेली असतात.
शास्त्रज्ञ शोधाच्या मानगुटीवर पक्की बसलेली असतात. तीही वर्षानुवर्षे. आयडिया मेली तरी ते तीची मानगूट सोडत नाहीत. घरादाराचे वाटोळे झाले तरी त्यांना त्याची पर्वा नसते.
प्रोफ़ेसर आणि शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांच्या मानगुटीवरच बसलेली असतात. एक्दा त्यांच्या डोक्यात सबजेक्ट्चे भूत शिरले आणि शिस्तीचा बडगा मिळाल की ते ऊंच ऊंच झोके घेत सर्वांना घाबरवून टाकतात.
लहान मुलांच्या आयांना हे मूल कधी मोठे होणार ह्या वेडाच्या मानगुटीवर, तरुण मुले मुली, कधी आपले लग्नं होईल ह्या (भूताच्या) आशेवर स्वार असतात. किशोरवयीन मुले फ़ॅंटसीच्या आधीन, लेखक मन्डळी वाचकांवर, कवी श्रोत्यांवर, प्रकाशक लेखकांवर, ऊमेदवार व्होटर्सवर, भूतांसारखीच ठाण मांडून बसलेली असतात.
स्कॉलर मुले पहिल्या नंबर्वर, आईबाप पर्सेंट्वर, नवीन जॉईन झलेला प्रमोशन्वर, भक्त पुजार्यांवर, पुजारी देवांवर, व्यापारी मालावर, ही लीस्ट वाढतंच जातेय.
ह्या सर्वांवर कडी करतो तो कंजूष माणूस! तो जेव्हा पैशांच मानगुटीवर बसतो तेव्हा त्या भूतामुळे आपले नकोसे होतात, नकोसे नाहीसे होतात, नाहीसे झलेले तळतळाटाच्या मानेवर बसून फ़िरतात.
देणेकर्याचे भूत जेव्हा घेणेकर्याच्या मानेवर बसतं तेव्हाची त्याची अवस्था त्यालाच माहीत.
आताच्या यूथ मध्ये जो तो आयकॉन व्हायच्या मागे आहे. कोणाला शाहरुखखान व्हायचेय, कोणाला ऐश्वर्या, तर कोणाला सचिनभुताने पछाडलेले असते. त्यात भर घातली इंडियन आयडॉल, पैचान कौन, ह्या नव्या भूतांनी. आता उत्तरोत्तर ही भुते वढतच जाणार, पिंपळ, वड, मान, दिवस, रात्र, काम धाम, हे सर्व चढत्या क्रमाने तुमची आमची मान पकडणार!
जगातले तमाम ड्रॅक्युला, बीस साल बाद, लेकिन, नारायण धारप, अशोक समर्थ, रामसे ब्रदर्स, सर्वांनी आत रिटायर व्हावे. आता तुमचा आमचा भुताचा समन्ध. आपण सारे भूतभाउ. आपण सारे वीरुन जाउ.
पण आयडियाज अजून लोंबकळत्च राहतील कुणाच्यातरी मान्गुटीवर बसायला!
हेमंत पाटील - सुरत
कुणी निंदा कुणी वंदा
खाण्याचा हा अपुला धंदा
उठताच चहा घशात घातला
मस्का टोस्ट तोंडात शिरला
नऊ वाजता खमंग वास नाकात शिरला
कांद्यापोह्यांसोबत चहा पोटात जाऊन बसला
भूक लगण्याचि वाट कशाला
घड्याळाचा काटा बारावर सरकला
पोटात एक खड्डा खणला
चपातीभाजीचा ऎवज ऒतला
नावाला आमटीभात, चवीला गोड भात
शेवटी दहीभात, सर्वकाही आत टाक
दुपारची वामकुक्षी मनाला आणते ऊभारी
तळलेली भजी जिभेला आवडतात भारी
जरा फिरायला जावे तेवधाच व्यायाम होतो
पाणीपुरी घ्यावी जठराग्नी फुलतो
थोडा टीव्ही पहावा, काही पेपर चाळावा
झाला नाही का स्वयंपाक म्हणुन ऒरडा करावा
रात्री तरी नीट चौरस आहार घ्यावा

त्यावर विडा मुखात कोंबावा
दिवस कसातरी निभला
पोटाला आधार की हो मिळाला

हेमंत पाटील
Wednesday, March 01, 2006 5:36:33 PM
कधीतरी काहीतरी
माणूस जन्मतो तेव्हा तो कुणीच नसतो. माणूस जातो तेव्हा तो कुणीतरी असतो. हा जो "तरी" आहे तोच महत्वाचा आहे. अरे काहीतरी करा रे असे आजोबा सारखे ओरडायचे काकांना. कारण त्यांनी कुणीतरी व्हावं अशी त्यांची ईच्छा. माणसाने सतत काहीतरी केलं पाहीजे तरच तो कुणीतरी बनेल. अरे कसातरी अभ्यास करु नका नाहीतर काहीतरीच व्हाल हे सर्व सांगायचे. कसातरी जगु नको कोणीतरी होऊन जग. पण हे कसं जमायच? काहीतरी करताना कसंतरी होतं आणि पुढे मातेरं होतं. स्वयंपाक कसातरी केला तर चालतो पण चव चांगलीच असते, "काहीतरीच" नसते. डॉक्टर काहीतरी करा पण माझ्या मुलाला वाच्ग्वा, एक बाप म्हणतो. डॉक्टर मनात म्हणतात,मी त्याला कसातरी वाचवला हे कुठे तुला माहीत आहे. ह्या कसंतरी, कुणीतरी, काहीतरी वरंच सर्व जग चालले आहे. कुणी कसंतरी वागलं तरी वरती "तो" कुणीतरी आहे ना, तो बघून घेईल. "कुणीतरी काही मदत करा रे", भिकारी म्हणतो. तो भिकारीच असतो म्हणून कसातरी राहतो, कुठेतरी झोपतो. पण तो कुणी "रामन राघव" त्याचा खून करतो, तेव्हा तो कुणीतरी बनतो, ज्याचा एक दिवस पेपरमध्ये फोटो येतो. कुणीतरी माझ्याकदे पाहील म्हणून स्त्री नट्टापट्टा करते. कुणीतरी माझे कौतुक करेल म्हणून मूल आजूबाजूला बघते. कुणीतरी माझा सांभाळ करेल म्हणून आईवडिल मुलांकडे बघतात. कुणीतरी चांगलं म्हणेल म्हणून सर्व झटत असतात. तसं करताना काहीतरी वाईट होऊ नये म्हणून बायाबापड्या प्रार्थना करतात. माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं, ह्यांनी बाजारातून काहीतरीच आणलं, ह्यांचे मित्रं कसलेतरीच आहेत, पोटात कसंतरीच झालं, पेपर कसातरीच गेला, रिझल्ट कसातरीच लागला, गाणं कसंतरीच झालंय, बक्षिस काहीतरीच दिलं, फ़ोटोत कसातरीच आलोय. काहीतरी लिहायला बसलो, तेव्हा "कवडसा"त कसंतरी आणू नका, आणि कुणीतरी चांगलं म्हणेल असं लिहा, असा आदेश "कुणीतरी" दिला. आता तुम्हीतरी चांगलं म्हणा नाहीतर माझा चेहरा कसातरीच होईल.
हेमंत पाटील७ जानेवारी २००६

स्पंज

किती वाजता तू ऊठतोस सकाळी?
साडेसहाला. सातनंतर मी लोळूच शकत नाही.
(हे ह्याने आईकडून ऊचललेय. मालूताईंना आजार्पणाशिवाय कोणी सहानंतर अंथरूणात पाहीले नाही.)
मग अंघोळ लवकरच होत असेल?
अर्थात! आठच्या आत टॉवेल बाल्कनीत वाळत टांगलेला दिसेल.
(हे वडिलांकडून. कुणी नातेवाईक कुजबुजतो. ह्याचे वडिल अंघोळ करून आठला लायब्ररीत हजर! प्रत्येक पेपर आणि मॅगझिन वाचणारच.)
आता कसे काय रूटीन?
सकाळी पहिला चहा मीच बनवितो ग्रुहस्थाश्रमाला सुरवात केल्यापसून.
(बायकोने शिस्तीत ठेवलेय. एक कूजकट कॉमेंट!)
पण तुझे कपडे, मॅचिंग नेहमीच डोळ्यात भरतंय त्यानंतर.
(हीही सौंची क्रुपा.-अस्मादिक! फ़ूल स्लीव्हचाच शर्ट, तोही ईन करून, शूज कंपलसरी, डाय केसाला महीन्यातून, बेल्ट महागाचा, लग्नंसमारंभाला ठेवणीतले कपडे, वगैरे वगैरे!)
हल्ली तुझी नवीन गाण्यांवरती व सिनेमांवरही कमांड दिसतेय. नाही तू नवीन गाणी गुणगुणतांना दिसतोय.
(thanks to my teen-aged daughter who bombards me with all the trendy songs!)
बाकी शाळेत काय किंवा कॉलेज काय तू नेहमीच सिन्सिअर.
(आजीची शिकवण. आजोबा यायच्या आत सगळं तयार हवं.)
आजार्पणात सर्व काळजी घेतोस ईतरांची आणि मुख्य म्हणजे स्वतः आजारी पडत नाहीस हे काय कमी आहे?
(हा नोकरीचा परिणाम. प्रोफ़ेसरकीमुळे पाहिजे त्या वेळेस ईमर्जंन्सीच्या नावाखाली पळ काढता येतो आणि व्यायाम रूटीन नीट ठेवण्यास कॉलेजचे टाईमटेबल धाऊन येते.)
शिकवण्याचि स्टाईल बरोबर
(कारण कसे शिकवायला नको ते शाळा, कॉलेज मधे बहूतेक शिक्षकांनी दाखवून दिले होतेच. एकदा वाईट शिकवायचे नाही हे कळले की मग चांगले शिकवीण्याशिवाय दूसरा पर्यायच नसतो.)
आता हे सगळंच जर बाहेरून आलेलं, मझ्यात ईतरांच्या क्रुपेने रुजलेलं तर मग माझं स्वतःचं काय?कंटाळाच फ़क्तं माझा?
आंधळा विश्वास ठेवणं, चक्रात जूंपून घेणं, झापडं लावून काम कर्णं, ह्यात हरवलाय तो कोण?
मझा मी कोण?
एक मुलगा, एक नातु, एक नवरा, एक बाप, एक प्रोफ़ेसर, हे सर्व मायनस केलं तर उरतो तो मी काय आणि कसा असेन?
कुठे आणि कसा भेटेन मी त्याला?
की मी एक सछ्छिद्र स्पंज?
ज्यात कोणीही पाणी भरावं आणि दाबून ते केव्हाही काढून घ्यावं?
हेमंत पाटील - सूर