Sunday, November 29, 2009

कशी असते कविता?

कविता ही बरणीतल्या मुरांब्यासारखी असते.
जेव्हा काहीच गोड ऊरत नाही तेव्हा चमच्याने काढून चवीने खायची असते.
कविता ही तुमच्याकडून लिहून घेत नसते
तर समोरच्याला काय आवडतं ते त्याच्या मनातलं काढून तुमच्यासमोर ठेवत असते.
कविता ही लॉकर मधल्या दागिन्यांसारखी असते
समारंभात घालून ती मिरवायची असते
म्हंटलं तर कविता अस्तित्वातच नसते
पण भारावून टाकणार्या भूतासारखी पुन्हा पुन्हा छळते
कविता ही फ़क्तं शब्दांचीच नसते
शब्दांमागच्या अर्थाची पणअसते
जमली कविता तर भावपूर्ण असते
नाही तर रद्दीचा तरी भाव पूर्ण घेते

Friday, October 30, 2009

मारुतीचा भाऊ!


मारुउतीराया जन्मताच पळाला
सूर्याला म्हणे गिळायला!
हा त्याचा भाऊ आता भुकेपायी
गिळतोय सूर्याला प्रसिद्धीपायी!

आधुनिक अगस्ति

अगस्ति ॠषिंनी जो सागर घेतला आत
तोच ऊलटी गंगा वाहवून बाहेर टाकला त्यात!
धन्य तो कॅमेरा, धन्य तो सबजेक्ट
द्रुष्टिभ्रम करणारा धन्य तो स्पेशल ईफ़ेक्ट!

Sunday, October 25, 2009

काचेचा जिना

काचेचा हा माझा जिना दिसतो किती छान
फ़ुटत कसा नाही तो वळवून बघतो मान!
वरती खाली तरंगल्याचा होतो की हो भास
चढता उतरता थकल्याचा ना होतो तो आभास!!

Saturday, October 24, 2009

फ़्रॅंकफ़र्ट दिवसाचे /रात्रीचे










एकाच नाण्याच्या दोन बाजू
फ़्रॅंकफ़र्ट शहर, किसमिस आणि काजू!
दिवसाचा उजेड बोलावतो
रात्रीच्या उजेडात लखलखतो!

चना चोर, भेळपुरी, मेगॅसाईझ

येथे मिळेल जंबो साईझ भेळ
जंबो स्टॅंडवर ठेवलेली!
खूप खाऊन तहान लागली
तर पाण्याची पाईपलाईन
त्यातच आहे दडलेली!

राक्षसाचे केचप

एका हट्टी मुलाला हवे होते केचप.
तेही एवढे की जन्मभर पुरेल असे.
त्याच्या आईने मग ते अशा ऊंचीवर ठेवले
की तो जन्मभर रहीला ऊड्या मारत!

हवय का एकच पीच?

केशवसुत यांची क्षमा मागून!

एकच पीच द्या मज आणून
खाईन मी ते स्वप्राणाने
थुंकून टाकीन सगळा कचरा
विशाल त्याच्या बी बियाणाने!

राक्षसाचे कणिस

राक्षसाचे कणीस कोणी देईल का मजला?
ऊंचावरती चढून दाणे देईल का खायला?
या कणसाच्या पोटात काय सांगू नका कुणाला?
अख्ख्या वस्तीत पाणी देतो प्रत्येक घराला!

"ग्लास"गो?

प्यालात बुडाला प्याला
की कोंदणात ठेवलंय हि़र्‍याला!
कितीही दु:ख असो जीवाला
ह्या वादळी हवेत विसरायला!!
’ग्लास’गोत असलात तर
फ़ार दूर नको जायला!!!

Friday, October 23, 2009

भेट IIT ची

झाडांची सावली येथे अभ्यासाला मिळते
द्न्यानाची भूक येथे पोटालाही देते
भविष्याची काळजी येथे कायमची मिटते
IIT तून गेल्यावरही पुन्हा भेटायची आस येथे आणते.


(IIT गेस्ट हाऊस, वनविहार, समोरील व्ह्यु)
किडूक मिडूक जमवून संसार मांडला
कोंड्याचा मांडा करून रांधायला घेतला
डाळ तांदूळ भाजीचा पत्ताच कापला
ठिणगीशिवाय स्वयंपाक थंडाच राहीला
स्पाईडरमॅन खूप पाहीलेत.
पण ओटावातील हे स्पाईडर शिल्प
आपल्या नजरेत कायमचे अडकलेय
हे फ़ार उशिरा कळले.
या नवीन वर्षात एक नवा प्रयोग करू.
चिमटीत धरून आयफ़ेल टॉवर गरागरा फ़िरवू!
ठरविले तर काय नाही करू
अगदीच नाही तर दिवाळीचा फ़राळ करू.

Thursday, October 22, 2009

पेन आणि कविता - २००९

लेखणी तुटली तरी कविता सोडायची नसते.
विचार भरकटले तरी शब्दं मांडायची शिस्तं तोडायची नसते.
अर्थ नाही उमगला तरी अर्थहीन म्हणून हिणवायची नसते.
श्रोते भेटले नाहीत तर कविंनाच ती ऎकवायची असते.

Wednesday, October 21, 2009

Friday, June 05, 2009

पार्टी

Entrance ला रात्रीच्या अंधारातही चमकणारी रेडियमची पाटी "अपेक्षा - अनुराग" येणार्या प्रत्येक कारच्या हेड्लाईटला योग्य अंतरावर थांबवित होती. ड्रायव्हरशेजारचे दार अलगद उघडताच प्रथम ख्रिच्शन डायोर किंवा नीना रिकीचा दरवळ आधी बाहेर यायचा, मग डिझायनर सॅंडल्स आणि हिरेजडित नाजुक हातांपाठोपाठ तलम कपड्यांची सळसळ!ड्रायव्हर्च्या जागी असलेली एक भपकेबाज व्यक्ती झटपट त्या सळसळीबरोबर येऊन दोघांचे चार हात कधी नमस्तेला तर कधी शेकहॅंडला तर क्वचित हलक्याशा मिठीत जोडले जायचे.

एक एक करत सर्वं कपल्स आपली हजेरी प्रशस्त लॉनवर किंवा राजेशाही दिवाणखान्यात लावत होते. अपेक्षा व अनुराग हे होस्टच मुळी सर्वांना जातीने ड्रींक्स देत स्वागत करत होते. मुख्य डिनरला बराच अवकाश होता. आपसूकच छोट्या छोट्या घोळक्यात संवाद चालू होते.

"अपेक्षाला बरं जमतं या वयात अजूनही मिरवायला."
"तिला दुसरं काय काम असतं?"
"तसं कसं! नाही म्हंटलं तरी २५ वर्षे झालीत लग्नाला."
"मग अजून कशी पस्तिशीची दसते?"
"चल, पार्लरमध्ये जाऊन येते."
"पार्लरमध्ये तर तूही जाते मग तू का चाळीसची असून पन्नासची दिसते?"
"ते जाऊ दे. पण अनुराग अगदीच सीसी आहे"
"म्हणून काही ती पस्तिशीची दिसत नाही हं."
"तसं नाही. अनुराग तिला फ़क्तं तोंडी लावायला. सेलीब्रेट तर ती शॅंपेननेच करते."
"सुरुवात शॅंपेनने तर मेन कोर्स मध्ये कोण?"
"ते मी कसं सांगू? पाच कोर्सचे डिनर असेल तर?"
"खरं कि काय!"
"अपेक्षा म्हणजे आमच्या old बूर्झ्वा क्लबमध्ल्या उखाण्यासारखी!
गोविंदरावांबरोबर सिनेमा पाहिला सायको,
अरविंदरावांचे नाव घेते चिमणरावांची बायको!"

हास्याचा किलकिलाट! अजून एकदा, पुन्हा एकदा !
तर पुरुष मंडळी प्रामुख्याने शॅंपेनचा आस्वाद घेत अंदाज घेत होती.
" हा अनुराग म्हणजे काही कळत नाही. सदैव हसतमुख. worries कधी नाहीतच."
" लपवत असेल. हल्ली सामान्य असणारा माणूससुद्धा सुखी असण्याच्या acting मध्ये परेश रावलला मागे टाकेल"
"acting कुणिही दोन दिवस करेल. गेली पंचवीस वर्षे तो सुखी आहे हे मी माझ्या दु:खी नजरेने टिपले आहे."
"ते बघता बघता तुझे दु:ख वाढल्याचे मी पाहिले आहे. (आणि त्यामुळे तुझे दु:ख थोडे कमी झाल्याचे मी पाहिले आहे- एक कुत्सित कटाक्ष)"
"पुरे. लाकडं जाळण्याचा प्रकार थांबवा."
"लाकडं पूर्वी होती. आता रिफ़ायनरी जाळता येईल इतकं इंधन आहे."
"बरं एवढं जळूनही एक चिंता नेहमी. याचं कधीच कसं लफ़डं झालं नाही व झालं असेल तर कळलही नाही."
"अरे त्याला दु:ख झालं असेल पण कळलं नसेल"
" तसं कसं शक्यं आहे? आपल्यामध्ये असा कोण आहे ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही एकाही महत्वाच्या बाबतीत?"
" अरे आपण सगळे नजरांच्या दुर्बिणी लावून एक दुसर्याला दुरून पाहात गंमत करत असतो. कोणाची P.A., दुसर्याची client, कधी आडवळणाची air-hostess, कुणी सुटलय का यातून?"
" आता पुरे. नाव नका घेऊ. नाहीतर कलीयुगातले महाभारत व्हायचे."

तेवढ्यात announcement झाली.
मंडळी, अपेक्षा व अनुराग आपल्याला काही सांगू इच्छिताहेत.
शॅंपेनचे ग्लासेस एकाच दिशेने वळलेत. सर्वं नजरा एकाच ठिकाणी खिळल्या. काही डोळ्यांमध्ये मिस्किल छटा, तर काहींमध्ये ’आता काय नवीन’ चा बोजडपणा.

अनुरागने सुरुवात केली.

"२५ वर्षे! हो. आम्ही गेली पंचवीस वर्शे एकत्र आहोत. made for each other म्हणून नव्हे तर "MAD FOR EACH OTHER" गेल्या पंचवीस वर्षात आम्ही जितकं इतरांना पाहिलं तितकं त्यांच्या नजरांमध्ये आधी कौतुक, मग असूया, पुढे अविश्वास व शेवटी काहीतरी लपवतोय हे भाव पाहीलेत. मी जितकं बोललो तितकं त्याच्या उलटं लोक समजायला लागले. माझी प्रगती, माझा पैसा, माझी decisions, सगळ्यांकडे संशयाने बघायला लागले. हळुहळू या सर्वांपलीकडे जाण्यासाठी बोलणं कमी झालं, हास्य वाढलं. शेकहॅंडनंतर ’excuse me’ म्हणून दूर सटकणं आपसूक यायला लागलं. professional life चा मुखवटा वापरून personal life वेगळं झालं. तरीही एकदा बोलावसं वाटलं. पण मला नाही तर अपेक्षाला. तेव्हा तिच्यासाठी ही दिलखुलास मोकळी पार्टी.आज बोलेल ती. ऎका तुम्ही. ऎकल्यानंतर ठरवा तुम्हीच काय ते!"

नाजूक हातांनी पदर सावरीत अपेक्षा सर्वांसमोर बोलायला उभी राहीली. काजळ लावलेल्या काळ्या नजरा पांढर्या डोळ्यांनी तिला बघू लागल्या. एकडे मिशीत लपलेल्या कुतूहलात कान टवकारले सर्वांचे!

"मी अपेक्षा!. नावच माझं अपेक्षा. मग मला छोट्या छोट्या बाबतीत अपेक्षा असणं हे काही चुकीचे नाही. लहान असल्यापासून पाहतेय लग्नं झालं परिचयातल्या कोणाचही की माझं नाव त्यांच्या प्रत्येक वागणूकीत दिसायचं. नवरा व्हायच्या आधी त्याला तिच्यातलं सौंदर्य दिसायचं. तिचा लोभसवाणा स्वभाव, सहवास हवाहवासा वाटायचा. तिला भेटण्यासाठी कुठलही निमित्तं तो ओढून ताणून आणायचा. तिचाही जीव सुखवायचा. तिलाही ते त्याचं रुंजी घालणं फ़ार फ़ार आवडायचं. हळुहळू त्या पाहण्यातून जेवणाची, मुलं झाल्यावर त्यांना नीट ठेवण्याची अपेक्षा दिसायची. तिचीही परिस्थिती काही वेगळी नसायची. काही बाहेर जायचं म्हंटलं की ्खर्च होणारे पैसे समोर दिसायचे. मुलांच्या भवितव्यासाठी "नको" शब्दानं ओठांवर ठाण मांडलेलं असायचं. काही विकत घेऊन वाचायचं, काही छंद जोपासायचा हे तर मुळी Dictionary तून गेलेलच असायचं.

नावे बदलली, वेळ काळ बदललेत, सांपत्तिक स्थिती बदलली पण परिस्थिती तीच होती. तेव्हाच मी एक निर्णय घेतला. जितके काही माझे परिचयातले होते, मित्रं होते, ओळखीचे होते,त्यांच्याबरोबर एक एक करून खडा टाकला. हो. पण त्याआधी मी चक्कं hypnotism शिकले. तेही लपून छपून पण पक्की शिकले.

प्रत्येकाला मी एकेकट्याला बोलावलं. माझी मोहक offer दिली. समज आपलं virtual लग्नं झालय. त्याची विकेटच उडायची. मग मी दर २० मिनीटांनी २-२ वर्षे त्यात add करायची. हिप्नॉटीझमच्या प्रभावाखाली त्याचा नवरा म्हणून role बघायची. प्रत्येकाने कल्पनेतला जो अनुभव दिला त्याचं नाव पळसाला पानं तीन. तीच गुर्मी, तीच अपेक्षा, नवरेपणाचे तेच ते हक्कं, स्वामित्वाची भावना! ते मला नको होतं असं नाही. पण त्यातलं मित्रत्वाचं व ममत्वाचं नातं केव्हाच गेलेलं होतं. ओलाव्याचा मागमूसही नव्हता.. hypnotism संपेपर्यंत मला ऊटीच्या थंड प्रदेशातून सहारा वाळवंटात गेल्याचा अनुभव यायचा.

मी हळुहळू निराश व्हायला लागले.. पण तरीही लळत लोंबकळत ईच्छाशक्तीवर मात करत रुटीन चालूच ठेवले.. आणि अचानक एका प्रवासात अनुराग भेटला. तोही रेल्वेच्या कंपार्टमेंटमध्ये आणि दिवसा!. माझ्याशी तर बोलायलाही तयार नव्हता. त्याच्याच गुर्मीत. कामाच्या नशेत. पुस्तक वाचणं व लिहीणं. मोठ्या प्रयत्नांनी त्याला बोलतं केलं. नकळत सवयीने hypnotism वापरायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य! जसजशी वर्षे पुढे जायला लागलीत त्याच्यात मित्रत्वाचे धुमारे जूनच फ़ुटायला लागलेत. कामाच्या व्यापाखाली दबून जाण्यापेक्षा माझ्याबरोबर मी म्हणेन तेव्हा यायला तयार! तेव्हाच विचार केला हाच तो!

Exactly २५ वर्षांचा प्रवास तेव्हा २५० मिनि्टांच्या सहवासात केला तोच आज पूर्ण झालाय. आणि हो, ज्या काही comments तुम्ही सर्वांनी केल्या आहेत, सीसी अनुरागपसून ते सायकोच्या उखाण्यापर्यंत, तेही मासलेवाईक नमूने मी डोळ्यांखालून व कानांवरून आधीच घातलेत. तेव्हा माझी निवड सार्थ केल्याबद्दल सर्वांचे आभार. ही पन्नास मिनिटांची कहाणी पंचवीस वर्षी सुफ़ळ संपूर्ण!"

पार्टी संपली ईतरांची पण अनुराग व अपेक्षाची पार्टी सुरुच आहे अजूनही. विश्वास बसत नसेल तरीही!

partी

Wednesday, April 29, 2009

होमवर्क आणि एक्सरसाईझ

शाळेत कोणताही धडा कितीही interesting असला तरी त्याची मजा लगेच निघून जायची त्यावरील exercises पूर्ण करताना! रिकाम्या जागा भरा, जोड्या जमवा, विरुध्दार्थी शब्द द्या, reference to context लिहा, थोडक्यात मुद्देसूद लिहा आणि काय काय तो अत्याचार! पण आता जर real life based धडा घेतला तर ह्याच exercises किती interesting होतील पहा. एक झलक !

रिकम्या जागा भरा :
१) आईने सांगितलेले काम स्वत:हून _________ करणार.(बाबा/ मुलगी/ कामवाली/ आईच)
२) दुपारी अचानक खाली पडून बशी फ़ुटली ती____________ मुळे! (वारा/ हलगर्जीपणा/ मांजरीचा धक्का)

जोड्या जमवा :

१) नवरा ----------------- परधार्जिणी
२)मुलगी-------------------असून अडचण नसून खोळंबा
३)कामवाली----------------कसा बाई यांना वेळ मिळतो चकाट्या पिटायला
४)नातेवाईक---------------सांगून रजा घेईल तर शपथ!
५)मित्र---------------------ठरवून येतील मदतीला तर नवल

Reference To Context लिहा:
a) या घरात माझं कुणी ऎकेल तो दिवस शेवटचा.
b)सांगून बाहेर जाणं ही पध्दत फ़क्तं आमच्या माहेरीच!
c) हा रंग मला खुलून दिसतो.
d) मी सांगितलं म्हणजे नाहीच ऎकणार.
e) मुलगा आहे, राज्याभिषेकाशिवायच सिंहासन चालवतोय.

थोडक्यात लिहा :
i) चोरून पाहीलेला सिनेमा
ii) वाचवलेले पैसे
iii) पहिला खोटारडेपणा
iv) दुसर्यांचा वेंधळेपणा
v) नसती उठाठेव
v) लष्करच्या भाकर्या

खालील प्रश्नांची उत्तरे मुद्देसूद लिहा :
१)जर माझे तुझ्याशी लग्नं झाले नसते तर काय झाले असते?
२) मुलगा नक्की कोणाचे व किती चांगले(?) गुण घेऊन मोठा होतोय?
३) तुमच्या आईचे कुठे चुकले (किती वेळा व कोणत्या वेळेला)
४) तुझ्या वडिलांनी जर वेळीच मदत केली असती तर मी (कुठल्या) कुठे (म्हणजे नक्की कुठे?) पोचलो असतो?
५) माझं ऎकलं असतं तर किती फ़ायदा झाला असता.

शब्दांचा गुंतावळा

माणूस कशात गुंततो? एखादेच स्मितहास्य, वेगळे असे समर्पक वाक्य, नजरेच्या कप्प्यातून दिसणारी एक चोरटी झलक, ओझरताच होणारा हळवासा एक स्पर्श, टाळ्यांनी मिळालेला उत्फ़ूर्त प्रतिसाद, की डोळ्यातून ओसंडणारा स्निग्ध भाव, मुग्धाळलेल्या चेहर्याचा एक flash-back, अजून पुढे बोल ना सुचविणारे अविर्भाव, कशाकशाचे म्हणून नाव घ्यावे?
मजा अशी आहे की शब्दांचा गुंता करणारा त्यातून सरळपणे निघून जातो आरपार . आपल्या स्त्रीसुलभ हालचालींनी केशकलाप नीट करणारी मोहिनी नंतर केसांचा गुंता करून तो अलगद खिडकीतून बाहेर टाकणारी पण सहज होते नामानिरळी. पण नजरेत अडकून शब्दात फ़सणारेच फ़ार गुंता करतात आयुष्याचा! बरेच जण धारदार शब्दांची करवत अशी काही चालवतात की डोळ्यात पाहण्याचा व तदनंतर अडकण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तर काही अतिउत्साही डोळ्यांकडे किंवा डोळ्यांमध्ये न बघताच शब्दांचा दांडपट्टा असा काही चलवतात की त्यात अडकण्याचा कुठे मागमूसही नसतो. एकतर्फ़ी लिहीलेल्या प्रेमपत्रांमधून शाळा कॉलेजचे विद्यार्थी प्रेमाच्या नाही तर प्रिंसीपॉलच्या जाळ्यात अडकतात. लग्नानंतर "जबाबदारी घेतो" हे दोन शब्दं आयुष्यभर पेलावे लागतात.
कितीही कलंदर असला कलावंत तरी contract च्या शब्दांच्या चौकटीत अडकून प्रतिभा पणाला लावतोच. "शब्द दिला" म्हणून प्रेमात किंवा मैत्रीत नुकसान करून घेणारे नेहमीच बघत आलोय आपण पण मी त्याला शब्द द्यायला चुकले म्हणून हळहळणार्या व्यक्तिही कमी नाहीत या जगात.
निबंध म्हंटला की ५०० शब्दांच्या चौकटीत अडकायचो. कादंबरी म्हंटली की ५०० प्रिंटेड पानांच्या जंजाळात कादंबरीकार वर्षभर तरी अडकतोच.नाटकात किंवा सिनेमात अडकणारे नट आपण नेहमीच पाहतो पण dailogue लिहून देण्यासाठी आपापल्या खोलीत काम संपेपर्यंत अडकवून घेणारे dialogue writers या दुनियेत आहेतच.

कमी पडलेत शब्द तर कविता
जास्तं सुसंबध्द केलेत तर लेख
पसारा मांडला शब्दांचा तर दीर्घकथा
वाहवत गेला समुद्रासारखा तर कादंबरी!

शब्दच ते पण त्याची रुपे किती?
जिव्हारी लागला तर बाण
हसवलं तर डायलॉग
फ़सवल तर थाप
थिजवल तर शाप
चिंब भिजवलं तर भावनात्मक लेख
विचार करायला लावलं तर कोडं
लिहायला लावलं तर विचारांच झाड

लहान मुलांसाठी बडबड गीत
सासरी जाणार्या मुलीच्या आईसाठी डोळ्यांचे "डबडब " गीत
प्रेम सफ़ल जाले तर तरंगवणारे काव्य
प्रेम विव्हळ झालात तर गझल
प्रेम उगाळत राहिलात तर लैला मजनू

कॅलीग्राफ़ीतूनही खुणावणारे शब्दंच!
neon signs मधून लक्श वेधून घेणारेही असतात शब्दंच.
वक्तेही बोलणार असतात "दोन शब्दं"
दु:खात धीर देतात थोरा-मोठयांचे "चार शब्दं"
वादविवाद झाला तर वाढतो शब्दाने शब्द
पण तरीही शेवटी आपल्याला नि:शब्द करतात ते शब्दच!

गरम गरम

का असं नाही होत? जेव्हा आपल्याला भूक लगते तेव्हा आपण लगेच काहीतरी गरम गरम करून खातो तसं जेव्हा काही लिहायची भूक लागते तसं लगेच instant का नाही सुचत? विचारांची कढई तापलेली असते, पेनची शाई तेलाचं काम करते, कागदाच्या बेसनात भिजवून विचाराची भजी का नाही तळून घेता येत?

तसं तर आपल्या डोक्याच्या कपाटात कोणत्याही ईतर कपाटात नसतील ईतके जिन्नस अनुभवाच्या गाठोड्यांमध्ये साठवून ठेवले असतात. फ़क्तं गाठी सुटत नाहीत. वस्तू नीट ठेवलेल्या नसतात. जर वस्तू मिळाल्यात तर त्याला कॉमेंटस आणि टॉंन्टस ह्याची जी फ़ोडणी बोलताना मिळते ती लिहीताना मिळत नाही. समोरच्याची appreciative नजर आणि तिची लिंबू कोथिंबीर त्यावर पिळून मिळत नाही. हे सगळं मिळालं तर योग्य वेळेची डिश मिळत नाही. शिवाय वा! किंवा काहीतरीच असे चमचे पाहिजे खताना तेही जरा दुष्प्राप्यच असतात.

तरीही माणसं लिहीत असतात त्याला लोक शिळंपाकं समजून तोंडी लावतात, अर्धवट खाऊन ्फ़ेकून देतात. क्वचित आवडलं तर मनात ठेवतात आणि पुढला पदार्थ तितकाच चांगला झाला नाही तर नावं ठेवतात. शेवटी पोटाची भूक विचारांची भूक ही मणसाला नवीन नवीन पदार्थ करायलाच लावते. चुली वेगवेगळ्या पेटतात, तेल तूप ओतायचे थांबत नाही, डाळी बेसन, वाटून यायच्या थकत नाही, मग वेगवेगळ्या भाषांची कांद्याची भजी बरी बंद होतील?