Friday, April 11, 2008

शिरा

नागपूरकडची एक (वेंधळी) देशस्थ फ़ॅमिली. स्थळ किचन. वेळ (नेहमीचीच) घाईची. दोन व्यक्तिंना तीन ठिकाणी जायचेय कारण एकाला उशिर झालाय नेहमीप्रमाणे.

" अरे देवा जाताना साखर खाऊन जा. समोरच्या डब्यात आहे वरच्या फ़ळीवर. खायचं नाव घेतलं आहे तर साखर तरी खाऊन जा,"
"कशाला नाट लावतेस. मला ब्रेडच हवी. ए सुमा, तो तवा काढ. मी वरनं तूप काढते ब्रेडसाठी."
" हे काय, तव्यावर ब्रेडऎवजी साखरेच्याजागी हे कसलं पीठ ओतलय? त्या धांदरट दिलप्याचाच काम असणार हे. "
" हे बघ ते जळतय पीठ का काय ते. आता ह्या दिलीपला फ़ोनवर आत्ताच बोलायचं काही अडलं होतं का? "
"आई, तूप वरून काढताना थोडं सांडल बघ. काही तव्यावर, काही जमीनीवर."
"थोडं काय गधडे, तो तवा भरला बघ तूपाने. आता काय करणार त्याचं?"
"ओत ते भाजलेलं पीठ ह्या परातीत."
"मी वेगळी काढून ठेवलेली पीठी साखर कोणि ढापली? ह्या परातीत ठेवली होती."
"हे त्या शालूचच डोकं असणार. पहायचं नाही काही नाही अन टाक म्हंटलं तर टाकायच परातीत. आता ती साखर विरघळली असणार त्या पीठात"
" अरे कोणितरी मीरी म्हणून वेलची कुटून ठेवलीय ह्या डबीत. हा बघ हा अजय खेळतोय त्या डबीशी मघापासून. दे रे ती डबी. काढलं बाई झाकण ह्या गुलामाने. अरे अरे काय करतोस हे. ती वेलची पूड फ़ेकली त्याने त्या पीठात."

" हे घर आहे की बाजार. ब्रेड दिसत नाहीय, तूप सांडलय, साखर लपलीय आणि आता वेलची पूडही नासवलीन. ओत हे सगळं त्या दिलप्याच्या घशात आणि जा म्हणाव interview ला."
"या अजयकडे बघ. तोंडात बोकणा भर्लेला दिसतोय कसलातरी. आणि हसतोय लबाड."
"आई, हा अजय बघ, तोंडात बोट नाही घालू देत मला काय खातोय ते काढायसाठी. हे बघ अजून एक लपका हाणला त्याने परातीतला."
" बघू मला त्याने काय खाल्लंय ते. नाहीतर पोट बिघडेल त्याचे. अरे वा!. हे तर फ़र्मासच झालय. उगाच नाही ह्या नखरेल कार्ट्याची खुषी दिसतेय ती. तू पण बघ एक घास खाऊन."
" आई ह्याला काय म्हणायच?"
" हा सगळ्यांच्या पोटात सहज शिरतो आणि आवडीने तेथे राहतो म्हणून ह्याचे नाव ठेवू या आपण "शिरा".

तर अशा रितीने देशस्थांनी शिर्याचा शोध लावला.
पण patent मात्र कोकणस्थांनी घेतले आणि धूम फ़ायदा केला देशाचा.
(सर्व देशस्थं आणि कोकणस्थांची क्षमा मागून. हो नाहीतर कोणी माझ्यावर दावा ठोकायचा.)

No comments: