मुंग्यांच्या वारूळावर पाणी धो धो कोसळले आणी सर्वं मुंग्या गांगरून गेल्यात. ज्या मुंग्या साखर आणायला दूर दूर गेल्या होत्या, त्यांना परत येण्याचा मार्गंच बंद झाला. कामकरी मुंग्या जवळपास होत्या त्यांनी लगेच तुरु-तुरु चालत आपापले खोपे गाठले. बाळ मुंग्यांनी एकच आकांत मांडला. कोठार सांभाळणार्या मुंग्यांनी दरवाजे लावून घेतले. जो जेथे आहे तेथे त्याने पाय घट्टं रोवून उभे राहावे असे राणी मुंगीने फ़र्मान काढले. तिने अंडी देण्याचे काम तात्पुरते थांबविले. बरोबर लवाजमा घेतला आणि फ़िरतीवर निघाली. तिला खास पंखांच्या मुंग्यांनी वर उचलले आणि लगेच फ़र्मान सोडले, उजव्या बाजूला जे पाणी साचले आहे ते वारूळाला धोकादायक आहे. तेथे लगेच मोठे छिद्र करून त्यातून पाणी बाहेर जावू द्या. त्याबरोबर काही कामकरी मुंग्या वाहून गेल्यात तरी हरकत नाही पण बाळ मुंग्यांना अन कोठाराला धक्का लागता कामा नये. त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली. थोड्या मुंग्या वाहून गेल्यात. पण बाकी वाचल्या.
पाणी ओसरताच सर्वांनी कामाला लागावे हे ठरलेच होते. पण पाणी कोसळायचे थांबेचना. प्रत्येक छोट्या कोठारातील अन्नकण संपून गेलेत. हवा कोंदट व्हायला लागली. पाण्यामुळे बाहेरून मोकळी हवा येणे केंव्हाच थांबले होते. सर्व मुंग्यांना आता प्रार्थना करण्याशिवाय काहीच करता येणे शक्य नव्हते.
अखेर आठवड्याने पाणी कोसळणे थांबले. प्रथम काही मुंग्या पोहत शेजारच्या वारूळात राणी मुंगीचा संदेश घेवून गेल्या. शेजार्च्या राणीने तिच्या कामकरी मुंग्या मदतीला पाठवल्या. आता नवीन हुरूप आला. हवा मोकळी झाली. अन्नं सुकलेलं मिळालं. बाळ मुंग्या खूष झाल्या. राणी मुंगी जातीने मोठे कोठार उघडून मदतीला धावली. छोट्या छोट्या कोंदणात लपून बसलेल्या मुंग्या आता उत्साहाने समोर आल्यात. किती गेल्या, किती हरवल्यात, कोण किती कामाला आले याचा हिशोब ठेवू लागले.
ऊन आले. दणकट मुंग्या पुन्हा कामाला लागल्या. कोणी साखर आणली, कोणी रवा आणला, कोणी कणिक आणली. कोणी कोठार दुरुस्त केलं. कोणी दरवाजे ठिक केलेत. ज्याला जे जमले ते ते त्याने केले. तरीही एक्स्प्रेस मुंग्या त्यांच्या एक्स्ट्रा पायांशिवाय अडून बसल्या. पण काम अडून बसलं नाही. आता मुंग्यांच्या राज्यात आलबेल आहे. पण हल्ली प्रत्येक मुंगी कामाला जाताना वर आभाळाकडे बघून ढगांचा अंदाज घेतल्याशिवाय कामाला सुरूवात करत नाही.
हेमंत सूरत
1 comment:
लेख अतिशय सुरेख आहे, केवळ उच्च!
Post a Comment