"भरकटलेला" ब्लॉग ह्यासाठी सुरु केला कारण (माझ्यासारख्या) माणसाचे विचार कायम भर्कटलेलेच असतात.फ़ारच कमी वेळा आपण सुसंबध्द विचार करतो (आपण नव्हे मी लिहा - सौ.). क्रुती करतांनाच ती सूत्रबध्द करावी हे बाळकडू आपल्याला स्वत:च्या एकेकाळच्या झिणझिण्या (मार खाल्ल्याच्या) आजही(?) शिकवून जातात (हो कां. मग लग्नानंतर मी तेच सांगतेय ह्याचा विसर कसा पडला? - पुन्हा सौ.च!). पाच महीन्यांपूर्वी सुरु लेलेल्या "भरकटलेला" झंझावाताने थोडा(?) विश्राम घेतला. दरम्यान सुस्तावलेले विचार (हो विचार सुध्दा सुस्तावतातच. त्यांनाही सुस्तावण्याचा हक्कं आहे.) पुन्हा भरकटू लागले. पण हाय रे दैवा! युझर आयडी आणि पासवर्ड दोन्हीही पार विसरून गेलो.(बॅंकेचा पासवर्ड कसा नाही विसरत? हा टोमणा दुर्लक्षित करावाच लागला.) हा पासवर्ड वेगळा हवा म्हणून वेगळा केला. नेहमीच लिहायचे आहे म्हणून लिहून ठेवला नाही. आता भोगा आपल्याच कर्माची फ़ळे (कुठे गेले ते गीता ज्ञान!). साधारण एक आठवड्यापासून पीसी टर्मिनलशी कुस्ती खेळायला सुरुवात केली. पण एखाद्याचा पत्ता तुम्ही निव्वळ त्या व्यक्तिला एकदा भेटला आहात आणि नाव व शहर माहीत नाही यावर कसा काय शोधून काढणार? तरीही सुरुवातीचा उत्साह आणि काही तासानंतरची अवस्था (झोपाळू डोळे व त्यात काहीतरी महत्वाचे हरवल्याचा अविर्भाव सौं.ना कळतोच! )
"आता मी नवीन ब्लॉग सुरु करतोय. काय नाव ठेवू?"
"विसरलेला ठेवा म्हणजे आठवायला सोपा जाईल".(बोचकारण्याची अशी सुवर्णसंधी सौ. थोडीच सोडणार)
"त्यापेक्षा बाबा हरवलेला ठेवा. आधीच्या नावाला जास्तं मॅचिंग होईल" (टिनएजर मुलगी मॅचिंगशिवाय दुसरे काय सांगणार.)
नाईलाजाने "भारावलेला" नाव ठेवलं. (कानात एक कॉमेंट घुमली - नाहीतरी माझ्यामुळे तुम्ही फ़ारच भारावून जाता.)
ईतरांमुळे आपण फ़ार भारावून जातो. कलीगने सांगितलेली ट्रॅजेडी, मित्राने कानात ओतलेली सिनेमाची स्टोरी, शिरीष कणेकरांची वात्रटिका, पं अरविंद गजेंद्रगडकरांची सुरस रम्यं अरबी घोड्याची गोष्टं, सानियांच्या कथांमधील नात्यांचे अधीकच गूढ होणारे वेगवेगळे पदर, ईतरांच्या आत्मचरित्रांमधील सॉफ़िस्टीकेटेड "लाल", ह्या सर्वांनी मी तर फ़ारच भारावून जातो हे मला आधी कळण्यापेक्षा मित्रांनीच ओळखून "बहकलेला" हे टायटल सुचवले असते.
रोज लेक्चर घ्यावे लागते तेव्हा "बकलेला" का नाही?
त्यावरून सुचले,
शाळेत जाणार्या मुलाने ब्लॉगचे नाव ठेवावे - "घोकलेला"
प्रेमात मार खाणार्याने - "पोळलेला"
दुसर्याच्या प्रेमावर वाईट नजर ठेवणार्याने - "जळलेला"
लग्नं होवून कायम बायकोचे ऎकणार्याने - "पाळलेला"
नको त्या व्यक्तिवर पन्नास टक्के प्रेम करून नकार ऎकणार्याने - "होरपळलेला"
सफ़ाई कामगाराने सुरु केलेला ब्लॉग - "मळलेला"
नुसत्या कामाचे नाव ऎकताच हतबल होणार्याने - "गळलेला"
सूरतला भज्यांवर दोन बंगले बांधणार्याने - "तळलेला"
तुरूंगात कायम राहणार्याने - "अडकलेला"
आता वाट बघताहेत शब्दं "कळकलेला", "हडकलेला", "उतलेला", "मातलेला", "फ़सलेला", "फ़ेकलेला", बघू या कोण कोण त्यांना वापर्तय ते. माझ्यातर्फ़े फ़्री !
विसरण्यात एक मजा असते. पुन:प्रत्ययाचा आनन्द पुन्हा तसाच मिळतो. दर वेळेस मी आमच्या ज्या ज्या ओळखिच्यांकडे जातो, तेव्हा कोणत्यातरी एका वस्तूकडे नीट बघतो. तिचे कौतुक करतो, डिटेल्स विचारतो. दुसर्या वेळेस, दुसरी वस्तू बघून विचारतो.
"छान आहे. केंव्हा आणली?"
"आधीचीच आहे."
"मग जागा बदलली असेल".
"गेल्या पाच वर्षांमध्ये त्या वस्तूला कोणीही तेथून हलवले नाही."
(मीच फ़क्तं हलतो. गेल्या जन्मी अर्जुनासारखं फ़क्तं माशाचाच डोळा बघायची सवय आणि तेही ईतर माशांना विसरून! हे या जन्मातही सोबत करतय तर.)
चेहरे ऒळखणे हेही माझ्यासाठी एक दीव्यंच! सांगून खरं वाटणार नाही पण सांगण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करतो.
सन १९७३. वेळ सायंकाळची. मित्रमंडळीत चालणारी त्यावेळेसची एकमेव लक्झुरी म्हणजे रेकॉर्डप्लेयर्वर हिंदी सिनेमांची गाणी ऎकणे. एक गाणं ऎकताना मी उद्गारतो, "काय नाचलीय बबीता ह्या गाण्यावर!" (बबीता म्हणजे लोलो ऊर्फ़ करिष्मा किंवा बेबो ऊर्फ़ करिनाची आई. नवीन पीढीसाठी खास माहिती) . यावर सर्व मित्रं एकसाथ ऊसळतात,"अरे बेट्या, ती हेलन आहे. बबीता हिरॉईन आहे त्या सिनेमाची. जा पुन्हा एकदा पहा सिनेमा नाहीतर १० रुपयांची बेट." खिशात सायकलमध्ये हवा भरण्याचे वीस पैसे एवढाच माझा ऎवज असल्याने
माझ्या चेहर्यावर हार मानली तरी ती दिसत नव्हती. एक शेवटचा डिफ़ेंन्स म्हणून मी धैर्य एक्वटून बोललो, " हिरॉईन असली म्हणून बबीता काय नाचू शकत नाही का?" यावर फ़ायनल शिक्कामोर्तब झाले ह्या ब्रम्हंवाक्याने,"जोपर्यंत हेलन तुझी कॉमेंट ऎकून एखाद्या विहीरीत ऊडी घेत नाही तोपर्यंत बबीताला चान्स नाही. हा तू प्रोड्युसर झाला तर गोष्टं वेगळी!."
सन २००५. जानेवारी २ . शाळेपासूनच्या सर्वं मित्रांचे ३३ वर्षांनी गेट -टुगेदर.
"आता तरी कळले का ती हेलन होती?".
दुसरा," नसेल तर करिश्माला विचार."
तीसरा हात धुवून घेतो," छे छे सल्मानला विचार. हेलन आता त्याची मानलेली आई."
"नको, ऊगाच विवेक ओबेरॉय त्यात ओढला जायचा" चवथ्याने पण संधी सोडली नाही.
मला आता तरी ती हेलनच हे ऍक्सेप्ट करण्यावाचून गत्यंतरच नव्हते.
ह्या सर्वांवर कळस झाला तो २००२ साली. फ़ॅशन शो म्हणजे कॉलेजमधल्या बाळगोपाळांसाठीपर्वणीच! पोरीबाळींना (ईंजीनियरिंगच्या ज्यांना आम्ही काहीही दागिने घालत नसल्यामुळे लंकेच्या पार्वत्या म्हणतो) मॉड ड्रेसमध्ये, त्यांच्या नाकावरच्या चष्म्याशिवाय बघणे हे तर सर्वांचे आद्यकर्तव्यं. अशा ह्या ईव्हेंटला विद्यार्थी जज पण तेवढीच फ़टाकडी आणतात. मी आपला प्रोफ़-ईन-चार्ज पदामुळे माझ्यावरच्या एका वाक्याच्या स्वागताने त्या फ़टकडीची बोळवण करण्याची जबाबदारी पार पाडण्याची वाट बघत होतो. ठरल्यावेळेबर्हुकूम एक स्मार्ट व्हॉलंटियर एका मदालसेला एस्कॉर्ट करून येत होता. ती चंद्रिका मॉडेल्सला लाजवेल असा पदन्यास करत येत होती. एखाद्या चवळीच्या शेंगेला ऊत्तम सिल्कची साडी, स्लीव्हलेस, हाय हिल्स, पर्फ़्युम आणि मोजकेच दादिने घालून सजवले तर ती कशी दिसेल? तर तशी ती ऊर्वशीच्या अविर्भावात, मधाळ हसत, तेही माझ्याकडे बघत येत होती. मी कसाबसा प्लास्टीक स्माईल देत कोरडेपणाने उद्गारलो," वेलकम मिस. प्लीज बी सीटेड." आणि ती जवळजवळ मला खेटूनच बसली. परस्त्री जर एका फ़ूटाच्या आत जवळ बसली तर साहजिकच मला एम्बरासिंग वाटते.
बाजूच्या माझ्या मित्र कम कलीग रश्मीनला मी विचारले,"मॅडम लोणत्या कॉलेजमध्ये शिकवतात - फ़ॅशन टेक्नॉलॉजी की टेक्सटाईल टेक्नॉलॉजी?",
रश्मिन लगेच माझ्यावर ऊसळला,' अरे, मॅडम काय म्हणतोस, ती आपली स्टुडंट आहे- शमिता देसाई."
मी अवाक. भान ठेवून विचारले," कोणत्या ब्रॅंचची?"
- "सिव्हीलची! दोन वर्षांपूर्वीची ग्रॅज्युएट".
-"मग माझ्या क्लासला येत नसेल."
हे सर्वं ती ऎकतच होती(खरे संभाषण ईंग्लीशमध्येच चालू होते).
ती लगेच ऊसळून बोलली," सर, मी तुमचे सर्वं क्लासेस अटेंड केलेत रेग्युलरली." -
मग माझ्या कसे लक्षात आले नाही? मी विचार केला, नक्कीच तिने पहील्यांदा एवढे चांगले कपडे घातले असतील.
माझे विचार जसे काही जाणून रश्मिन म्हणाला," शी वॉज फ़ेमस फ़ॉर हर आऊटलॅंडिश ड्रेसेस".
आता मात्रं मला वाटंत होते की धरणी दुभंगून मला पोटात घेईल तर बरं. नेहमी बूंदसे गयी वो हौदसे नही आती म्हणतात. माझे मात्रं हौदसे गयी वो दर्यामेभी न समायी झाले.
हो पण ह्या विसरण्याच्या ढगाला एक सिल्वर-लाईनिंग पण आहे. काही मोजक्या गोष्टी मी अजीबात विसरू शकत नाही. आणि त्या मला सारख्या आठवतात हे पण सांगू शकत नाही.
क्रियाकर्म करताना समोरच्या फ़ोटोतला आईचा शांत पाणीदार चेहरा, हॉस्पिटलमधून शववाहिनीत ट्रान्स्फ़र करताना एरवी हलक्या असणार्या आईचे जड झालेले शरीर, प्रत्येक नातेवाईकाने भेटताच फ़ोडलेला हंबरडा, रडणारे लाल डोळे, पण माझ्या डोळ्यातून अजूनही ओलावा घरंगळलेलाच नाही. मी जो थिजलोय आणि थबकलोय ते मी विसरूच शकत नाही .
हेमंत पाटील
सूरत
२८ जान.०६
3 comments:
हेमंतराव,
लेख छान होता. शेवटला परिच्छेद खूपच सुंदर झाला आहे.
hello Hemant
Thanks for ur valueable comments!
u r d 1st person
now posted new one
Ur posting are reallly relalistic one i love it
u keep on writing such nice things
im not good @ posting as i am nw to blogger
Thnks for ur time
Ashwini
http://everystufffrmashwini.blogspot.com/index.html
ashwinidh@yahoo.co.in
thanks shaileshbhai and thanks ashwini. I will send a separate mail to each of you.
hemant.
Post a Comment