Friday, September 08, 2006

सूरती फ़रसाण

१९८० ला बंगलोरच्या टाटा इंस्टिट्युट (I.I.Sc ला टाटा इंस्टिट्युट म्हणतात) मधून मास्टर ऑफ़ इंजीनियरींगची पदवी डोळ्यांसमोर इतरांना मुंबई, दिल्ली, टेक्सास, ह्रोड आयलंड अशी स्वप्ने दाखवीत होती तेव्हा अस्मादिक पाय जमिनीवर घट्ट रोवून २-३ जॉब हॉपिंग करत एक दीड वर्षांनी सूरतला येऊन पोचलेत तेव्हा हा कामातून गेला हे मला सर्वांच्या डोळ्यांतून न सांगता जाणवलं. सूरतला सेटल होण्यासाठी नागपुर स्टेशन सोडले तेव्हा आईच्या डोळ्यात जे पाणी साचले होते ते शिकण्यासाठी बंगलोरला जातानापेक्षा जास्त होते हे सहज जाणवले. साहजिकच आहे, बंगलोर दोन वर्षात सोडायचे होते पण सूरत केव्हा सोडणार याची शाश्वती नव्हती. वडिलांच्या डोळ्यात एवढाच पगार नागपूरला मिळतोय तर सूरतला जाण्याची गरजच काय हे डोकावत होते. मित्रं हाच विचार करत होते की कोणीही अशी ambition ठेवतो मी मोठ्या मेट्रो सिटीन जाईन किंवा फ़ॉरीनला जाईन मग हा खुळा सूरतला जाण्याचे वेड काय डोक्यात घेवून बसलाय?
माझं उत्तर सोपं होतं. campus based life मला हवं होतं. जेथे quarter मोठे मिळणार, स्वत:चे हक्काचे सर्कल जमवणार. वेगळ्या अशा ठिकाणी माझी identity बनवणार. असे शहर, जेथे शहराचे सर्वं फ़ायदे असणार पण मेट्रो सिटीची लगबग धावपळ आणि जिवघेणी rat race नसणार, ते मला सूरतच्या रूपाने मिळाले. मग गुजराथी भाषा, नवीन लोक, नवीन जेवण ह्यांचा काहीच अडसर वाटला नाही. सूरतच काय, दूसरे कोणतेही तसेच शहर चालले असते.
लवकरच मित्रांची पत्रे यायला लागलीत. एक एक करून सूरतचा पाहुणचार घ्यायला आलेत. कॉमेंटस, गप्पांच्या फ़ैरी झडायला लागल्यात.

सूरतला यायचे कधी ठरवले?
appointment letter मिळाल्यावर!
यायचे कसे प्लान केले? आधीचे काही observation? कोणी ओळखीचे?
history मध्ये शिवाजीने लूटले होते एवढीच ओळख.
नकाशात तरी पाहीले होते का?
पोरबंदरच्या अलिकडे आहे एवढाच अंदाज होता.(तो फ़ारच चुकीचा निघाला. अलिकडे शब्दाचा अर्थच बदलेल एवढं अलिकडे निघालं सूरत.)
थिएटर्स आहेत का?
२१ आहेत.
बघण्यासारखे काही आहे का?
आम्ही सोडून काहीच नाही.

दुपारी जेवणानंतर ३ वाजताचा "चष्मेबद्दूर" टाकायचे ठरले.
१ वाजता जेवण तट्टं झाल्यावर आमच्या मित्राने जी ताणून दिली ती थेट साडेचार वाजेपर्यंत. ऊठल्यावर महाराज विचारताहेत," सूरतला ऊन्हं लवकर कलतात वाटतं?'
"आमच्याकडे या वेळेला एवढीच ऊन्हे कलतात."
"चला, चहा घेवून, सिनेमाला जाऊ. सहा नंतर फ़िरणं तरी होईल."
"आता सहाचा शो मिळेल जर चहा थिएटरमध्ये घेतला तर कारण तयार होवून पोचेस्तोवर साडेपाच होतील. बुकिंग विंडोवर काही तुमचा काका बसलेला नाही ऊशिरा पोचलो तर"
"काय एवढा वेळ मी झोपलो होतो?"
"सूरतच्या भाज्या काही उगाच नाही वाखाणल्या जात! एवढी ढेरपोटी माणसे आजूबाजूला फ़िरताहेत ती ह्या सूरती जेवणामुळेच"
सूरतची अजून काय स्पेशालिटी?

येथे engagementला "half marriage" म्हणतात.
"स"चा उच्चार "ह" असा करतात. गुजराथीत साडेसात वाजता ये असे म्हणायचे असेल तर, "साढासात वागे आवजो" असे कोणीही गुजराथी व्यक्ति म्हणेल. पण सूरती माणूस,"हाडाहात वागे आवजो" असेच उच्चारेल. sober, elegant, class हे शब्दंच सूरती लोकांच्या डिक्शनरीत नाहीत. त्याऎवजी, cheap, gaudy हेच आढळतील. general knowledge म्हणजे सिनेमा, स्टार्सची लफ़डी, कपड्यांची फ़ॅशन, गॉसिप हेच! अख्ख्या भारताचे जेवढे per capita तेलाचे consumption आहे त्याच्या दुप्पट गुजराथचे आहे. येथे तळलेले पदार्थ एवढ्या चवीने खाल्ले जातात की आम्ही सूरतमध्ये " एव्हरीडे इज फ़्रायडे" हेच बघतो. प्रत्येक गोष्ट. जराही आवडली की ती "फ़ाईन"च असते. फ़ाईन शब्द सूरतला एवढा वापरतात की आम्हाला तो आता गुजराथीतूनच english मध्ये आला हे ठामपणे वाटतेय. बहू फ़ाईन अर्थात फ़ार छान हे सर्वदूर ऎकू येतं. पण फ़ाईन आर्ट, exhibition, paintings, classical concerts हे मुळी ९०-९५ पर्यंत येथे अस्तित्वातच नव्ह्ते.
मग अस्तित्वात काय आहे? साध्या कपड्यात फ़िरणारे करोडपती, जे आठ आण्याच्या भाजीसाठी घासाघीस करतील, पण अंबालाल सारभाईचा चार करोडचा (१९८० चा)पब्लीक ईश्यू एका दिवसात over-subscribe करतील. शेअर मार्केट चे खिलाडी आहेत. लाख दोन लाखाचे शेअर चहा-पाण्याच्या खर्चाईतके पटकन घेतील. जेवायच्या वेळी गेलो तर आग्रहाने जेवायला बसवतील (फ़ार ओळख लागत नाही त्यांच्याबरोबर जेवायला.) तित्क्याच सहजतेने कोटी रुपये दान देवून टाकतील आणि बोलणार पण नाहीत.
प्लेग आणि पूर आलेत तरी भजी खायला चुकणार नाहीत. कुठे काय खायला चांगले मिळेल ते जिभेवर पक्के लक्षात ठेवतील. अमर्नाथ, वैष्णोदेवी, काश्मीर, मलेशिया, सिंगापूर सगळीकडे जणू काही घराच्या बाजूला आहे ह्या थाटात जातील. बसने प्रवास below dignity मानतील. कपडे कायम (तरूणाईचे) latest fashion चे. मोरारीबापू, स्वामीनारायण, आशारामबापू, परीकरीदेवी, ईंदिराबेटी, सर्वांकडून सत्संग आवडीने करवून घेतील.
आत्ताच्या पूरानंतरही एका आठवड्यात सूरत चालते-फ़िरते करणे हेही सूरती लोकांनाच जमते. तेही तक्रारींशिवाय. (त्याशिवाय भजी खावून मिरवता कसे येइल?)

हेमंत सूरत

2 comments:

Nandan said...

surat che, sorry hurat che varNan aavadale. paaree mithaaee baddal barech aikale aahe. aani plague nantar kaaya-paalat zalelyaa suratebaddal suddhaa. adhik vaachaayala nakeech aavadel

Tulip said...

Hemant.. blog varche sarv ch post surekh aahet. arthat ch ha lekha hi chhan! vegale nirnay ghyayala ani te nibhavayala dhadas lagte he kharech.