"किनारा - एक परीक्षण"
७८ साली "किनारा" पाहीला होत. त्यात "मांडू" दर्शन झाले. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी मांडू बघण्याचा योग याचिदेही याचिडोळा आला. साहजिकच, "किनारा" बघण्याचि ऊर्मी पुन्हा उसळून आली. नुकताच तोही मोका साधला. ह्या सगळ्यात विजय झाला तो कॉमेंटसचा! गुलझार, जीतु, हेमा, व धरम, ह्यांचि क्षमा मागून (त्यांना मराठी कळतं, व ते मला ओळखतात हे आपण धरून चालू) त्यांच्यावरच्या कॉमेंटस सादर करतोय. सुक्याबरोबर ओलंही जळतं ह्या न्यायाने ईतरांचाही त्यात समावेश करतोय. ( त्यांची वेगळी माफ़ी मगायची गरज नाही).
तमाम हिस्टरीच्या प्रोफ़ेसर्सचा तेव्हा किती हेवा वाटला होता. हेमा ज्या धरमच्या प्रेमात पडते तो चक्कं हिस्टरीचा प्रोफ़ेसर! जीतेंद्र हा आता मात्र हेमाचा धाकटा भाऊ दिसतो. संपूर्ण सिनेमात तो गुलझारला किंवा ऍक्टिंगला शोधतोय असंच वाटतं. गुलझारनेच केलेली जीतुबद्दलची कॉमेंट आधी देतो. "जीतेंद्र हा असा कलाकार(?) आहे जो रडला की पब्लिक हसते आणि तो हसला की जनता रडते. त्याची ही शोकांतिका असली तरी लोक जीतुला पहायला का येतात हे मलाच पडलेले कोडे आहे". जेव्हा अगतिक होवुन (दुःखं दाखविण्याच्या ऍक्टिंगपुढे हतबल होवुन) तो तोंड फ़िरवतो व पाठ दिसते तेव्हा ती पाठच रडतेय असेच वाटते. कोण म्हणतं जीतू ऍक्टिंगला पाठ दाखवतो? उलट ऍक्टिंगसाठीच तो पाठ दाखवतो.
निवडणूकीत आपण दोन खराब उमेदवरांमध्ये त्यातल्या त्यात जो कमी वाईट त्याला मत देतो. तसे धर्मेंद्र आणि जीतेंद्र मध्ये, धरम बाजी मारुन नेतो. अर्थात त्याला कारण हेमा! ती समोर असल्याने धरमला प्रेमात पडण्याची ऍक्टिंग करावीच लागली नाही. तो प्रेमात पडलाच होता.
तसा गीत गाया पथ्थरोंने मध्ये दगडांच्या मूर्ती जिवंतपणाच्या जास्तं जवळ होत्या (जीतूपेक्षा) ही मल्लीनाथी चित्रपती शांताराम ह्यांच्यावतीने करण्यास हरकत नाही. गब्बरच्या भाषेत म्हणायचे झाले तर,"जीतूके ऍक्टिंगसे तुम्हे सिर्फ़ एक ही चीज बचा सकती है और वो है सिर्फ़ 'वेरूळ की लेणी'"!जीतूची आत्ताची थोरवी काय सांगावी? मला तो एका ऍंगलमध्ये त्याच्या त्यावेळच्या वाढविलेल्या केसांमुळे, तो सुपीरियर धनराज पिल्ले वाटला. माझ्या मुलीला (वय वर्षे १५) तो थोडा थोडा गांगुलींच्या सौरवसारखा भासला तर आमच्या सौंना (वय वर्षे सांगत नाही) तो लक्ष्या बेर्डेच चकवून गेल्यासारखा वाटला.
हेमा ३० वर्षांपूर्वी सौंदर्याचा पुतळा होती. आमचा बंगलोरचा रिसर्च स्कॉलर मित्र, परतीच्या प्रवासात, अती मूसळधार पावसामुळे, विजयवाड्याजवळ ट्रेनमध्ये २४ तास अडकला होता. ते २४ तास त्याने कसे काढले माहीती आहे? निव्वळ समोरच्या मालगाडीवरच्या डब्यावर खडूने लिहीलेले होते,"हेमामालिनी दुनियाकी सबसे हसीन औरत है" ह्या एकमेव युनिवर्सल ट्रुथवर!ह्याच हेमाने आमच्या एका स्कॉलर प्रकाश बापटला कसे वेडे केले होते ते आय.आय.एस्सी बंगलोरची रूम नं. एच ५० च जाणे. आयडियल फ़्लुइड फ़्लो च्या पुस्तकाला तेव्हा खूपच डिमांड होती परिक्षेच्या काळात. बापटलाही ते पुस्तक हवे होते. रात्री तो ते पुस्तक घेवून गेला आणि सकाळी ठरल्याप्रमाणे परत करायला आला तो तणतणतच!
"पाटील, ह्या पुस्तकाला तू हे फ़िल्मफ़ेअरचे कव्हर का चढवले?".
"त्यात काय, हेमामालिनीचाच तर फ़ोटो आहे".
"अरे त्यानेच तर घात केला. हेमा माझा वीक पॉइंट आहे. रात्रभर मी पुस्तकच उघडू शकलो नाही. कव्हरवरच नजर खिळवून होतो. आता परिक्षेत काय लिहू?".
"हेऽऽमा!"
अजून काही मासलेवाइक नमूने आमच्या सिनीयर मित्रांचे."वो कौन थी" मधली साधना - स्लीवलेस घालावे ते साधनानेच!हे रिंकू उर्फ़ शर्मिलाच्या एका चाहत्याने ऎकले आणि तो विव्हळला,"का? ऍन ईव्हिनींग इन पॅरीस" मधल्या रातके हमसफ़र थकके घरको चले गाण्यात, बोटीतल्या शर्मीलाचा स्लीव्हलेस जास्तं चांगला होता."हे तर काहीच नाही, अंबाडा बघावा तर असली नकली मधल्या साधनाचाच, तेरा मेरा प्यार अमर ह्या गाण्याच्या वेळचा". पुन्हा तो साधना वीर खिंकाळला.एका वेळेस शंभर सामान्यजणीतून कोणीही मिळण्याची आशा नसलेला आमचा सदाबहार मजनू मित्र "मेरे मेहबूब" बघून करवादला होता,"आपल्याला तर बुवा मेरे मेहबूब्मे क्या नही" नाचणार्या दोघीजणीत कोणाला सिलेक्ट करावे ह्याचा प्रश्नच पडणार आहे.
अभिजात सौंदर्य म्हणजे जाडं, स्थूलत्वाकडे डोकावणारं, हे नंदा, मीनाकुमारी, हेमामालिनी, हे समीकरण "घर" मध्ये अचानकच "रेखा"ने तोडल्यावर ती खरोखरंच किती खूबसूरत आहे ह्यावरच कित्येकांनी तोंडसुख घेतले. जयाप्रदाने श्रीकांत नाहटाच्या प्रेमात स्वतःला पागल केले हे वाचून, आय.आय.टी.तला आमचा मल्लिकर्जुन, रूममधली जयाप्रदाची सर्वंच्या सर्व पोस्टर्स काढून २ दिवस खिन्नं बसला होता.
तीच ती कालची सुंदर वाटणारी हेमा आज तिचे कपाळच नव्हे तर भाग्य पण थोडे आत गेल्यासारखे वाटते. शरीर बोजड वाटते. तिच्याऎवजी राखी असती तर तिने भूमिकेला जास्तं न्याय दिला असता हेही चटका लवल्यासरखे तरळून जाते.
खरा हिरो, बघण्याचा, मांडू! ऎकण्याचा खरा हिरो, आर्डी बर्मन! आजही त्या गण्यात हरवून जातो. "नाम गुम जायेगा" ही पॉकेट मनी ची रक्कम खर्चं करून पार्टिंग गिफ़्ट म्हणून अशोक कुमार सिंगला दिलेली एल्पी रेकॉर्ड वाया गेलेली वाटत नाही. आणि ह्या सर्वं उण्यादुण्यावर पांघरूण पडतं.
गुलझार ऎवजी आमची सौ. जर डायरेक्टर असती शेवटच्या प्रसंगात, तर तिने म्हंटलं असतं, हेमाच्या आईच्या तोंडून, हेमाला, (वीमेन्स लीबच्या सर्वं कार्यकर्त्यांची क्षमा मागून)"अगं भवाने, आधीच त्या धर्मेद्रला खपवलंस, आणि त्यात आता डोळे घालवलेन! बरं तर बरं, तो जीतू आपणहून तुला पत्करायला तयार आहे. आणि तू, कलमूही, दिलजली, त्याला नाही म्हणून पर्तवून लावतेस? असेल रूप दिलं तुला, पण तुला "हो" तरी म्हणणार कोण? बराय आर्किटेक्ट आहे, दिवसभर पडून राहील ऑफ़िसमध्ये, घर ठेवेल सुबक,आणि वस्तू जागच्या जागी! तुला आंधळीला सगळं बरोबर सापडेल. चल मुकाट्याने "हो" म्हण आणि गाठ त्याला मंदिराच्या पायरान्वर आणि लाव लग्नं तो "रामदास" होण्या आधी. बाइ गं, बाइच्या जन्माला आलीस आणि असं भरलं ताट लाथाडून तरी कसं जाता येतं तुला?"
मग येइल गोड शेवट!
सिनेमाचा आणि परीक्षणाचा!
हेमंत पाटील - सुरत
2 comments:
आजकाल अभीनेत्यांचे रुपांतर सिनेतारकांमधे झाल्यामुळे अभिनयाची अपेक्षाच राहीली नाही. त्यामुळे धर्मेंद्र, शर्मिला, बबीता यांची पुढची पिढी सिनेसृष्टीत चमकत आहेत. आणि आता स्लीव्ज काढून स्लीवलेस करयला मुळात ब्लाऊज असावा लागतो.
डॉ., आम्ही तुमच्या नवीन लेखाची वाट पाहतोय.
Post a Comment