Thursday, March 02, 2006

कधीतरी काहीतरी
माणूस जन्मतो तेव्हा तो कुणीच नसतो. माणूस जातो तेव्हा तो कुणीतरी असतो. हा जो "तरी" आहे तोच महत्वाचा आहे. अरे काहीतरी करा रे असे आजोबा सारखे ओरडायचे काकांना. कारण त्यांनी कुणीतरी व्हावं अशी त्यांची ईच्छा. माणसाने सतत काहीतरी केलं पाहीजे तरच तो कुणीतरी बनेल. अरे कसातरी अभ्यास करु नका नाहीतर काहीतरीच व्हाल हे सर्व सांगायचे. कसातरी जगु नको कोणीतरी होऊन जग. पण हे कसं जमायच? काहीतरी करताना कसंतरी होतं आणि पुढे मातेरं होतं. स्वयंपाक कसातरी केला तर चालतो पण चव चांगलीच असते, "काहीतरीच" नसते. डॉक्टर काहीतरी करा पण माझ्या मुलाला वाच्ग्वा, एक बाप म्हणतो. डॉक्टर मनात म्हणतात,मी त्याला कसातरी वाचवला हे कुठे तुला माहीत आहे. ह्या कसंतरी, कुणीतरी, काहीतरी वरंच सर्व जग चालले आहे. कुणी कसंतरी वागलं तरी वरती "तो" कुणीतरी आहे ना, तो बघून घेईल. "कुणीतरी काही मदत करा रे", भिकारी म्हणतो. तो भिकारीच असतो म्हणून कसातरी राहतो, कुठेतरी झोपतो. पण तो कुणी "रामन राघव" त्याचा खून करतो, तेव्हा तो कुणीतरी बनतो, ज्याचा एक दिवस पेपरमध्ये फोटो येतो. कुणीतरी माझ्याकदे पाहील म्हणून स्त्री नट्टापट्टा करते. कुणीतरी माझे कौतुक करेल म्हणून मूल आजूबाजूला बघते. कुणीतरी माझा सांभाळ करेल म्हणून आईवडिल मुलांकडे बघतात. कुणीतरी चांगलं म्हणेल म्हणून सर्व झटत असतात. तसं करताना काहीतरी वाईट होऊ नये म्हणून बायाबापड्या प्रार्थना करतात. माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं, ह्यांनी बाजारातून काहीतरीच आणलं, ह्यांचे मित्रं कसलेतरीच आहेत, पोटात कसंतरीच झालं, पेपर कसातरीच गेला, रिझल्ट कसातरीच लागला, गाणं कसंतरीच झालंय, बक्षिस काहीतरीच दिलं, फ़ोटोत कसातरीच आलोय. काहीतरी लिहायला बसलो, तेव्हा "कवडसा"त कसंतरी आणू नका, आणि कुणीतरी चांगलं म्हणेल असं लिहा, असा आदेश "कुणीतरी" दिला. आता तुम्हीतरी चांगलं म्हणा नाहीतर माझा चेहरा कसातरीच होईल.
हेमंत पाटील७ जानेवारी २००६

No comments: