Saturday, December 23, 2006

एक छोटीशी दुरुस्ती - गॉसिप सूरत स्टाईल - ४

फ़िरोझ खान व संजय आधी मुमताज बरोबर काम कराय्चे (मेला, उपासना एत्यादी). पण लग्नं केले नंतर संजयशी ते झीनत अमानने व त्याचा फ़ायदा उचलला फ़िरोझ खानने "कुर्बानी" मध्ये.

Wednesday, December 20, 2006

ऊखाणे - मॉडर्न - महाभारत, रामायणातले

ऊखाणे सीतेचे,ऊखाणे द्रौपदीचे, रामायणातले, महाभारतातले,
ऊखाणे उर्मिलेचे, ऊखाणॆ सर्वांचे, फ़क्तं आताच्या परिस्थितीतले.

हा उखाणा द्रौपदी प्रत्येकासाठी नाव बदलून दर ७३ दिवसानी घेत असणार.

धर्म, भीम, नकुल, सहदेव छळतात मला पदोपदी,
अर्जुनाचे नाव घेते, त्याचीच फ़क्तं मी द्रौपदी

हा ऊखाणा कैकयीचा.

चाकात बोट घालून लढविला मी रायांचा रथ,
रामायण तिथेच झाले सुरू, म्हणतात कैकयीचे दशरथ.


हा अर्थातच सीतेचा

वन्सं नको, वन्सं नको, जनकापाशी धरला हट्टं,
तीन तीन सासवा बघून, खवळले सीतेचे पित्तं!

एका धोब्याने केली कसली ती चुगली,
धाडले की हो रामाने मला त्या जंगली

कधी नव्हे ती एकच फ़क्तं मागितली हरणाची काचोळी,
रावणाकडल्या बंदीवासाने श्रीरामांनी भरली माझी झोळी

कितीही सेवा करून वाढविला मी श्रीरामांचा मान,
बळकावून नेतो श्रेय तो प्रभुंचा हनुमान!

रामराज्य रामराज्य म्हणतात तेव्हा होतो माझा जळफ़ळाट
जंगलात राहून झेलला मी एका धोब्याचा तळतळाट.

हा वालीच्या (आणि सुग्रीवाच्याही) बायकोचा

दोन भावांच्या भांडणात घालमेल की हो झाली,
वाली गेल्यावर सुग्रीवच झाले माझे वाली.


हा शबरीचा टोमणा (ऊखाणा नव्हे.)

नेहमीच बोरे आंबट, ऎकून घेईन मी बरी,
रामासाठी उष्टावून गोड तेवढी ठेवते शबरी.


हा मंदोदरीचा रावणासाठी

शूर्पणखेच्या कापलेल्या नाकाचा रावण घ्यायला गेले बदला,
सीतेला अशोक्वनात ठेवून म्हणतात मंदोदरीला बदला.


हा असाच, जर जटायूची बायको असती तर!

पुष्पक विमानात बसवून नेले सीतेला वेगे वायू,
नाहक प्राण गमावून बसला मधल्यामधे जटायू.

हा सीतेचाच.
मान न मान मै तेरा मेहमान,
सीतेला हटवून घुसला रामाच्या ह्रुदयात हनुमान.

आपण कोण म्हणून लव-कुश असतील अज्ञ,
घोडा अडवून थांबविला रामाचा अश्वमेध यज्ञ.


ही उर्मिला बरं का.
कोण म्हणतो राजवाड्यात घडत नाही वनवास,
लक्ष्मण गेले रामाबरोबर, उर्मिलेला वाटतं भकास.

गॉसिप सूरत स्टाईल - ४

अशोककुमार हा तसा वादातीत नट. त्याचे नाव कुठे कोणाशी जोडलेले फ़ारसे ऎकिवात नाही. पण याच अशोककुमारने स्वत:च्याच एका interview त सांगितले होते की एकदा त्याच्याच बायकोने नको त्या (अती ) संशयाने आपल्याच नवर्‍‍यावर, म्हणजे अशोककुमारवर, त्याचे निरूपा रॉयबरोबर लफ़डे आहे असा आरोप केला होता आणि तिला समजावता समजावता त्याच्या नाकी नऊ आले होते. अंबानी बंधूंपैकी एकाची बायको, धीरूभाईची सून, टिना, ही एके काळी, आपल्या लाडक्या(?) संजूबाबाची hot flame होती. रॉकीमध्ये तिला जो ब्रेक मिळाला त्याच्याबरोबर तो संजूबाबामुळेच. पुदे तिने राजेश खन्नाबरोबर life मध्ये break मिळताच, संजूचे हार्ट break केले. ती दोघे जेव्हा खंडाळ्याला एकत्र कारमधून जात होती तेव्हा त्यांच्यामागून संजूबाबाच जात होता, मित्रांनी सांगितलेल्या बातमीवर विश्वास नं बसल्यामुळे चेक करायला.टिना-राजेशचा कारमधला प्रणय पाहून, संजूचे डोळे उघडले ते वारंवार मिटण्यासाठीच. टिना व राजेश यांनी प्रेमाची व्याख्या नवीन केली होती. ते दोघे एकच tooth-brush वापरत होते. तुमचे आमचे प्रेम क्षुल्लक! कारण तुम्ही आम्ही वेगवेगळे ब्रश वापरतो.

पुढे राजेश खन्नाला सोडून तिने अंबानी घराण्याशी घरोबा जोडला, तेव्हा राजेश खन्ना म्हणाला होता, अंजू महेंद्रूला मी सोडले, डिंपल व मी समजून वेगळे झालो, पण टिनाने मला सोडले. circle पूर्णं झाले. फ़िरोझ खान व मारिओ मिरांडा हे एकेकाळी मुंबईत रूम-मेट होते. एका लॉजमध्ये. दोघेही तेव्हा खूप मोठे होण्याची स्वप्ने पाहत होते. दोघेही कफ़ल्लक आणि भणंग(संपत्तीने, टॅलंटने नव्हे), . पण दोघेही दुर्दम्य आशावादी! पुढे दोघेही आपापल्या क्षेत्रात topला पोचलेत.हाच फ़िरोझ खान जेव्हा आपल्याच भावाबरोबर, संजय(ऊर्फ़ अब्बास) खान competition मध्ये acting आणि roles करत होता तेव्हा मुमताज त्यांच्यामध्ये common होती. लग्नं तिने संजयशी केले पण फ़ायदा उचलला फ़िरोझ खानने कुर्बानी मध्ये expose करून. विचार करा स्वत:च्या वहिनीला असा कोणी दिर expose करू शकेल का? पण exactly तशीच कानकोंड्यासारखी हकीकत झाली अनिल कपूरची जेव्हा त्याच्या भावाने, बोनीने, श्रीदेवीशी, अनिलच्या गाजलेल्या नायिकेशी लग्नं केले. अनिल कपूर sensitive म्हणून तो असं बोलला की एकाच घरात मी आणि माझी वहिनी राहतोय जिच्याबरोबर मी hot scenes केलेत मला किती embaraassing वाटतं म्हणून सांगू. खरं तर अनिल कपूर हा कपूर आडनावाला शोभा देत नाही. कारण राज कपूरच्या घराण्यात, हे सर्वं common आहे.

गीता बालीने राज कपूरबरोबर जोडी जमवली screen वर (पहा बावरे नैन) पण प्रत्यक्षात ती शम्मीकपूरची बायको झाली. नीतु सिंग ने पदार्पण केले रणधीर कपूरबरोबर(रिक्षावाला सिनेमात), गाजवला screen शशी कपूरबरोबर(दीवार आणि ईतर काही), ऋषीच्या काकाबरोबर. सून झाली ती ऋषीमुळे! बबिता ही याला अपवाद नहती. तिने शम्मी कपूरबरोबर हिट सिनेमे(तुमसे अच्छा कौन है) दिले आणि settle झाली रणधीरबरोबर. ऋषीने त्याच परंपरेत, screen chemistry जमवली पद्मिनी कोल्हापुरेबरोबर(प्रेमरोग,जमाने को तिखाना है), पण तेव्हा ती चिंपू कपूरबरोबर involved होती आणि पुढे कपूर खानदानाची बहू होता होता वाचली. महान दिर-भावजय, आणि काका -पुतणसून परंपरा आपल्याला राज कपूरने दिली आहे याचे भान आहे का कोणाला?

Sunday, December 17, 2006

गॉसिप सूरत स्टाईल - ३

सूरत म्हंटलं की संजीवकुमार आठवतो. सूरतला संजीवकुमार रोड पण आहे एक त्याच्या स्म्रुतीप्रित्यर्थ! पण सूरती लोकांसाठी तो संजीवकुमार नाही तर आपडो हरीभाई (जरीवाला). हाच संजीवकुमार ह्या जगात एकटाच आला आणि एकटाच(लग्नं नं करताच!) गेला. जाताना त्याने ह्या एकटेपणाशी जो सामना दिला तो जरूर appreciate करण्यासारखा आहे. त्यातून त्याचा निरागसपणाच दिसतो. एकट्यातून दुकटं होण्याची एक धडपड दिसते.

फ़ार पूर्वी जेव्हा संजीवकुमार सिनेमाच्या glamorous world मध्ये राहूनही स्वत:ला एकही नटी बायको म्हणून वश का होत नाही हे रडगाणे मित्रांसमोर गात होता तेव्हा एका मित्राने त्याला सल्ला दिला," त्यात काय आहे, उद्या तू एक सुंदरशी आणि महागडी साडी घेऊन ये. त्याला एक चिठ्ठी लाव, जी कोणी सुंदर व्यक्ती ही साडी घेऊन जाईल ती mrs. sanjeevakumar होईल. बस सेटवर हे तू उद्या करच. " झालं. संजीवकुमारने त्याप्रमाणे एक भारीशी साडी चिठ्ठी लावून सेटवर प्रतीक्षा करत बसला. तिकडून सायरा बानू आली, तिने ती साडी पाहीली, उचलली, चिठ्ठी वाचून दूर भिरकवून दिली आणि संजीवकुमारच्या ह्रुदयावरून आपला bulldozer चालवात दुष्टपणे निघून गेली.

एवढ्यातेवढ्यावरून निराश होईल तो संजीवकुमार नव्हताच. पुन्हा त्याने रडगाणे मित्रांसमोर गायले. पुन्हा मित्रांनी सल्ला दिला, "अरे, heroinला जरा प्रेमाने जास्त जवळ घे love scenes च्या वेळेस. तुझे प्रेम जरा तिला जाणवू दे. मग पहा ती तुझ्या गळ्यात पडते की नाही ते. " लगेच आपला संजीवकुमार 'देवी' च्या सेटवर दुसर्या दिवशी नूतनबरोबर काम करताना ते लक्षात ठेवून वागला. काय आश्चर्य? नूतनने लगेच संजीवकुमारच्या श्रीमुखात भडकावली व त्याच्याबरोबर पुढे काम नं करण्याची शपथही घेतली.

अशी कितीतरी encounters सहन करत करत जेव्हा संजीवकुमार ह्या नावाला वलय लाभले तेव्हा परिस्थिती बदलली. सुलक्षणा पंडित संजीवकुमारला त्याच्या घरच्या पार्ट्यांमध्ये हवं नको ते बघायची. त्याच्याबरोबर आयुष्यभर राहण्याची तिची तयरी होती. पण हाय रे दैवा! येथे संजीवकुमारची आई आडवी आली असे म्हणतात. तिला सुलक्षणा सून म्हणून नापसंत होती. सुलक्षणाचे हे दुसरे अपयश! आधी ती किशोरकुमारच्या orchestraa बरोबर रहायची. त्यांचा 'झिम ना झिम झिम झिम नाला' ह्या गाण्यावर अख्खी vrce annual gathering मध्ये डोलत होती १९६८ मध्ये त्यात माझ्या काकांच्या क्रुपेने मी पण होतो. दोन दिवस आम्ही त्याच गाण्यावर तरंगत होतो.

त्यानंतर आली संजीवकुमारच्या आयुष्यात नीता मेहता. कर्ज आठवतो? त्यात तीच त्याची बायको होती. पण तिला डोळ्यांचा solid problem झाला आणि तिला screen पुरतंच त्याची बायको होण्यावर समाधान मानावं लागलं. हाच संजीवकुमार त्याच्या मित्रांमुळे शेवटी गेला. त्याची byepass झाल्यावर मित्रांनी त्याला ओली पार्टी द्यायला लावली. लगेच ईंद्रदेवालाही त्याची स्टाईल आवडली अन त्याने संजीवकुमारला सोमरस प्यायला वर बोलावून घेतले दुसर्या दिवशी! आमच्या भाषेत संजीवकुमार सदेह सबाटली वैकुंठाला गेला.

हे सर्वं खरंही(?) असलं तरी संजीवकुमार हा आजही लाडका आहे actors चा actor म्हणून! परिचय मधला बाप, मौसम मधला बाप आणि ऍक्टिंमधलाही बापच!

Sunday, December 10, 2006

बाबांचा अभ्यास?

स्थळ : सूरत, वेळ : संध्याकाळची, ग्रूप : वात्सल्य, बडबडीचा मुद्दा : लहान मुलांचे problems.

दोन तास मुलांचे problems समजून घ्यावे कसे एक पालक म्हणून हे डोक्यावर hammer झाल्यामुळे, मी आम्च्या सिद्धिबरोबर (वय वर्षे सहा) बोलायला सुरूवात केली. आणि अहो आश्चर्यम! मला माझ्या कामाबद्दल एक वेगळाच view मिळाला.

मी: लहान मुलांना किती प्रॉब्लेमस असतात. रोज सकाळी उठायचं. अन कित्ती कामं असतात. ब्रश करायचं. अंघॊळ करायची. मग शाळेचा uniform घालायचा. लंच बॉक्स घ्यायचा. दप्तर घ्यायचे. पाण्याची bottle घ्याअयची. home work झाले की नाही चेक करायचे. रिक्षामध्ये बसायचे. दहा बारा मुलांबरोबर दाटीवाटीने बसायचे.

सिद्धी : हो नं! आणि तुम्हा मोठ्या माणसांना काहीच काम नसतं. सकाळी उठता. आयता चहा पिता. आईने बनविलेला नाश्ता खाता. ऎटीत स्वत:च्या कारमध्ये बसून कामाला जाता. संध्याकाळी घरी येताच म्हणता , "थकलो. काहीतरी खायला दे. " बरं काही मेहनतीच tension च काम तर काही करत नाही. बसून तर असता टेबल- खुर्चीवर.

मी : आणि माझा अभ्यास! तो कसा असतो?

सिद्धी : तुमचा काही अभ्यास असतो का? एवढी घरात पुस्तके आहेत. जाडी जाडी. तुम्ही काय कोणतंही पुस्तक कधीही घेता. त्यातील कोणतंही पान काढता. मी बघते, तुम्ही एका तासात दोन पाने फ़ार तर वाचता नाहीतर दोन तासात दीड पाने लिहीता. हा काय अभ्यास आहे?

मी : मग कसा असतो अभ्यास?

सिद्धी : अभ्यास म्हणजे नीट होम वर्क दिलेलं असतं. प्रत्येक सबजेक्टच एक पुस्तक असतं. एक वही असते. त्यात सगळी प्रश्नोत्तरे लिहायची असतात. दोन तासात वीस वीस पाने लिहावी लागतात. तेव्हा कुठे अभ्यास होतो.

मी : मग मी येऊ का तुझ्या शाळॆत? अभ्यास शिकायला?

सिद्धी : काही नको. तुम्हाला गुजराथीत लिहीता येत नाही. नापास तरी व्हाल जुजराथीत नाहीतर माझ्या पेपरमधून कॉपी करताना पकडले जाल तर माझे नाक कापल्या जाईल. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्येच बरे आहात.

दिनचर्यानिष्ठांची मांदियाळी

नंदनने Tag केले होते "पुस्तकनिष्ठांची मांदियाळी"!. मी सुचवतोय "दिनचर्यानिष्ठांची मांदियाळी". तुमच्या दररोजच्या आयुष्यातला एक typical दिवस कसा गेला. ट्युलिपला यात supreme judge करावे लागेल कारण तिच्या ब्लॉग वरील articles मुळेच हा विषय सुचला.
सकाळी ६चा गजर कानात शिरतो तेव्हा आपल्याला फ़क्तं कानच आहेत हे जाणवतं. बाकी शरीराचे अवयव हे युध्धात जायबंदी झालेल्या सैनिकाच्या स्वरूपात इकडेतिकडे विखुरलेले असतात. हळुहळू मेंदू कार्यरत होतो. हात पाय पाठ पोट सर्वं काही आपापल्या ठिकाणी रात्री जसे होते तसे आहेत याची अंधुकशी कल्पना येते. पण चहा ही एकमेव गोष्टं सर्वं आळसावर मात करायला लावते. जे काम मेंदू करू शकत नाही ते एक चहाच करू शकतो. (तिरडीवर ठेवलेल्या माझ्या कलेवराला जर एक कप चहा देतो म्हंटलं तर हा तिरडीवर उठून बसेल - माझ्या जवळच्या मित्रांची comment).
आपण आपल्याच घरात आहोत या जाणिवेने मन आळसावते आणि झोपेत चालाल्यासारखा एक human robot चहाचे सोपस्कार सुरू करतो. ओठात अडकवलेला tooth-brush, हातात चहाचे भांडे, दुसर्या हाताने गॅसला व स्वत:ला ठिणगी देण्याचे पुण्यकर्म ह्या सोपस्कारातून जेव्हा हळूच red lable चा खुमार नाकात दरवळतो तेव्हा tooth-brush जोरजोरात चालतो. ब्रश करून येईस्तोवर, दूध वरती येवू पहातं त्याला उचलून त्याच्याखालचा जाळ थोपवितो.
एक बंपर कप भरून चहा, जवळच्या बेकरीचे खारी टोस्ट, दरवाज्यात अडकवलेला पेपर सफ़ाईने काढून टेबलावर. ट्युबलाईट , पंखा हे केव्हा ऑन केलेत ते यांत्रिक माणसाला कळत नाही. पेपर वाचल्यानंतर, सत्यम शिवम सुन्दरम! (राज कपूरचा सत्यम शिवम सुंदरम पाहिल्यानंतर shit, shave, shower ह्याऎवजी सत्यम शिवम सुंदरम हीच terminology वापरतोय. nature's call हे सत्य, दाढी हे शिवम व अंघोळ हे सुंदरम!) लगेच तयार होवून अडीच किलोमीटरवर असलेल्या officers' gymkhana त दाखल होतो. थंडीतही पोहोण्याची सवय फ़ार चांगली. अख्या क्लबमध्ये मी एकटाच swimming करणारा हिवाळ्यातसुध्धा! पण त्यामुळे हा swimming pool माझा एकट्याचा असल्यासारखा. (मला आता परदेशात जायची गरज नाही. कारण तेथेही काय करणार तर मोठे घर घेवून त्यात एक स्वत:चा swimming pool बांधणार. मग हे काय वाईट आहे?)
stereoवर गाणी ऎकत रोजचा पल्ला गाठला की वर येवून, तापीच्या विशाल पात्राचे दर्शन डोळॆ भरून घेतो. क्लब तापीच्या किनार्यावर. सकाळच्या अंधूक, misty वातावरणात, अलगद नागमोडी वळण घेणारी तापी फ़ार सुंदर दिसते. जवळच्या पुलावर अजून क्लासला जाणार्यांची व सकाळचा व्यायाम आटोपून जाणार्यांची दरवळ असते.
तयार होवून परत जाताना रात्री तपासलेल्या उत्तरपत्रिकांमधील मासलेवाईक उत्तरांची आठवण गालातल्या गालात हसवून जाते. परीक्षा देताना जास्तं चांगलं होतं. परीक्षा दिली आणि उंडारायला मोकळॆ. आता नाण्याची दुसरी बाजू कळते. ती जास्तं दु:खदायक असते. 'आपुललीच प्रतिमा होते आपुलीच वैरि' प्रमाणे विद्यार्थी theoretical प्रश्नात भलतेच काही तरी लिहीतात. माझा मित्र म्हणतो त्याप्रमाणे, "तू जसं तुला पाहीजे ते विचारतोस, तसे त्यांनाही जे हवे ते लिहीण्याचे स्वातंत्र्य आहे" . कोणत्याही structure मध्ये अमुक एका गोष्टीचे महत्व विचारले की, " It is very impotant to have this in the design. As design is based on this, it is rquired to have this. However, without this, design cannot be achieved. .... Finally, it must be said that this has to be in the design" . डोक्याचं नाव कपाळ!, माठात भरलं नाही पाणी, बाप म्हणतो खोदेल सोन्याच्या खाणी! संपूर्ण पेपर तपासण्याच्या कटकटीतला हाच तो तेवढा हसवणारा प्रकार जो खरं तर black humour ह्या प्रकारात मोडतो. कारण मीच करता आणि करविता, पण शरण तुला भगवंता!
साडेनऊ वाजता डिपार्टमेंटमध्ये पाऊल टाकताच, टेबलवर, दुपारच्या मीटिंगचा फ़तवा पडलेला असतो. साडेदहाचे lecture . प्युनला सेमिनार रूम उघडून ठेवायला सांगतो. लेक्चर ची कवच कुंडले (खडू- मस्टर, वगैरे), तयार ठेवून, एक कप चहा ढोसून, दिवसाची सुरूवात होते , साहित्यीक भाषेत, मेंढरे हाकायला. आमच्या professionची "लाल" करायची तर साक्षात भगवान मुरलीधर आमचा पहीला मेंढपाळ!. फ़क्तं बासरीऎवजी खडू आणि गाण्यांऎवजी रूक्ष गद्य आवाज(ज्याला नरडे म्हणतात). वर्गात नेहमीप्रमाणेच. फ़क्तं कोणी मुलाने difficulty विचारली तर सर्वांचे चेहरे त्रासिक. काय हा वेळ खातोय. पण तेच जर ती डिफ़िकल्टी एका सुबक ठेंगणीने विचारली असेल तर सगळा क्लास खडबडून जागा होतो व त्या थोर मुलीकडे एकटक बघतो. मी जरा उत्तर जास्तच elaborate करावे हे त्यांच्या डोळ्यात स्पष्टं दिसतं.
लेक्चर आटोपून परतताना निरोप येतो, post-graduate in-chargeचा, आज सेमिनार आहे. आल्या पावली सेमिनाररूमम्ध्ये स्थानापन्नं! वातावरण गंभीर. थोडीशी कुजबूज. आमच्या चेहेर्य़ांवरून आम्हा परीक्षकांच्या मूडचा अंदाज घेण्याचा जमलेल्या विद्यार्थ्यांचा एक केविलवाणा प्रयत्न. बाहेर दोन प्युन दिमतीला हजर. एक योग्य(? प्र्श्नोत्तरांच्या) वेळेला चहा द्यायला. दूसरा काही हवं नको बघायला.
पहीला विद्यार्थी सुरू करतो. दहा ऎवजी वीस मिनिटे घेतो. डोकं चढून जातं. कारण रिपोर्टमध्ये references, alphabetically आणि पाहीजे त्या formatमध्ये नसतात. conclusion च्या नावाने आनंद असतो. English construction आणि grammar ह्यांचा केव्हाच घटस्फ़ोट झालेला असतो. दोन चार प्र्श्नं विचारून त्याची गच्छंती करतो. दुसरा येतो. तो राम तर हा लक्ष्मण. मागे एक सीता ऊभीच असते आणि हनुमान तर कित्येक. कारण प्रत्येकालाच ह्या अग्निपरीक्षेतून जायचेय. पण आम्हाला तर हे सेमिनार ऎकून धरणी आम्हाला पोटात घेईल तर बरं असं वाटतं.
एव्हाना पोटात कावळे कोकलायला लागतात. दोन चार महत्वाची circulars, कागद sign करून कार स्टार्ट होते तेवढ्यात दुपारचे १.३० झालेले घड्याळ दाखवतं. रेडिऒ सुरू होतो आणि आवडते गीत सुरू होतं,"तुम्हारा चाहनेवला खुदाकी दुनियामे"
घरी सौ.नी चिठ्ठी ठेवली असते त्याप्रमाणे, भाजी गरम करून, केळ्याचे शिक्रण बनवून, जेवायला सुरूवात होते. सोबत दिवाळी अंक. सानियाचे जपानमधील फ़ुलांचे वर्णन सुगंधाशिवाय सर्वं काही transfer करून सोडतं मनात. १५ मिनिटांची एक डुलकी घेऊन परत कॉलेजच्या वाटेवर. सदाबहार गीते प्रोग्रॅम चालू असतो रेडिओवर.
मीटिंग सुरू होताच जेवणाची व गाण्याची नशा उतरली असते. एक official, ruthless गेम सुरू झाला असतो. मीटिंग अमक्याने बोलावलीय म्हणजे प्रॉब्लेम हाच असणार. मीटिंगच्या आधीच agenda चे सूतोवाच होतं. सगळ्यांनी आपापल्या positions कित्येक वर्षांपासून घेतलेल्याच असतात. कोण कोणाचा चमचा आहे, कुणाचा स्वार्थ कुठे दडला आहे हे open secret असतं. तरीही हा गेम खेळायचा असतो. त्यात जर खरोखर students चे भले झाले तर थोडा दिलासा!.
मिटिंग संपते. प्रत्येकजण आपापली हत्यारे, तलवार, सुरा, पिस्तोल, म्यान करतात.(जो साधा protest करतो तो सुरा, जो दुसर्याचे म्हणणे हाणून पाडतो तो तलवार वाला, व मीटिंगचा चेअरमन हा पिस्तोलवाला. सर्वांना silent करण्याचे काम त्याचे!.

पाच वाजता खरं academic काम सुरू होतं. दुसर्या दिवशीचे lectures काय, books काढून ठेवणे, transparencies एकदा डोळ्यांखालून घालणे. इतर colleaguesना intercom वरून सूचना देणे. आता हुश्शं म्हणणार तेव्ढ्यात m.Tech. आणि research चे विद्यार्थी गळ टाकून बसले असतात त्यांच्या गळाला मी लागतो. त्यांच्याशी discuss करता करता सात सहज वाजतात. अचानक मोबाईल वाजतो. ": कुठे आहात? घरी केव्हा येणार? " फ़ोनवर सौ.ना तटवून ३० मिनिटांनी स्वारी घरी दाखल जालेली असते. सिध्धी नेहमीप्रमाणे,' बाबा , आज काय गम्मत झाली कॉलेजमध्ये ते सांगा.' त्यावर एक जुनी आठवलेली गंमत तयार करून बसतो.
आज बसलोय मराठीब्लॉगसमोर नसलेली गंमत असलेली करून दाखवण्यात!

आता tag करतोय मी randomly यांना

नंदन
ट्युलिप
गायत्री
सुमेधा

गॉसिप सूरत स्टाईल - २

हमसाया सिनेमा त्यातील गाण्यांमुळे आणि ओ.पी च्या music मुळे गाजला तितकाच माला सिन्हा आणि शर्मिला टागोरच्या कचकचीत भांडणामुळे पण गाजला होता. नंतर तीच भांडणाची परंपरा शर्मिलाने चालू ठेवली "दाग" पर्यंत. राखी तेव्हा नवीन होती. तिला शर्मिला व राजेश खन्नाने नवशिकी म्हणून भरपूर छळून घेतले. पण दैवाने तिच्याशी अजून एक विषारी खेळी खेळायची बाकी होती.
गुलज़ारशी लग्नं केल्यानंतर तिची ओळख, शेवाळी हिरव्या डोळ्यांची, समरसून acting करणारी नटी अधिक, गुलझारची बायको अशीही झाली. पण त्या गुलझारने स्वत:च्या सिनेमात तिच्याऎवजी शर्मिलाला घेतले आणि त्यांच्यात एक ठिणगी पडली. मौसम मुळे बोस्कियाना(गुलझारच्या घराचे नाव) तला बहराचा मौसम गेला असे म्हणतात. शर्मिलाचा जय झाला. राखीमधली नटी अत्रुप्तच राहीली.
याच शर्मिलाचा जेव्हा सगळी कडे जयजयकार चालू होता तेव्हा राज कपूर "मेरा नाम जोकर" साठी तिचे नावही घ्यायला तयार नव्हता. कारण सरळच होतं. राज कपूरच्याच शब्दात सांगायचं तर, शम्मी कपूर तेव्हा शर्मिलाबरोबर लग्नं करायचे की नाही या विचारात होता. जर त्याने खरोखरच लग्नं केले तर"कपूर खानदानातली बहू" बिकिनीत कशी दाखवणार? पण हाच प्रश्न त्याला क्रमाक्रमाने मुमताज व सायरा बानू बद्दलही पडला पुन्हा शम्मी कपूरमुळेच! शेवटी त्याने लग्नं केले ते नीलादेवीशी हे तर सर्वश्रुतच आहे. या सगळ्या भानगडीत आपल्याला जोकर मध्ये "त्सॅना रॅबिन्किना " आवडून गेली. "जुदा नही होंगे तो मिलेंगे कैसे" ह्या ओळी अजूनही ह्रुदयात घर करून आहेत.
राज कपूरला एकदा एका पत्रकाराने खंवचटपणे विचारले होते," तुम्ही तुमच्या प्रत्येक नटीशी लफ़डं का करता?" राज कपूरचे उत्तर फ़ार मासलेवाईक होते," इतरही producer लफ़डी करतात, पण ते माझ्याइतके हीटस देत नाहीत आणि माझा सिनेमा हीट नाही झाला तरी लोकांना वेड लावून जातो. जागते रहो, बूट पॉलीश बघतच राहतात. राज कपूरचे नुकतेच लग्न झाले होते त्यानंतर क्रिश्ना कपूरला घरी आल्या आल्या छोट्या शशी कपूरने तिला विचारले, "तुम यहा क्यू आयी हो? अपने घर क्यों नही जाती?" क्रिश्ना कपूरने एका interview त सांगितले होते की मी तेव्हाच छोट्या शशीचा हा सल्ला ऎकला असता आणि माहेरी परत गेली असती तर बरं झालं असतं. राज कपूरबद्दल एवढं पुरेसं आहे. त्याने इतरांना कायम हसू दिलेत पण क्रिश्नाला कायम आसू दिलेत. हसू आणि आसू राजच्या वैयक्तिक जीवनातही त्याची पाठ सोडायला तयार नव्हते.