माणूस कशात गुंततो? एखादेच स्मितहास्य, वेगळे असे समर्पक वाक्य, नजरेच्या कप्प्यातून दिसणारी एक चोरटी झलक, ओझरताच होणारा हळवासा एक स्पर्श, टाळ्यांनी मिळालेला उत्फ़ूर्त प्रतिसाद, की डोळ्यातून ओसंडणारा स्निग्ध भाव, मुग्धाळलेल्या चेहर्याचा एक flash-back, अजून पुढे बोल ना सुचविणारे अविर्भाव, कशाकशाचे म्हणून नाव घ्यावे?
मजा अशी आहे की शब्दांचा गुंता करणारा त्यातून सरळपणे निघून जातो आरपार . आपल्या स्त्रीसुलभ हालचालींनी केशकलाप नीट करणारी मोहिनी नंतर केसांचा गुंता करून तो अलगद खिडकीतून बाहेर टाकणारी पण सहज होते नामानिरळी. पण नजरेत अडकून शब्दात फ़सणारेच फ़ार गुंता करतात आयुष्याचा! बरेच जण धारदार शब्दांची करवत अशी काही चालवतात की डोळ्यात पाहण्याचा व तदनंतर अडकण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तर काही अतिउत्साही डोळ्यांकडे किंवा डोळ्यांमध्ये न बघताच शब्दांचा दांडपट्टा असा काही चलवतात की त्यात अडकण्याचा कुठे मागमूसही नसतो. एकतर्फ़ी लिहीलेल्या प्रेमपत्रांमधून शाळा कॉलेजचे विद्यार्थी प्रेमाच्या नाही तर प्रिंसीपॉलच्या जाळ्यात अडकतात. लग्नानंतर "जबाबदारी घेतो" हे दोन शब्दं आयुष्यभर पेलावे लागतात.
कितीही कलंदर असला कलावंत तरी contract च्या शब्दांच्या चौकटीत अडकून प्रतिभा पणाला लावतोच. "शब्द दिला" म्हणून प्रेमात किंवा मैत्रीत नुकसान करून घेणारे नेहमीच बघत आलोय आपण पण मी त्याला शब्द द्यायला चुकले म्हणून हळहळणार्या व्यक्तिही कमी नाहीत या जगात.
निबंध म्हंटला की ५०० शब्दांच्या चौकटीत अडकायचो. कादंबरी म्हंटली की ५०० प्रिंटेड पानांच्या जंजाळात कादंबरीकार वर्षभर तरी अडकतोच.नाटकात किंवा सिनेमात अडकणारे नट आपण नेहमीच पाहतो पण dailogue लिहून देण्यासाठी आपापल्या खोलीत काम संपेपर्यंत अडकवून घेणारे dialogue writers या दुनियेत आहेतच.
कमी पडलेत शब्द तर कविता
जास्तं सुसंबध्द केलेत तर लेख
पसारा मांडला शब्दांचा तर दीर्घकथा
वाहवत गेला समुद्रासारखा तर कादंबरी!
शब्दच ते पण त्याची रुपे किती?
जिव्हारी लागला तर बाण
हसवलं तर डायलॉग
फ़सवल तर थाप
थिजवल तर शाप
चिंब भिजवलं तर भावनात्मक लेख
विचार करायला लावलं तर कोडं
लिहायला लावलं तर विचारांच झाड
लहान मुलांसाठी बडबड गीत
सासरी जाणार्या मुलीच्या आईसाठी डोळ्यांचे "डबडब " गीत
प्रेम सफ़ल जाले तर तरंगवणारे काव्य
प्रेम विव्हळ झालात तर गझल
प्रेम उगाळत राहिलात तर लैला मजनू
कॅलीग्राफ़ीतूनही खुणावणारे शब्दंच!
neon signs मधून लक्श वेधून घेणारेही असतात शब्दंच.
वक्तेही बोलणार असतात "दोन शब्दं"
दु:खात धीर देतात थोरा-मोठयांचे "चार शब्दं"
वादविवाद झाला तर वाढतो शब्दाने शब्द
पण तरीही शेवटी आपल्याला नि:शब्द करतात ते शब्दच!
No comments:
Post a Comment