Wednesday, April 29, 2009

गरम गरम

का असं नाही होत? जेव्हा आपल्याला भूक लगते तेव्हा आपण लगेच काहीतरी गरम गरम करून खातो तसं जेव्हा काही लिहायची भूक लागते तसं लगेच instant का नाही सुचत? विचारांची कढई तापलेली असते, पेनची शाई तेलाचं काम करते, कागदाच्या बेसनात भिजवून विचाराची भजी का नाही तळून घेता येत?

तसं तर आपल्या डोक्याच्या कपाटात कोणत्याही ईतर कपाटात नसतील ईतके जिन्नस अनुभवाच्या गाठोड्यांमध्ये साठवून ठेवले असतात. फ़क्तं गाठी सुटत नाहीत. वस्तू नीट ठेवलेल्या नसतात. जर वस्तू मिळाल्यात तर त्याला कॉमेंटस आणि टॉंन्टस ह्याची जी फ़ोडणी बोलताना मिळते ती लिहीताना मिळत नाही. समोरच्याची appreciative नजर आणि तिची लिंबू कोथिंबीर त्यावर पिळून मिळत नाही. हे सगळं मिळालं तर योग्य वेळेची डिश मिळत नाही. शिवाय वा! किंवा काहीतरीच असे चमचे पाहिजे खताना तेही जरा दुष्प्राप्यच असतात.

तरीही माणसं लिहीत असतात त्याला लोक शिळंपाकं समजून तोंडी लावतात, अर्धवट खाऊन ्फ़ेकून देतात. क्वचित आवडलं तर मनात ठेवतात आणि पुढला पदार्थ तितकाच चांगला झाला नाही तर नावं ठेवतात. शेवटी पोटाची भूक विचारांची भूक ही मणसाला नवीन नवीन पदार्थ करायलाच लावते. चुली वेगवेगळ्या पेटतात, तेल तूप ओतायचे थांबत नाही, डाळी बेसन, वाटून यायच्या थकत नाही, मग वेगवेगळ्या भाषांची कांद्याची भजी बरी बंद होतील?

1 comment:

Nivedita said...

वा वा! काय चविष्ट पद्धतीनं समराईज केलीये लिहिण्याची प्रोसेस! मस्तच!