Saturday, September 13, 2008

चेहरा

पायवाटेवरील धुळीत त्याच्या फ़ताड्या पायांची छाप पडून त्याचे अस्तित्व जमिनीला जाणवायचे. त्याच्या मागून येणार्यांना वार्याच्या झुळूकेतून त्याच्या घामाचा दर्पं यायचा. त्याच्या येण्याने व जाण्याने वाटेवरली कुत्री पडल्या पडल्या फ़क्तं डोळे किलकिले करून त्याचे अस्तित्व नोंदवायची. त्याच्या चेहर्यावरच्या रेषा कुणालाही कधी जाणवल्यात असे समोरच्याच्या डोळ्यांतून कधी झिरपले नाही. चालतानाची लकब कुणी मान वळवून बघावी अशी तर नव्हतीच नव्हती. कपडे घातलेले आहेत ते उपचार म्हणून! त्याच्या एकंदर अविर्भावावरून तो कशासाठी जातोय, कुणासाठी जातोय याचा कुणालाच थांगपत्ता लागत नव्हता.
विचार आपल्या मनात आपसूक येतात व येतच राहतात, जुने विचार मागे सरून पुढले विचार येतात त्या यंत्रवत परिपाठाप्रमाणे त्याची पावले पुढे पडत होती. पुढली झाडे मागे जात होती. दूरचे ठिपके मोठे होत होत त्याच्या सावलीत नाहिशी झालेत. पुढे उगवणारा सूर्य दिवसाचा क्रम आटोपून मागे सरत होता. त्याच्या पाठीला चिकटलेला उजेड हळुहळू निसटून अंधारात चाचपडत होता. त्याचे डोळे मात्र होते तेथेच होते. विचार होते तेथेच थांबले होते. नाही म्हणायला डोळे एकाच गोष्टीत खोलवर रूतले होते, अंधारात! त्या डोळ्यांना हेही जाणवले नाही की गावकोस ओलांडून भर संध्याकाळी तो एका घरासमोर यंत्रवत थांबला होता.
घर कसले ते! चार भिंतीत पाच कोनाडे ठेवलेले. दोन चुलींवर अर्धवट सरपण जळत पाण्यात टाकलेले मूठभर धान्य शिजायला कुरकूर करत होते. पोटाला भूक नसल्यागत घरचा धनी दरवाज्यात फ़तकल मारून बसला होता. मिणमिणत्या दिव्यात एक करपून गेलेली स्त्री होते नव्हते ते समोरच्या डब्यांमधून शोधून भांड्यात लावत होती.
घरच्या धन्यासमोरून हा वाटसरू आरपार निघून समोर जातोय तर न राहवून त्याला हटकले,"अहो पावणं, थांबा की जरा". पहिल्या हाकेत नाही पण तिसर्यात त्याने मान वळवली. क्षण दोन क्षण नीट थांबून पाहिले. तो ह्हरवलाय हे जणू तो त्याच्या डोळ्यातून हाक मारणार्याला सांगत होता. "अहो पावणं, मागं फ़िरा. बसा जरा घटकाभर. दोन घास खाऊन मग पुढे कुठं जायच तर जावा!"
आत्तापर्यंत फ़क्त शरीर चालत होतं तेही थांबल आणि मनाबरोबर स्थीर झालं. दोघेही एकमेकांसमोर बसलेत. घरच्या धन्याचं हळी मारणं, त्याच बसणं, हे घरातल्या स्त्रीच्या कानानं हेरलं होतं. आता तिच्या हालचालींना वेग आला. चुलीत दोन लाकडं जास्तं शिरलीत. फ़ुंकणीतून हवा अजून ओतली. भांड्यातल्या पाण्याला उकळी फ़ुटली. डाळ तांदूळ रटरट आवजात नाचू लागलेत. दिव्याची ज्योत मोठी झाली. घरातल्या वस्तूंना उजेडात आकार आला.
तीन थाळ्या जमिनीवर पसरल्यात. ऊनऊन भात व डाळ त्यावर विराजमान झाल्यात. बाहेरची मंडळी थाळ्यांसमोर आली. हात व तोंडाची गट्टी जमताच समोरची डाळ भात नाहीशी होऊ लागली. हळुहळू वाढण्याचा आवाज नाहीसा झाला. थाळ्या रिकाम्या झाल्यात. ढेकर देण्याच्या आवाजाने त्यावर शिक्कामोर्तब झालं. चूळ भरून हात धुतल्याच्या आवाजाने पावले दारापाशी येऊन थांबल्याची ग्वाही दिली. थोड्याच वेळात दाराजवळ सहा पावले येऊन बसलीत. दिव्याच्या अंधूक होत चाललेल्या प्रकाशात तिघांचेही चेहरे त्रुप्तं जाणवत होते. त्यातल्या एका चेहर्याचे ओठ हललेत व काही शब्दं हवेत फ़िरू लागलेत. दुसरीकडून हलकासा प्रतिसाद येऊ लागला. जेवण देणारी ती स्त्री अजूनही फ़क्तं कानांचाच वापर करीत होती. त्या दोघांच्या बोलण्यातून तिने ताडले की येणारी व्यक्ती चित्रं काढते. चित्रांच्या शोधात तो माणसे शोधू लागला.
माणसांच्या चेहर्यात त्याला माणसे दिसेनात. जितकी जास्तं माणसे त्याने पाहिलीत, तितकी ती त्याला चेहर्यांपासून दूर वाटली. त्यांना सुरकुत्या नव्हत्या तर अपेक्षांचं जाळं होतं. डोळे नव्हतेच, त्या जागी तर अत्रुप्त ईच्छांच वारूळ होतं. नाकाच्या जागी समोरच्या व्यक्तीच्या स्वार्थाचा दर्प येत होता. हसण्यातून फ़सवेपणा जाणवत होता. कान फ़क्त आणि फ़क्त स्तुतीसाठीच हपापलेले होते. केसांच्या जागी खुजं कर्त्रुत्व (?) झळकत होतं. गळा तर सगळा भूतकाळाच्या आठवणीत रूतला होता. डोकं निव्वळ खोटेपणाने भरलं होतं. चेहरा मुळी त्याला दिसलाच नव्हता. चेहरा नाही म्हणून चित्र नाही. चेहर्यासाठी तो वणवण भटकत होता.
त्याची व्यथा जाणवताच घरातल्या स्त्री-पुरुषामध्ये समाधान पसरले. हो, होता आमच्या घरात एक चेहरा! तू म्हणतोस तसा. निरागसतेचा चेहरा, स्वार्थापासून दूर, आशेच्या जवळचा व प्रेमाला हपापलेला. पण तोही काही वर्षांपूर्वी आमच्यापासून दूर गेला, तोही कायमचा! आमचा एकुलता एक मुलगा.
त्या दिव्याच्या इवल्याशा प्रकाशात त्या माऊलीने घरातली एक छोटीशी पेटी ओढली. त्यातले एका किशोरवयीन मुलाचे कपडे बाहेर काढलेत. त्याच्यासाठी वापरात असलेला कंगवा, काजळाची डबी, तो खेळत असलेले काचांचे तुकडे, धातुच्या रिंगा, सर्व काही त्या चित्रकारासमोर ओतले. हळुहळू ते आई-बाप मुलाच्या आठवणीत रमलेत व दु:खाच्या सुखात न्हात निद्राधीन झालेत. थिजलेला तो चित्रकार वाटसरू दरवाज्याशीच अंग आडवं टाकून झोपेला शरण गेला पण मनाशी काहीतरी निर्धार करून!
सकाळी लख्खं उजाडलं तेव्हाच घरातल्या मालक मालकिणिने आळस देत, शांत झोप घेतल्याची ग्वाही देत आजूबाजूला पाहिलं तर तो पाहुणा दारापाशी नव्हता. त्यांनी लगबगीने दाराबाहेर येऊन पाहिले तर -
रांगोळी, काचा, कवड्या, काजळ, रिंगा व रंगीत चिंध्यांचे मिळून एक अमर चित्र तयार झालं होतं त्या मुलाचं! त्याला डोळे होते, नाक होतं,ओठात हसू भरलं होतं आणि आईवडिलांसाठी असलेला अमाप करुणेचा एक चेहरा पण होता!

6 comments:

prasad bokil said...

काका छान! दळवी टच आला आहे असे वाटले. पण त्याच बरोबर भाषेला थोडी असहजता आली. कदाचीत तुम्हाला ती तशी अपेक्षीत असावी. ते घर, घरातील ते दोघे जण, आणि जेवण होईपर्यंतचे वर्णन आवडले. पुढचा भागात कृत्रीमता आली.
एक शंका:
अनोळखी वाटसरूला स्वत:ची परिस्थीती हालाखीची असूनही जेवायला घालणारे नवरा बायको माणुसकीची साक्ष देतात. त्यांचे चेहरे पुरेसे नव्हते का?

महादेव शास्त्री जोशींची एक गोष्ट आहे. नाव नक्की आठवत नाही. कदाचीत "धनको" किंवा "ऋणको". मिळाली तर बघा. या संदर्भात वाचनीय ठरेल.

hemant_surat said...

प्रिय प्रसाद,
तुझे observation व तुझी शंका बरोबर आहे. पण लिहीताना मी कशाचाच विचार केला नाही. झपाटल्यासारखी रेलवे प्रवासात एकटाकी लिहून काढली. पुढल्या वेळेस जमलं तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न जरूर करीन. पं. महादेवशास्त्रींची गोष्टं वाचली नाहीपण आता नक्की मिळवून वाचणार. thanks again for constructive criticism!

Shubhangee said...

फारचं सुंदर कथा.वर्णनातुन चित्र डोळ्यापुढे उभे राहते.मी प्रसादची मावशी. प्रसादने सुचविलेल्या महादेवशास्त्रींच्या कथेचे नाव आहे ’धन आणि मन’
शुभांगी राव

Harshada Vinaya said...

tumachi lekahnshaili aprateem ahe..

hemant_surat said...

प्रिय शुभांगी राव व हर्षदा,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

Anonymous said...

wah khup sundar katha. suruvatiche varnan va bhashashaili faar avadali.