मी घेत असलेल्या भुताच्या मुलाखतीचा भाग दुसरा!
भूत : वेताळ, समंध, हडळ हे काही वाईट शब्द नाहीत. तुम्ही माणसं हे शब्द शिव्या म्हणून वापरता त्याबद्दल आम्हाला objection आहे. अहो, वेताळ ही तर आमच्याकडॆ तबलजीसारखी पदवी आहे. वेताळ म्हणजे originally वेत-ताल. वेताच्या दोरीने ताल पकडून जो वाजवितो तो! वेत-ताल चा अपभ्रंश नंतर वेताल- वेताळ असा झाला. तसंच, आग्या-वेताळ हा पळत-पळत जावून message देणारा वेताळ हा भाग्या-वेताळचा अपभ्रंश. आता आम्हा भुतांना 'भ' म्हणता येत नाही(तुम्हाला भ ऎकू येतो हा पुन्हा software चा प्रताप) त्यामुळे तो झाला आग्या-वेताळ. हां आता भुते पळतात का आणि message का देतात व तो वेताळानेच का द्यावा हे मात्र विचारू नका. सगळच काही सांगायला मी बांधील नाहीय.
मी: मग चुडेल, हडळ याबद्दल काय?
भूत : सांगतो ना! चुडेल वाईट हाही तुमचा गैरसमज. आम्हा भुतिणींच्या हातात जी बांगड्या उर्फ़ 'चूडा' भरेल ती 'चुडेल'. तसंच हडळ ही तर सर्वात सुंदर भुतिणीची पदवी आहे. आमच्यात हाडे जितकी बारीक तितकी ती सुंदर. हाडे बारीक होण्यासाठी भुतिणींना खूप खूप दळावं लागतं हाडांनी. तेव्हा जी भूतीण सर्वात जास्तं दळेल हाडांना झाडाभोवती हाडे घासून, ती 'हाड-दळ', पुढे हाड्दळ चे हाडळ व नंतर हडळ. आलं लक्षात?
मी : समंध शब्दाचंही असंच काही आहे?
भूत : हो तर! समंध ही पदवी आम्हा भुतांमध्ये काही श्रीमंत भुतांना देतात. खूप संपत्ती जमल्यामुळे आमच्यातल्या काही भुतांच्या खोबण्या उर्फ़ डोळे अधु होतात. अर्थातच ते 'somewhat' अंध होतात. त्याचेच भ्रष्ट रूप - समव्हॉट-अंध म्हणजेच सम-अंध आणि पुढे समंध. पटतय नं?
मी : हो तर! आता पुढचे plans काय?
भूत : रामसे बंधूंवर उलट प्रहार म्हणून आम्ही "भूतसे" productions" काढली आहे. त्यातली नुसती काही titles पहा : 'तीन मजले जमीनीच्या वर", "गर्दीचा रस्ता", "नरभक्षक माणूस", हे खास माणसांवरती विडंबन!
आमच्या मनोरंजनासाठी - 'मी हडळ याच जन्मीची', 'हडळसुंदरी', 'मै मुंजा तू गंजा' आणि 'मुंजाभारत'
मी : लहान मुलांसाठी काही आहे का?
भूत : वा. हे काय विचारणं झाल? पळपुटा माणूस ही मांजर व त्याला त्रसून सोडणारा 'भूतपिल्लू' हा ऊंदीर ही series already फ़ार popular आही छोट्या भुतांमध्ये.
मी: तुमच्या सिनेमांमध्ये गाणी नाहीत का?
भूत : गाण्यांशिवाय कसं चालेल. हा एक नमुना पहा बालभूतगीताचा :
धरू धरू धरू धरू पिंपळाची पारंबी
पारंबीला पकडून लोंबू या
भुताच्या गावाला जावू या
जावू या भुतांच्या गावाला जवू या!
चुडेल आमुची सुंदर
डोळे फ़िरविते गरगर
डोळ्यांच्या खोबण्या वाढवू या
भुताच्या गावाला जावू या
मुंजा मोठा तालेवार
नखांच्या नाण्यांची दे भरमार
दातावर दात घासून विचकू या
भुताच्या गावाला जावू या
मी : काही खास संदेश माणसांसाठी आहे अजून?
भूत : नारायण धारप यांना आम्ही "भूत साहित्य अकादमीचा" खास पुरस्कार(मरणोत्तर) दिला आहे. माझी मुलाखत घेतल्याबद्दल तुम्हालाही 'भूतमित्र' हा किताब देण्याबद्दल मी शिफ़ारस करणार आहे. बोला केव्हा मरायला तयार आहात? कारण आमचे सर्व पुरस्कार मरणोत्तर आहेत हे वेगळे सांगायला नकोच.
मी : केव्हाच सूबाल्या ठोकला आहे व हा अनुभव तुम्हाला ब्लॉगवर सांगायला कसाबसा जीव मुठीत धरून जगतोय.
1 comment:
haha. this is fun..maja ali vachun :)
Post a Comment