Friday, June 05, 2009

पार्टी

Entrance ला रात्रीच्या अंधारातही चमकणारी रेडियमची पाटी "अपेक्षा - अनुराग" येणार्या प्रत्येक कारच्या हेड्लाईटला योग्य अंतरावर थांबवित होती. ड्रायव्हरशेजारचे दार अलगद उघडताच प्रथम ख्रिच्शन डायोर किंवा नीना रिकीचा दरवळ आधी बाहेर यायचा, मग डिझायनर सॅंडल्स आणि हिरेजडित नाजुक हातांपाठोपाठ तलम कपड्यांची सळसळ!ड्रायव्हर्च्या जागी असलेली एक भपकेबाज व्यक्ती झटपट त्या सळसळीबरोबर येऊन दोघांचे चार हात कधी नमस्तेला तर कधी शेकहॅंडला तर क्वचित हलक्याशा मिठीत जोडले जायचे.

एक एक करत सर्वं कपल्स आपली हजेरी प्रशस्त लॉनवर किंवा राजेशाही दिवाणखान्यात लावत होते. अपेक्षा व अनुराग हे होस्टच मुळी सर्वांना जातीने ड्रींक्स देत स्वागत करत होते. मुख्य डिनरला बराच अवकाश होता. आपसूकच छोट्या छोट्या घोळक्यात संवाद चालू होते.

"अपेक्षाला बरं जमतं या वयात अजूनही मिरवायला."
"तिला दुसरं काय काम असतं?"
"तसं कसं! नाही म्हंटलं तरी २५ वर्षे झालीत लग्नाला."
"मग अजून कशी पस्तिशीची दसते?"
"चल, पार्लरमध्ये जाऊन येते."
"पार्लरमध्ये तर तूही जाते मग तू का चाळीसची असून पन्नासची दिसते?"
"ते जाऊ दे. पण अनुराग अगदीच सीसी आहे"
"म्हणून काही ती पस्तिशीची दिसत नाही हं."
"तसं नाही. अनुराग तिला फ़क्तं तोंडी लावायला. सेलीब्रेट तर ती शॅंपेननेच करते."
"सुरुवात शॅंपेनने तर मेन कोर्स मध्ये कोण?"
"ते मी कसं सांगू? पाच कोर्सचे डिनर असेल तर?"
"खरं कि काय!"
"अपेक्षा म्हणजे आमच्या old बूर्झ्वा क्लबमध्ल्या उखाण्यासारखी!
गोविंदरावांबरोबर सिनेमा पाहिला सायको,
अरविंदरावांचे नाव घेते चिमणरावांची बायको!"

हास्याचा किलकिलाट! अजून एकदा, पुन्हा एकदा !
तर पुरुष मंडळी प्रामुख्याने शॅंपेनचा आस्वाद घेत अंदाज घेत होती.
" हा अनुराग म्हणजे काही कळत नाही. सदैव हसतमुख. worries कधी नाहीतच."
" लपवत असेल. हल्ली सामान्य असणारा माणूससुद्धा सुखी असण्याच्या acting मध्ये परेश रावलला मागे टाकेल"
"acting कुणिही दोन दिवस करेल. गेली पंचवीस वर्षे तो सुखी आहे हे मी माझ्या दु:खी नजरेने टिपले आहे."
"ते बघता बघता तुझे दु:ख वाढल्याचे मी पाहिले आहे. (आणि त्यामुळे तुझे दु:ख थोडे कमी झाल्याचे मी पाहिले आहे- एक कुत्सित कटाक्ष)"
"पुरे. लाकडं जाळण्याचा प्रकार थांबवा."
"लाकडं पूर्वी होती. आता रिफ़ायनरी जाळता येईल इतकं इंधन आहे."
"बरं एवढं जळूनही एक चिंता नेहमी. याचं कधीच कसं लफ़डं झालं नाही व झालं असेल तर कळलही नाही."
"अरे त्याला दु:ख झालं असेल पण कळलं नसेल"
" तसं कसं शक्यं आहे? आपल्यामध्ये असा कोण आहे ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही एकाही महत्वाच्या बाबतीत?"
" अरे आपण सगळे नजरांच्या दुर्बिणी लावून एक दुसर्याला दुरून पाहात गंमत करत असतो. कोणाची P.A., दुसर्याची client, कधी आडवळणाची air-hostess, कुणी सुटलय का यातून?"
" आता पुरे. नाव नका घेऊ. नाहीतर कलीयुगातले महाभारत व्हायचे."

तेवढ्यात announcement झाली.
मंडळी, अपेक्षा व अनुराग आपल्याला काही सांगू इच्छिताहेत.
शॅंपेनचे ग्लासेस एकाच दिशेने वळलेत. सर्वं नजरा एकाच ठिकाणी खिळल्या. काही डोळ्यांमध्ये मिस्किल छटा, तर काहींमध्ये ’आता काय नवीन’ चा बोजडपणा.

अनुरागने सुरुवात केली.

"२५ वर्षे! हो. आम्ही गेली पंचवीस वर्शे एकत्र आहोत. made for each other म्हणून नव्हे तर "MAD FOR EACH OTHER" गेल्या पंचवीस वर्षात आम्ही जितकं इतरांना पाहिलं तितकं त्यांच्या नजरांमध्ये आधी कौतुक, मग असूया, पुढे अविश्वास व शेवटी काहीतरी लपवतोय हे भाव पाहीलेत. मी जितकं बोललो तितकं त्याच्या उलटं लोक समजायला लागले. माझी प्रगती, माझा पैसा, माझी decisions, सगळ्यांकडे संशयाने बघायला लागले. हळुहळू या सर्वांपलीकडे जाण्यासाठी बोलणं कमी झालं, हास्य वाढलं. शेकहॅंडनंतर ’excuse me’ म्हणून दूर सटकणं आपसूक यायला लागलं. professional life चा मुखवटा वापरून personal life वेगळं झालं. तरीही एकदा बोलावसं वाटलं. पण मला नाही तर अपेक्षाला. तेव्हा तिच्यासाठी ही दिलखुलास मोकळी पार्टी.आज बोलेल ती. ऎका तुम्ही. ऎकल्यानंतर ठरवा तुम्हीच काय ते!"

नाजूक हातांनी पदर सावरीत अपेक्षा सर्वांसमोर बोलायला उभी राहीली. काजळ लावलेल्या काळ्या नजरा पांढर्या डोळ्यांनी तिला बघू लागल्या. एकडे मिशीत लपलेल्या कुतूहलात कान टवकारले सर्वांचे!

"मी अपेक्षा!. नावच माझं अपेक्षा. मग मला छोट्या छोट्या बाबतीत अपेक्षा असणं हे काही चुकीचे नाही. लहान असल्यापासून पाहतेय लग्नं झालं परिचयातल्या कोणाचही की माझं नाव त्यांच्या प्रत्येक वागणूकीत दिसायचं. नवरा व्हायच्या आधी त्याला तिच्यातलं सौंदर्य दिसायचं. तिचा लोभसवाणा स्वभाव, सहवास हवाहवासा वाटायचा. तिला भेटण्यासाठी कुठलही निमित्तं तो ओढून ताणून आणायचा. तिचाही जीव सुखवायचा. तिलाही ते त्याचं रुंजी घालणं फ़ार फ़ार आवडायचं. हळुहळू त्या पाहण्यातून जेवणाची, मुलं झाल्यावर त्यांना नीट ठेवण्याची अपेक्षा दिसायची. तिचीही परिस्थिती काही वेगळी नसायची. काही बाहेर जायचं म्हंटलं की ्खर्च होणारे पैसे समोर दिसायचे. मुलांच्या भवितव्यासाठी "नको" शब्दानं ओठांवर ठाण मांडलेलं असायचं. काही विकत घेऊन वाचायचं, काही छंद जोपासायचा हे तर मुळी Dictionary तून गेलेलच असायचं.

नावे बदलली, वेळ काळ बदललेत, सांपत्तिक स्थिती बदलली पण परिस्थिती तीच होती. तेव्हाच मी एक निर्णय घेतला. जितके काही माझे परिचयातले होते, मित्रं होते, ओळखीचे होते,त्यांच्याबरोबर एक एक करून खडा टाकला. हो. पण त्याआधी मी चक्कं hypnotism शिकले. तेही लपून छपून पण पक्की शिकले.

प्रत्येकाला मी एकेकट्याला बोलावलं. माझी मोहक offer दिली. समज आपलं virtual लग्नं झालय. त्याची विकेटच उडायची. मग मी दर २० मिनीटांनी २-२ वर्षे त्यात add करायची. हिप्नॉटीझमच्या प्रभावाखाली त्याचा नवरा म्हणून role बघायची. प्रत्येकाने कल्पनेतला जो अनुभव दिला त्याचं नाव पळसाला पानं तीन. तीच गुर्मी, तीच अपेक्षा, नवरेपणाचे तेच ते हक्कं, स्वामित्वाची भावना! ते मला नको होतं असं नाही. पण त्यातलं मित्रत्वाचं व ममत्वाचं नातं केव्हाच गेलेलं होतं. ओलाव्याचा मागमूसही नव्हता.. hypnotism संपेपर्यंत मला ऊटीच्या थंड प्रदेशातून सहारा वाळवंटात गेल्याचा अनुभव यायचा.

मी हळुहळू निराश व्हायला लागले.. पण तरीही लळत लोंबकळत ईच्छाशक्तीवर मात करत रुटीन चालूच ठेवले.. आणि अचानक एका प्रवासात अनुराग भेटला. तोही रेल्वेच्या कंपार्टमेंटमध्ये आणि दिवसा!. माझ्याशी तर बोलायलाही तयार नव्हता. त्याच्याच गुर्मीत. कामाच्या नशेत. पुस्तक वाचणं व लिहीणं. मोठ्या प्रयत्नांनी त्याला बोलतं केलं. नकळत सवयीने hypnotism वापरायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य! जसजशी वर्षे पुढे जायला लागलीत त्याच्यात मित्रत्वाचे धुमारे जूनच फ़ुटायला लागलेत. कामाच्या व्यापाखाली दबून जाण्यापेक्षा माझ्याबरोबर मी म्हणेन तेव्हा यायला तयार! तेव्हाच विचार केला हाच तो!

Exactly २५ वर्षांचा प्रवास तेव्हा २५० मिनि्टांच्या सहवासात केला तोच आज पूर्ण झालाय. आणि हो, ज्या काही comments तुम्ही सर्वांनी केल्या आहेत, सीसी अनुरागपसून ते सायकोच्या उखाण्यापर्यंत, तेही मासलेवाईक नमूने मी डोळ्यांखालून व कानांवरून आधीच घातलेत. तेव्हा माझी निवड सार्थ केल्याबद्दल सर्वांचे आभार. ही पन्नास मिनिटांची कहाणी पंचवीस वर्षी सुफ़ळ संपूर्ण!"

पार्टी संपली ईतरांची पण अनुराग व अपेक्षाची पार्टी सुरुच आहे अजूनही. विश्वास बसत नसेल तरीही!

1 comment:

Abhi said...

hypnotism chi sankalpana jabari aahe. ase kharach jahel tar. ?