Sunday, April 29, 2007

बोलकं घर

animation निर्जीव वस्तूंना बोलतं करतं, त्यांना नाचायला, बागडायला "मजबूर" करतं. त्याहीपेक्षा नवल म्हणजे त्यांच्यामध्ये भावना ओततं.पूर्वी आम्ही मिकी माऊस वगैरे सर्वं काही पहायचो. पण आमच्या घरी या सर्वांची काहीच गरज ऊरत नाही. आमच्या घरी सर्वच वस्तूंना जीव आहे, भावना आहेत व त्या आमच्याशी बोलतात पण. कसं ते पहा.
सिध्धीचा टॉवेल रोज तीची अंघोळ झाल्यावर, पलंगावर पडून मुसमुसत रडत असतो. ती तर ते नं ऎकता खुशाल क्लासला निघून जाते पण मला ते बरोबर ऎकू येतं."कुणीतरी मला तारेवर वाळत घाला रे. नाहीतर मी असाच ओला राहीलो तर फ़ंगस माझ्या ऊरावर नाचतील ना ", हेही बोललेलं कळतं. मग मी मुकाटपणे त्याला दांडीवर टांगतो. तोही मग दांडीवर झोके घेत क्रुतद्न्यता व्यक्त करतो.
कित्येक दिवस आमच्या बाल्कनीतील खुर्ची, आम्ही तिचं बारसं करत नाही म्हणून फ़ुरंगटून बसलेली रहायची. तशी ती थोडी मोडकीच होती. शेवटी आम्ही तिला खिळे व स्क्रु मारून एकाच "open position" मध्ये पुनरुज्जिवीत केलं. पण तिची घडीच करता येईना. मग तिचे नाव ठेवलं," बाबा आमटे खुर्ची" (त्यांची क्षमा मागून!). तीही रागावली नाही. तिने आम्हाला तिचे ब्रीदवाक्यं सुनावले "मोडेन पण वाकणार नाही".
एक स्टीलच्या पेल्याचा आतला भाग क्रोमियम उडाल्यामुळे काळपट दिसतोय. तर तो "skin disease" चा पेला झाला आमच्यासाठी. एकदा एक कप फ़ुटला तर आम्ही ईतर कपांना सांगितलं," केव्हाचा तो सिंकच्या टोकावरून कठडा नसतानाही डोकावून पहात होता. शेवटी पाण्याचा ओघळ पायाखाली येताच पाय घसरून पडला. आता रडतोय तुकडे झाले म्हणून. तरी बरं कुणाच्या प्रेमात पडून नाही झाले ते!" स्टेपलरला तर घरात लपण्याची भारीच वाईट सवय आहे. या कोनाड्यातून त्या कोनाड्यात लपत असतो. कात्रीला तर ऊंचावर चढून बसून, खालची शोधाशोधीची मजा बघायला फ़ार आवडतं. डिंकं तर दोन तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळेस आपले अस्तित्व दाखवून "तो मी नव्हेच" चा प्रयोग नेहमीच करत असतो.
tv, mixer, ac, pc ह्यांची purchase vouchers तर पांडवांबरोबर अद्न्यातवासात गेलेत की काय असं वाटतं. शिवाय गॅरंटी कार्ड व गॅजेट बिघडण्याची डेट ह्या दोघांचे अहि नकुलाचे नाते असल्यासारखे वाटते. छोट्या बेडरूममधला पलंग तर कित्येक दिवस," अहो मी पलंग आहे, उघडं कपाट नाही horizontal level चे" असा टाहो फ़ोडून थकला पण आम्ही ठार बहीरे असल्यामुळे आम्हाला ऎकूच आले नसावे अशी त्यानेच स्वत:ची समजूत घातली. dining table तर रडून रडून थकला सांगायचा की मी जेवणासाठी आहे, पुस्तकं व पेपर्स ठेवण्यासाठी नाही. पण त्याच्याहीकडे कोण लक्ष देतंय!
चहाची भांडी एकदा कुजबुजताना मी ऎकली. माझीच चुगली करत होते. "एकतर हा झोपेच्या तारेत. आम्हाला खसकन ओढतो कपाटातून व दणकन आदळतो गॅसवर." नळही म्हणे की पहा नं आणि मला भसकन सोडतो चहाच्या भांड्यात. मग पाणी सगळं सांडतं आजूबाजूला. चहासाखरेचे डबे त्यात join होतात,"नाजूकपणा तर माहीतच नाही ह्या पुरुषांना. झाकणं काय काढतात जणू घट्टं बसलेलं मॅनहोलच उघडताहेत असं वाटतं. आमच्यातलाच चमचा पण आमच्याच ऊरात असा काही खुपसतो की वाटतं जीव जाईल. जशी काही सुपारी घेतलीय आम्हाला संपवण्याची." खालून झाकणीचा क्षीण आवाज येतो, "मला खुशाल भांड्यावर भाजायला ठेवून पेपर आणायला दरवाज्याशी पळतो. याला एकदा भट्टीवर ठेवले म्हणजे कळेल कुल्ल्याखाली कशी आंच लागते ती. मग हो म्हणा विवेकानंद!" ह्या वाहत्या गंगेत मग चिमटा, गाळणी, कपबशी, सर्वच हात धुवून घेतात.
दुपारी जेवायला येतो तर गॅसची शेगडी बडबडत होती," पहा नं. आता मुलगी घरी आहे तर आमच्यावर अन्नं ठेवून गरम करून खातो. नाहीतर एकटा असतो तेव्हा तसंच थंडं खातो. काही ऎकत नाही बायकोचं." फ़्रीझ तेवढ्यात ओरडला," ए, थंड नको म्हणू. तो मक्ता माझ्याकडे. सरळ दरवाज्यातून खिचडी, मिठाई, दूध तसेच ओरपतो. काही पोटाची काळजी नाही." तिकडून bacteria हसल्याचा आवाज येतो."हसू नका. या बापमुलीची आतडी स्टीलची आहेत. काही म्हणता काही चालायचे नाही तुमचे" बाकी सर्वं एकसुरात ओरडले.
हळुहळू अजून एक एक वस्तू या तक्रार दिंडीत सामील होवू लागली. त्यात काही कामे पण join झालीत. ओटा आवरणे, किचन लखलखीत करणे, कचरा बाहेर ठेवणे, कपडे वाळत घालणे, घड्या करून कपाटात ठेवणे हे सर्व घरच्या मालकिणीवर खूष होते. किती व्यवस्थित करते नाही ही बाई. पुन्हा आपल्याला निगुतिने पूर्णं करते. पण ह्या बापलेकिचं नाव नका काढू! हे दोघे चुकून कधी आमच्या वाटेला गेलेत तर आम्ही "मेलो मेलो" ओरडून पळ पण काढू शकत नाही. अशी काही राक्षसी पध्धतीने कामे करतात की त्या दिवशी आमचा खात्माच होतो. आणि वर सावळा गोंधळ किती! कुठली भांडी कोणत्याही ठिकाणी ठासून देतात, कपड्यांना तर तुरुंगात डांबल्यासारखे ठेवतात. ओट्याला तर अंघोळ तरी घालतात सर्दी होण्याईतकी भरपूर नाहीतर धुळीबरोबर खेळायला सोडून जातात. आपलं नशीबच खोटं . या बायका कशाला लग्नं करतात आणि पुरुषांना आणि मुलांना मोकळे रान देतात धुडगूस घालायला?
हे सर्वं ऎकून तर सर्व नळ (वॉशर चांगले असूनही) चांगली टिपं गाळायला लागलेत. बेसिनला तर चांगली धार लागलेलीच होती. tube-light व पंखे गरज नसतानाही जाळता म्हणून चिडलेली होती. शेवटी दरवाज्यांनी आमची बाजू घेतली. " नाही हं. तेवढे काही वाईट नाहीत ते. रात्री बाहेर जाताना नीट बंद करतात आम्हाला.कुलूप लावायला विसरत नाही. सोफ़ा, पडदे पण कौतुक करायला सरसावले - आम्हाला चांगले झटकून साफ़ करतात. tv दाखवतात आल्यागेल्याचे तोंड भरून स्वागत करतात.
चला हे ही नसे थोडके. animation & personification काही वाईट शब्दं नाहीत. पण पेन व पुस्तकं आमच्य्यवर जाम खूष आहेत. ते तर कधीच तक्रार करू शकत नाहीत. तेच तर आमची बाजू मांडत होते इतका वेळ!

3 comments:

अनु said...

Mast lihile ahe. Avadale. Chahachya dabyache manogat khas..

Anonymous said...

hahaha. amachya gharatahi agadi hiiiiich paristhiti :D

Nandan said...

namaskar kaka, barech diwas navin kahi lihile nahit? Pudhachya post chi vaat pahto aahe.