Sunday, September 24, 2006

कसं असतं आजारपण?

(नसलेल्या) डोक्याची जड होण्याची जाणीव. सूर्याने डोळ्यांची जागा घेतली की काय असे वाटायला लावणारा दाह, हातापायांचे अस्तित्व हे कामचुकार मुलांसारखे. लाड करून घ्यायला तयार, पण काम सांगितले की स्वत:ला पुढे उचलायला संपूर्ण नकार. हळुहळू चहाचा घोट व (गरम) पाण्याचा घोट सारखाच वाटतो. स्वयंपाकाचा सुगंध आसमंतात दरवळूनही पोटावर त्याचा परिणाम होत नाही.
अचानक vibrating table सारखे शरीर उडायला लागते. आत नीट ठेवलेली blankets घाइघाईने काढल्या जातात ती शरीराबरोबर थाडथाड उडण्यासाठी. हळुहळू हिही थरथर नाहिशी होते वादळापूर्वीच्या शांततेसारखी. लवकरच कान हे स्वत:चे नसून किटलीचे आहेत हे जाणवायला लागते त्यातून निघणार्या वाफ़ांमुळे. अंगाची भट्टी पेटायला लागते. थर्मामिटरशी दोस्ती होते आणि ती वाढतच जाते. डॉक्टरशी जवळचे नाते निर्माण होतं. हॉस्पिटल व पलंग आपले वाटायला लागतात. अन्नावरची वासना उडताच सर्वं प्रकारचे पदार्थ सेवेशी हजर होतात. पण कडू गोळी, capsules, व ईंजेक्शन हेच काय ते खरे साथीदार बनतात. ceilingकडे बघणे, पंख्याशी संवाद मनातून करणे, हे नित्याचे छंद होतात. घड्याळ फ़ार हळू चालतय असं वाटतं. stereo चे सूर बेसूर होतात, ग्लानी आणि झोप, खाणे आणि गिळणे, बघणे आणि डोळे उघडॆ ठेवणे, यातील फ़रक नाहीसा होतो.
आणि अचानक कायापालट होतो. दरदरून घामाची अंघोळ होते. शब्दं फ़ुटतात ओठातून व कधी एकदा अंघोळ करून हे आजारपणाचे सुतक काढून टाकतो असे होते. बरं वाटल्यानंतर , मला बरं वाटत नव्हतं, ह्यामुळे बरं नं वाटायची काहीच गरज उरत नाही.


हेमंत_सूरत

Tuesday, September 19, 2006

सूरती फ़रसाण - ४

हा माझा आणि सौ. चा एक संवाद.
"आपल्याला सूरतला येऊन इतकी वर्षे झालीत, पण आपण काही बाबतीत अजिबात सूरती झालो नाही."
सौ.चा प्रश्न,"नक्की कोणत्या बाबतीत म्हणताय?"
"फ़ाफ़डा, खाकरा, लोचो, गोटा, सेव-टामेटानी शाग हे सर्व आपल्याला कधी बोलावताहेत असे वाटलेच नाही. अजूनही कांदे-पोहे, शिरा, उपमा ह्याचीच इच्छा होते."
"तुम्ही चान्स असूनही गुजराती मुलीशी लग्नं केलं नाही, तेही सूरतमध्ये राहून, त्याचा शाप तुम्हाला लागतोय."
"म्हणजे काय? मी नाही समजलो."
"माझ्याशी लग्नं करण्याआधी चक्कं आठ वर्षं तुम्ही सूरतच्या मोहजाळात होतात, तरीही माझ्यासारख्या मराठी मुलीशीच तेही arranged marriage करण्याचा आग्रहं तुम्ही धरलात तर तुम्हाला कशी ह्या गुजराती फ़रसाणाची गोडी लागेल?"
" हो, माझे colleagues म्हणत होते गंमतीने, कर की एखाद्या गुजराती मुलीशी लग्नं. त्याच वेळेस सचिन गुजराती अंजली मेह्ताच्या प्रेमात पडून लग्नं करून बसला होता."
"तेच कशाला, त्याहीपूर्वी, अनूप झलोटा सोनालीच्या प्रेमात पडून नंतर मोकळा पण झाला होता रूपकुंवर राठोडला line clear देऊन."
"मग माझे काय झाले असते जर मी एखाद्या "पटेल" मुलीशी लग्नं केले असते तर?"
" काही विशेष नाही. तिने मजबूत बांध्याची असल्याने मोलकरीण घरात अजिबात ठेवली नसती. सर्वं कामं स्वत:च केली असती. सकाळी ५ला उठून पाणी भरून अंघोळ करून कपडे धुऊन ६ वाजेपर्यंत बाहेर गॅलरीत वाळायला पण टाकले असते. आणि जर तुम्ही तोपर्यंत उठला नसता तर तुम्हालाही पिळून दांडीवर वाळत टाकले असते."
"बाप रे!" मी विव्हळलो.
"हे तर काहीच नाही. आता कसे तुम्ही एकाच मुलीवर थांबला आहात. तिने नसते सोडले तुम्हाला जोपर्यंत एक तरी मुलगा होईपर्यंत. मग भलेही त्याआधी चार मुली झाल्या असत्या. माहीती आहे नं, पटेल बाया काय म्हणतात ते - बाबो एक तो जोइएज (मुलगा एक तरी हवाच).
" मग त्या चार मुलींचा हुंडा मी कुठून दिला असता?"
"त्यासाठी तिने तुम्हाला इच्छा नसतानाही tuition किंवाconsultancy जबरदस्तीने करायला लावली असतीच."
"नको रे बाबा पटलाणीची मुलगी"
"पण एक फ़ायदा असता अजून."
"कोणता?"
"तुम्ही घरी नसताना दिवसा- रात्री चोर कधीच तुमच्या घरी येऊ शकला नसता. अहमदाबादला नाही का तुम्ही बघितले तुमच्या मित्राकडे, अख्ख्या पटेल वाडीत दरवाजे सताड उघडे असतात. आहे कोणा चोराची पटलाणीच्या हातचा मार खऊन मरायची?"
मला अजून जरा चिडवायची लहर आली.
"मग देसाइ मुलीशी केले असते लग्नं तर?"
" वा! मग काय तुम्हाला एकडची काडी तिकडे करावी लागली नसती. दोन वेळा हातात भरलेलं ताट घेऊन आली असती रोज तुमच्यापुढे. तीही घरात असूनसुध्धा नटून."
"मग तर फ़ारच छान."
"घी देखा लेकिन बडगा नही देखा बच्चमजी. देसाई मुलगी बरी सोडेल अशीतशी. "
"काय केलं असतं तिने?"
"निदान दर वर्षी पाच तोळे सोनं, दहा हजाराची gift द्यायला लावली असती. शिवाय जमीनीसाठी हट्टं धरला असता. घरात तिचे पूर्णं वर्चस्वं. ती पंतप्रधान, तुम्ही प्रेसिडेंट. मोरारजी देसाई काही उगीच prime minister नव्हते. तेच पाणी देसाई मुलींमध्ये आहे. "
" हे थोडंफ़ार नागर मुलींकडे जातय."
"ते मी सांगतच होते. देसाई मुलीपेक्षा नागर जास्तं dominating. मोजकंच करेल, काही उरू देणार नाही, प्रत्येक बाबतीत तिची परवानगी घ्यावी लगेल. येणार्या-जाणार्यावर लक्षं ठेवून राहील. वर चिक्कूपणाचा अर्कं!"
"मग तुम्हा कोब्रांसारखीच.(सौ. माहेरची कोब्रा)"
" हां. पण आम्ही वचावचा नाही बोलत त्यांच्यासारखे. आणि भांडवल नाही करत आमच्या सौंदर्याचे."सौ.च्या शेपटीवर पाय देताच तिने फ़णा काढला. आता जरा सावरून घ्यायला हवं. तेव्हा विचारले-
"घांची मुलीचं काय?"
एकदम हसता हसता तिने ठसका दिला आणि बोलली,"तुमच्या वडिलांना चालेल का सुनेबरोबर दारू प्यायला?"
"काय?" आता आशचर्य करण्याची पाळी माझी होती.
" घांची , खत्री ह्या एकदम धूप्पं गोर्या. skin एकदम चांदीची. पण brain power कमी. सासू-सासर्यांबरोबर दवा-पाणी किंवा रम-पाणी हे नेहमीचेच. शिवाय खत्रींचे तपेलू(एका भांड्यात मटण शिजवणे.) regular"
"मग ह्याचा खर्चंही फ़ार येत असेल."
"सौंदर्याची maintainance price असतेच नं"
मी जरा हबकलोच हे सर्वं ऎकून.
"मग काय ठरलं तुमचं? की अजून पारशी, वाणिया, जैन याबद्दल माहीती हवीय?"
"नको नको. तूच माझी वहीदा. तूच माझी dimple आणि तूच माझी आशा पारेख." व.पु. काळेंची गोष्ट मी आठवून मी म्हणालो.
"त्यापेक्षा तूच माझी माधुरी म्हंटलं असतं तर बरं नसतं का वाटलं."

हेमंत_सूरत

Sunday, September 17, 2006

सूरती फ़रसाण - ३

खो-खो चा आणि driving चा काय संबंध आहे हे सूरतच्या रस्त्यावर मला फ़ार प्रकर्षाने जाणवले. घरापासून तसा फ़क्त सहा किलोमीटरचा stretch, परंतु भौगोलिक परीस्थिती न जाणता एखाद्याने स्वत:च्याच मस्तीत हा प्रवास(?) करायचे ठरवले, तर काय आफ़त येऊ शकते , ते तुम्हाला कळेल. पहिला किलोमीटर संपताच तापी नदीवरचा पूल लागतो. पुलाच्या आधी एक मोठ्ठा elliptical iseland चा अडसर आहे. ह्या iseland ला वळसा घालून जाताना नेमका चढाव आहे. आमच्या अडाजणमध्ये अर्धा डझन driving schools आहेत. त्यातली एक तरी शिकाऊ कार नेमकी चढावावरच बंद पडते तीही तुमच्या समोर. बाकीचे त्याला अणि तुम्हाला हुशारीने वळसा घालून खो-खो चा खंबा टाळून कसे जातात हे rear-view mirror मध्ये स्पष्टपणे दिसतं.
जरा पुढे गेल्यावर bridge च्या शेवटी flyoverचे bifurcation आहे. त्या bifurcationच्या आधी समोरची स्कूटर turn घेणार की नाही हे खो-खो मध्ये हूल मारताना खेळणार्याच्या पदन्यासावरून आणि कुल्ल्यांच्या हलचालींवरून ओळखण्याचे बाळकडू (चुकलं की विंचुरकर सर ओरडायचे,"पोट्ट्या रट्टा हाणू का पाठीवर?" हे बाळकडूच) मिळाल्याने मला काहीच त्रास नाही. पण मी हे कसं ऒळखतो याचा त्रास बरोबरीच्यांना किंवा मागल्यांना होतो.
अठवा गेटचे दुसरे सर्कल ओलांडून गेले की खरी परीक्षा सुरू होते. आम्हा काका लोकांची पंचाईत ही की समोरचे vehicle ह्या collegesच्या जंजाळात नेमके कोणत्या college कडे वळेल. teenager मुलगी असेल समोरच्या vehicle वर तर फ़ार जपून रहावे लगते. (छोटा जरी accident झाला तरी खरी सहानुभूती तिलाच मिळणार ना!). आता सवयीने माझे ठोकताळे पक्के होताहेत. एकदम मॉड ड्रेस, exotic life-style दाखविणारा केशसंभार, तर हमखास समजावे की ती opposite sideच्या वाडिया women's college चीच कन्यका. ती swiftly right turnमारणारच. जर ती sophisticated dress sense असणारी असेल तर architecture college जे left side ला आहे, तेथे वळणार. जर ती fast जाते आहे आणि अचानक तुमच्या दोन्ही बाजूंनी hero honda splendour वाले जायला लागले की समजावे ही बया २ किलोमीटर दूर असणार्या SPB English Medium Commerce College चीच! दूसरी असूच शकत नाही.(तिचे चाहते तिच्यासाठी पायलट बनून रस्ता मोकळा करणार). त्याहीपुढे जाणे मला तर अपरिहार्य आहे. पण या घोळक्यात एखदी साधी, कानात काहीच नाही, गळ्यात काही नाही हे मानेवर न चमचमणार्या, न reflect होणार्या rays मुळे कळणारी, सोज्वळ मुलगी असेल spirit वर तर ती खुशाल आमच्या svnit ची आहे ह्यावर शर्त मारावी. पुढे कॉलेजमध्ये शिरल्यावर जर एखादी मुलगी तुमच्याहीपेक्षा fast जातेय असे दिसले तर ती south gujarat university campus (जो आमच्या च्या campus मागे आहे) ची rare species मधली आहे (युनि. त मुली एकंदर कमीच) हे ओळखायला कशाचीच गरज पदत नाही.
ह्या सर्व संकटांवर मात केली तरी एक जास्तीचे गंडांतर नेहमीच भेडसावते. सूरती बायका, खास करून married catagoryतल्या, आपल्या स्व्त:च्या blouse ची पाठ, एकदम competition मध्ये ऊघडी टाकतात. एकदा तर माझ्यामागे बसलेली सौ. ,समोरचीची शर्मिला टागोरची मागून फ़क्तं गाठ मारलेले blouse बघून माझ्या कानात किंचाळली," ह्या सूरती बायकांना काही लाजा दिसत नाही". मी तिला म्हंटले, "बघ, कितीतरी accidents ह्यांच्या blouses मुळे होता होता वाचलेत याची यांना कल्पना नाही."
हा सुरती फ़रसाणचा तिसरा अध्याय येथे समप्त करतोय. चवथा यथावकाश.
हेमंत_सूरत

Friday, September 15, 2006

सूरती फ़रसाण - २

सूरतला आल्यावर आम्ही वाट बघत होतो प्रथम कोण येतं आमच्याकडे. नवीन क्वार्टर, नवीन जॉब, नवीन शहर, सगळंकाही शेअर करायचं होतं. अपेक्षित नसताना एक पोस्ट-कार्ड दर्वाज्याखालून सरकलं. गोविंद पाचपोर येणार होता केव्हातरी येत्या पंधरवड्यात. खास टीप होती, कोणालाही कळवू नये येण्याबद्दल. काय गौडबंगाल आहे हे कळेना. शेवटी आल्यावर कळेलच तेव्हा speculation चा नाद सोडला.
एके दिवशी संध्याकाळी डोअरबेल वाजली. स्वारी गोविंदची होती. surprise of surprises म्हणजे सोबत एक देखणा चेहरा होता.
"अरे, love marriage आटोपून आलोय."
"मग ये की. आत बस. पाणी घे. त्यानंतर सांग सविस्तर."
"अगं सोनल, बस. हेमंत आपलाच आहे. "
"मी आत जाते. चहा ठेवते सर्वांसाठी. तुम्ही बोला निवांत."
"सापडेल का चहा साखरेचं?"
"नवरा मिळवला गोविंदसारखा आणि तोही त्याच्या आईच्या नजरेखालून पळवून तर चहा-साखरेच्या डब्याची काय बात?" सोनल आत गेली.
" पण गोविंद, मला तर तू तिला पळवून आणलंय असं वाटतय."
" हो. मीच पळवून आणलय तिला"
"मला एक सांग. लग्नं करणारे प्रेमी जीव, लग्नानंतर ऊटी, मथेरान, माऊंट अबू येथे जातात. तू जरा अरसिकच दिसतोय. माझ्यासारख्या ब्रह्मचार्याच्या मठीत तेही सूरतसारख्या dry (सर्वार्थाने) शहरात तू तुझ्या बायकोला आणलेय. काय कारण तरी काही आहे नाहीतर ती बिचारी आयुष्यभर तुला सुनावत राहील मला सूरतला नेले, मला सूरतला नेले. जगातली सगळी रमणीय स्थळे नाहीशी झाली होती माझ्या honeymoon च्या वेळेस."
तेवढ्यात चहा घेऊन सोनल आली,"नाही हं. मी काही म्हणणार नाही. माझा नवरा चांगला डोकेबाज आहे सूरतची निवड करण्यात. ऎका त्याच्या तोंडून."
लगेच गोविंदचा धबधबा सुरू झाला.
" अरे, मी हिला कॉलेजमधून मैत्रिणीकरवी निरोप देऊन वर्ध्याला नेले. तेथे भटजी तयार होता. चार मित्रं साक्षीदार होतेच. सात फ़ेरे घेवून तासाभरात नवजीवन express मध्ये बसून सूरतकडे कूच केले. ह्या सगळ्यामागे एकच हेतू. मी वर्ध्याला जाऊन लग्नं करणार हे कोणी स्वप्नातही ओळखणार नाही. त्यानंतर तू म्हंटल्याप्रमाणे, हिच्या घरचे, माझ्या घरचे hill station, goa वगैरे ठिकाणी शोध घेतील. सूरतला अम्ही राहू ह्याचाही कोणी विचार करू शकणार नाही. सोनलचे भाऊ जरा भडक डोक्याचे. कुर्हाड हाणायलाही कमी करणार नाहीत माझ्या डोक्यात. आम्ही दोघेही जातीबाहेर जाऊन लग्नं केल्यामुळे दोघांच्याही घरी आगी लावून आलो आहोत. शिवाय दूसरे असे की तू academic institute च्या campus मध्ये. by law, पोलीसांना तुझ्या principal च्या परवानगीशिवाय मला हात लावता येणार नाही. मी तुझ्या मठीत सुरक्षित आहे. राहिली गोष्टं तुझ्या अडसराची. तर तू माझ्या नावाने institute guest house book केलेच आहे तर तूच तेथे रात्री रहा. सगळं काही स्थिरस्थावर होईपर्यंत आम्ही quarter ला राहू. आता काही अडचण?"
मी गोविंदला साष्टांग प्रणिपात घालायचाच तो काय बाकी होता.
३ दिवसांनंतर, honeymoon couple चे चेहरे ऊजळलेले दिसत होते.
" नागपूरहून फ़ोन आलाय मित्रांचा. आमचे सामान जे आई-बाबांनी बाहेर अंगणात फ़ेकले होते ते परत घेतले. सोनलच्या भावांनी कुर्हाडी भिंतीवर टांगून ठेवल्यात. आता आमचा खरा honeymoon सुरू. आम्ही चाललो mount abu ला. परत आल्यावर भेटू"
त्या ३-४ दिवसात जे माझ्यासारख्या ब्रह्मचार्याचे जे लाड झाले खाण्यापिण्याचे सोनल वहिनींकडून ते मी कधीच विसरू शकणार नाही. अतिशय जड अंत:करणाने मी त्यांना निरोप दिला. आताही मी जेव्हा जेव्हा गोविंदकडे नागपूरला जातो तेव्हा तेव्हा माझी खास बडदास्त ठेवली जाते. एक संध्याकाळ गोविंद-सोनल कडे ठरलेलीच. माझे लग्नं झाल्यानंतर त्यात स्वातीची भर पडली एका जास्तीच्या ताटाची.

Friday, September 08, 2006

सूरती फ़रसाण

१९८० ला बंगलोरच्या टाटा इंस्टिट्युट (I.I.Sc ला टाटा इंस्टिट्युट म्हणतात) मधून मास्टर ऑफ़ इंजीनियरींगची पदवी डोळ्यांसमोर इतरांना मुंबई, दिल्ली, टेक्सास, ह्रोड आयलंड अशी स्वप्ने दाखवीत होती तेव्हा अस्मादिक पाय जमिनीवर घट्ट रोवून २-३ जॉब हॉपिंग करत एक दीड वर्षांनी सूरतला येऊन पोचलेत तेव्हा हा कामातून गेला हे मला सर्वांच्या डोळ्यांतून न सांगता जाणवलं. सूरतला सेटल होण्यासाठी नागपुर स्टेशन सोडले तेव्हा आईच्या डोळ्यात जे पाणी साचले होते ते शिकण्यासाठी बंगलोरला जातानापेक्षा जास्त होते हे सहज जाणवले. साहजिकच आहे, बंगलोर दोन वर्षात सोडायचे होते पण सूरत केव्हा सोडणार याची शाश्वती नव्हती. वडिलांच्या डोळ्यात एवढाच पगार नागपूरला मिळतोय तर सूरतला जाण्याची गरजच काय हे डोकावत होते. मित्रं हाच विचार करत होते की कोणीही अशी ambition ठेवतो मी मोठ्या मेट्रो सिटीन जाईन किंवा फ़ॉरीनला जाईन मग हा खुळा सूरतला जाण्याचे वेड काय डोक्यात घेवून बसलाय?
माझं उत्तर सोपं होतं. campus based life मला हवं होतं. जेथे quarter मोठे मिळणार, स्वत:चे हक्काचे सर्कल जमवणार. वेगळ्या अशा ठिकाणी माझी identity बनवणार. असे शहर, जेथे शहराचे सर्वं फ़ायदे असणार पण मेट्रो सिटीची लगबग धावपळ आणि जिवघेणी rat race नसणार, ते मला सूरतच्या रूपाने मिळाले. मग गुजराथी भाषा, नवीन लोक, नवीन जेवण ह्यांचा काहीच अडसर वाटला नाही. सूरतच काय, दूसरे कोणतेही तसेच शहर चालले असते.
लवकरच मित्रांची पत्रे यायला लागलीत. एक एक करून सूरतचा पाहुणचार घ्यायला आलेत. कॉमेंटस, गप्पांच्या फ़ैरी झडायला लागल्यात.

सूरतला यायचे कधी ठरवले?
appointment letter मिळाल्यावर!
यायचे कसे प्लान केले? आधीचे काही observation? कोणी ओळखीचे?
history मध्ये शिवाजीने लूटले होते एवढीच ओळख.
नकाशात तरी पाहीले होते का?
पोरबंदरच्या अलिकडे आहे एवढाच अंदाज होता.(तो फ़ारच चुकीचा निघाला. अलिकडे शब्दाचा अर्थच बदलेल एवढं अलिकडे निघालं सूरत.)
थिएटर्स आहेत का?
२१ आहेत.
बघण्यासारखे काही आहे का?
आम्ही सोडून काहीच नाही.

दुपारी जेवणानंतर ३ वाजताचा "चष्मेबद्दूर" टाकायचे ठरले.
१ वाजता जेवण तट्टं झाल्यावर आमच्या मित्राने जी ताणून दिली ती थेट साडेचार वाजेपर्यंत. ऊठल्यावर महाराज विचारताहेत," सूरतला ऊन्हं लवकर कलतात वाटतं?'
"आमच्याकडे या वेळेला एवढीच ऊन्हे कलतात."
"चला, चहा घेवून, सिनेमाला जाऊ. सहा नंतर फ़िरणं तरी होईल."
"आता सहाचा शो मिळेल जर चहा थिएटरमध्ये घेतला तर कारण तयार होवून पोचेस्तोवर साडेपाच होतील. बुकिंग विंडोवर काही तुमचा काका बसलेला नाही ऊशिरा पोचलो तर"
"काय एवढा वेळ मी झोपलो होतो?"
"सूरतच्या भाज्या काही उगाच नाही वाखाणल्या जात! एवढी ढेरपोटी माणसे आजूबाजूला फ़िरताहेत ती ह्या सूरती जेवणामुळेच"
सूरतची अजून काय स्पेशालिटी?

येथे engagementला "half marriage" म्हणतात.
"स"चा उच्चार "ह" असा करतात. गुजराथीत साडेसात वाजता ये असे म्हणायचे असेल तर, "साढासात वागे आवजो" असे कोणीही गुजराथी व्यक्ति म्हणेल. पण सूरती माणूस,"हाडाहात वागे आवजो" असेच उच्चारेल. sober, elegant, class हे शब्दंच सूरती लोकांच्या डिक्शनरीत नाहीत. त्याऎवजी, cheap, gaudy हेच आढळतील. general knowledge म्हणजे सिनेमा, स्टार्सची लफ़डी, कपड्यांची फ़ॅशन, गॉसिप हेच! अख्ख्या भारताचे जेवढे per capita तेलाचे consumption आहे त्याच्या दुप्पट गुजराथचे आहे. येथे तळलेले पदार्थ एवढ्या चवीने खाल्ले जातात की आम्ही सूरतमध्ये " एव्हरीडे इज फ़्रायडे" हेच बघतो. प्रत्येक गोष्ट. जराही आवडली की ती "फ़ाईन"च असते. फ़ाईन शब्द सूरतला एवढा वापरतात की आम्हाला तो आता गुजराथीतूनच english मध्ये आला हे ठामपणे वाटतेय. बहू फ़ाईन अर्थात फ़ार छान हे सर्वदूर ऎकू येतं. पण फ़ाईन आर्ट, exhibition, paintings, classical concerts हे मुळी ९०-९५ पर्यंत येथे अस्तित्वातच नव्ह्ते.
मग अस्तित्वात काय आहे? साध्या कपड्यात फ़िरणारे करोडपती, जे आठ आण्याच्या भाजीसाठी घासाघीस करतील, पण अंबालाल सारभाईचा चार करोडचा (१९८० चा)पब्लीक ईश्यू एका दिवसात over-subscribe करतील. शेअर मार्केट चे खिलाडी आहेत. लाख दोन लाखाचे शेअर चहा-पाण्याच्या खर्चाईतके पटकन घेतील. जेवायच्या वेळी गेलो तर आग्रहाने जेवायला बसवतील (फ़ार ओळख लागत नाही त्यांच्याबरोबर जेवायला.) तित्क्याच सहजतेने कोटी रुपये दान देवून टाकतील आणि बोलणार पण नाहीत.
प्लेग आणि पूर आलेत तरी भजी खायला चुकणार नाहीत. कुठे काय खायला चांगले मिळेल ते जिभेवर पक्के लक्षात ठेवतील. अमर्नाथ, वैष्णोदेवी, काश्मीर, मलेशिया, सिंगापूर सगळीकडे जणू काही घराच्या बाजूला आहे ह्या थाटात जातील. बसने प्रवास below dignity मानतील. कपडे कायम (तरूणाईचे) latest fashion चे. मोरारीबापू, स्वामीनारायण, आशारामबापू, परीकरीदेवी, ईंदिराबेटी, सर्वांकडून सत्संग आवडीने करवून घेतील.
आत्ताच्या पूरानंतरही एका आठवड्यात सूरत चालते-फ़िरते करणे हेही सूरती लोकांनाच जमते. तेही तक्रारींशिवाय. (त्याशिवाय भजी खावून मिरवता कसे येइल?)

हेमंत सूरत

वारूळ सूरतचे!

मुंग्यांच्या वारूळावर पाणी धो धो कोसळले आणी सर्वं मुंग्या गांगरून गेल्यात. ज्या मुंग्या साखर आणायला दूर दूर गेल्या होत्या, त्यांना परत येण्याचा मार्गंच बंद झाला. कामकरी मुंग्या जवळपास होत्या त्यांनी लगेच तुरु-तुरु चालत आपापले खोपे गाठले. बाळ मुंग्यांनी एकच आकांत मांडला. कोठार सांभाळणार्या मुंग्यांनी दरवाजे लावून घेतले. जो जेथे आहे तेथे त्याने पाय घट्टं रोवून उभे राहावे असे राणी मुंगीने फ़र्मान काढले. तिने अंडी देण्याचे काम तात्पुरते थांबविले. बरोबर लवाजमा घेतला आणि फ़िरतीवर निघाली. तिला खास पंखांच्या मुंग्यांनी वर उचलले आणि लगेच फ़र्मान सोडले, उजव्या बाजूला जे पाणी साचले आहे ते वारूळाला धोकादायक आहे. तेथे लगेच मोठे छिद्र करून त्यातून पाणी बाहेर जावू द्या. त्याबरोबर काही कामकरी मुंग्या वाहून गेल्यात तरी हरकत नाही पण बाळ मुंग्यांना अन कोठाराला धक्का लागता कामा नये. त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली. थोड्या मुंग्या वाहून गेल्यात. पण बाकी वाचल्या.
पाणी ओसरताच सर्वांनी कामाला लागावे हे ठरलेच होते. पण पाणी कोसळायचे थांबेचना. प्रत्येक छोट्या कोठारातील अन्नकण संपून गेलेत. हवा कोंदट व्हायला लागली. पाण्यामुळे बाहेरून मोकळी हवा येणे केंव्हाच थांबले होते. सर्व मुंग्यांना आता प्रार्थना करण्याशिवाय काहीच करता येणे शक्य नव्हते.
अखेर आठवड्याने पाणी कोसळणे थांबले. प्रथम काही मुंग्या पोहत शेजारच्या वारूळात राणी मुंगीचा संदेश घेवून गेल्या. शेजार्च्या राणीने तिच्या कामकरी मुंग्या मदतीला पाठवल्या. आता नवीन हुरूप आला. हवा मोकळी झाली. अन्नं सुकलेलं मिळालं. बाळ मुंग्या खूष झाल्या. राणी मुंगी जातीने मोठे कोठार उघडून मदतीला धावली. छोट्या छोट्या कोंदणात लपून बसलेल्या मुंग्या आता उत्साहाने समोर आल्यात. किती गेल्या, किती हरवल्यात, कोण किती कामाला आले याचा हिशोब ठेवू लागले.
ऊन आले. दणकट मुंग्या पुन्हा कामाला लागल्या. कोणी साखर आणली, कोणी रवा आणला, कोणी कणिक आणली. कोणी कोठार दुरुस्त केलं. कोणी दरवाजे ठिक केलेत. ज्याला जे जमले ते ते त्याने केले. तरीही एक्स्प्रेस मुंग्या त्यांच्या एक्स्ट्रा पायांशिवाय अडून बसल्या. पण काम अडून बसलं नाही. आता मुंग्यांच्या राज्यात आलबेल आहे. पण हल्ली प्रत्येक मुंगी कामाला जाताना वर आभाळाकडे बघून ढगांचा अंदाज घेतल्याशिवाय कामाला सुरूवात करत नाही.

हेमंत सूरत