Wednesday, April 29, 2009

होमवर्क आणि एक्सरसाईझ

शाळेत कोणताही धडा कितीही interesting असला तरी त्याची मजा लगेच निघून जायची त्यावरील exercises पूर्ण करताना! रिकाम्या जागा भरा, जोड्या जमवा, विरुध्दार्थी शब्द द्या, reference to context लिहा, थोडक्यात मुद्देसूद लिहा आणि काय काय तो अत्याचार! पण आता जर real life based धडा घेतला तर ह्याच exercises किती interesting होतील पहा. एक झलक !

रिकम्या जागा भरा :
१) आईने सांगितलेले काम स्वत:हून _________ करणार.(बाबा/ मुलगी/ कामवाली/ आईच)
२) दुपारी अचानक खाली पडून बशी फ़ुटली ती____________ मुळे! (वारा/ हलगर्जीपणा/ मांजरीचा धक्का)

जोड्या जमवा :

१) नवरा ----------------- परधार्जिणी
२)मुलगी-------------------असून अडचण नसून खोळंबा
३)कामवाली----------------कसा बाई यांना वेळ मिळतो चकाट्या पिटायला
४)नातेवाईक---------------सांगून रजा घेईल तर शपथ!
५)मित्र---------------------ठरवून येतील मदतीला तर नवल

Reference To Context लिहा:
a) या घरात माझं कुणी ऎकेल तो दिवस शेवटचा.
b)सांगून बाहेर जाणं ही पध्दत फ़क्तं आमच्या माहेरीच!
c) हा रंग मला खुलून दिसतो.
d) मी सांगितलं म्हणजे नाहीच ऎकणार.
e) मुलगा आहे, राज्याभिषेकाशिवायच सिंहासन चालवतोय.

थोडक्यात लिहा :
i) चोरून पाहीलेला सिनेमा
ii) वाचवलेले पैसे
iii) पहिला खोटारडेपणा
iv) दुसर्यांचा वेंधळेपणा
v) नसती उठाठेव
v) लष्करच्या भाकर्या

खालील प्रश्नांची उत्तरे मुद्देसूद लिहा :
१)जर माझे तुझ्याशी लग्नं झाले नसते तर काय झाले असते?
२) मुलगा नक्की कोणाचे व किती चांगले(?) गुण घेऊन मोठा होतोय?
३) तुमच्या आईचे कुठे चुकले (किती वेळा व कोणत्या वेळेला)
४) तुझ्या वडिलांनी जर वेळीच मदत केली असती तर मी (कुठल्या) कुठे (म्हणजे नक्की कुठे?) पोचलो असतो?
५) माझं ऎकलं असतं तर किती फ़ायदा झाला असता.

शब्दांचा गुंतावळा

माणूस कशात गुंततो? एखादेच स्मितहास्य, वेगळे असे समर्पक वाक्य, नजरेच्या कप्प्यातून दिसणारी एक चोरटी झलक, ओझरताच होणारा हळवासा एक स्पर्श, टाळ्यांनी मिळालेला उत्फ़ूर्त प्रतिसाद, की डोळ्यातून ओसंडणारा स्निग्ध भाव, मुग्धाळलेल्या चेहर्याचा एक flash-back, अजून पुढे बोल ना सुचविणारे अविर्भाव, कशाकशाचे म्हणून नाव घ्यावे?
मजा अशी आहे की शब्दांचा गुंता करणारा त्यातून सरळपणे निघून जातो आरपार . आपल्या स्त्रीसुलभ हालचालींनी केशकलाप नीट करणारी मोहिनी नंतर केसांचा गुंता करून तो अलगद खिडकीतून बाहेर टाकणारी पण सहज होते नामानिरळी. पण नजरेत अडकून शब्दात फ़सणारेच फ़ार गुंता करतात आयुष्याचा! बरेच जण धारदार शब्दांची करवत अशी काही चालवतात की डोळ्यात पाहण्याचा व तदनंतर अडकण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तर काही अतिउत्साही डोळ्यांकडे किंवा डोळ्यांमध्ये न बघताच शब्दांचा दांडपट्टा असा काही चलवतात की त्यात अडकण्याचा कुठे मागमूसही नसतो. एकतर्फ़ी लिहीलेल्या प्रेमपत्रांमधून शाळा कॉलेजचे विद्यार्थी प्रेमाच्या नाही तर प्रिंसीपॉलच्या जाळ्यात अडकतात. लग्नानंतर "जबाबदारी घेतो" हे दोन शब्दं आयुष्यभर पेलावे लागतात.
कितीही कलंदर असला कलावंत तरी contract च्या शब्दांच्या चौकटीत अडकून प्रतिभा पणाला लावतोच. "शब्द दिला" म्हणून प्रेमात किंवा मैत्रीत नुकसान करून घेणारे नेहमीच बघत आलोय आपण पण मी त्याला शब्द द्यायला चुकले म्हणून हळहळणार्या व्यक्तिही कमी नाहीत या जगात.
निबंध म्हंटला की ५०० शब्दांच्या चौकटीत अडकायचो. कादंबरी म्हंटली की ५०० प्रिंटेड पानांच्या जंजाळात कादंबरीकार वर्षभर तरी अडकतोच.नाटकात किंवा सिनेमात अडकणारे नट आपण नेहमीच पाहतो पण dailogue लिहून देण्यासाठी आपापल्या खोलीत काम संपेपर्यंत अडकवून घेणारे dialogue writers या दुनियेत आहेतच.

कमी पडलेत शब्द तर कविता
जास्तं सुसंबध्द केलेत तर लेख
पसारा मांडला शब्दांचा तर दीर्घकथा
वाहवत गेला समुद्रासारखा तर कादंबरी!

शब्दच ते पण त्याची रुपे किती?
जिव्हारी लागला तर बाण
हसवलं तर डायलॉग
फ़सवल तर थाप
थिजवल तर शाप
चिंब भिजवलं तर भावनात्मक लेख
विचार करायला लावलं तर कोडं
लिहायला लावलं तर विचारांच झाड

लहान मुलांसाठी बडबड गीत
सासरी जाणार्या मुलीच्या आईसाठी डोळ्यांचे "डबडब " गीत
प्रेम सफ़ल जाले तर तरंगवणारे काव्य
प्रेम विव्हळ झालात तर गझल
प्रेम उगाळत राहिलात तर लैला मजनू

कॅलीग्राफ़ीतूनही खुणावणारे शब्दंच!
neon signs मधून लक्श वेधून घेणारेही असतात शब्दंच.
वक्तेही बोलणार असतात "दोन शब्दं"
दु:खात धीर देतात थोरा-मोठयांचे "चार शब्दं"
वादविवाद झाला तर वाढतो शब्दाने शब्द
पण तरीही शेवटी आपल्याला नि:शब्द करतात ते शब्दच!

गरम गरम

का असं नाही होत? जेव्हा आपल्याला भूक लगते तेव्हा आपण लगेच काहीतरी गरम गरम करून खातो तसं जेव्हा काही लिहायची भूक लागते तसं लगेच instant का नाही सुचत? विचारांची कढई तापलेली असते, पेनची शाई तेलाचं काम करते, कागदाच्या बेसनात भिजवून विचाराची भजी का नाही तळून घेता येत?

तसं तर आपल्या डोक्याच्या कपाटात कोणत्याही ईतर कपाटात नसतील ईतके जिन्नस अनुभवाच्या गाठोड्यांमध्ये साठवून ठेवले असतात. फ़क्तं गाठी सुटत नाहीत. वस्तू नीट ठेवलेल्या नसतात. जर वस्तू मिळाल्यात तर त्याला कॉमेंटस आणि टॉंन्टस ह्याची जी फ़ोडणी बोलताना मिळते ती लिहीताना मिळत नाही. समोरच्याची appreciative नजर आणि तिची लिंबू कोथिंबीर त्यावर पिळून मिळत नाही. हे सगळं मिळालं तर योग्य वेळेची डिश मिळत नाही. शिवाय वा! किंवा काहीतरीच असे चमचे पाहिजे खताना तेही जरा दुष्प्राप्यच असतात.

तरीही माणसं लिहीत असतात त्याला लोक शिळंपाकं समजून तोंडी लावतात, अर्धवट खाऊन ्फ़ेकून देतात. क्वचित आवडलं तर मनात ठेवतात आणि पुढला पदार्थ तितकाच चांगला झाला नाही तर नावं ठेवतात. शेवटी पोटाची भूक विचारांची भूक ही मणसाला नवीन नवीन पदार्थ करायलाच लावते. चुली वेगवेगळ्या पेटतात, तेल तूप ओतायचे थांबत नाही, डाळी बेसन, वाटून यायच्या थकत नाही, मग वेगवेगळ्या भाषांची कांद्याची भजी बरी बंद होतील?