Saturday, March 29, 2008

बडबड गोष्टी

बडबड गोष्टी
बडबडगीते असतात तशा ह्या बडबडगोष्टी! छोट्यांच्या तशाच मोठ्यांच्याही आवडीच्या! हां आता तुम्ही मोठे नसाल तर तुम्हाला नाही आवडणार ही गोष्टं वेगळी. छोटे असाल तर अजून सांगा म्हणणार. तर काय मग तुम्ही छोटे़च व्हा. मोठ्यांच काही ऎकू नका.
स्वर्गात ईंद्राचा दरबार भरला आहे. सभा तुडुंब भरली आहे ती सर्वं प्रकारच्या प्राण्यांनी. कैफ़ियत मांडताहेत ते प्राणी आणि ऎकताहेत ते पण प्राणीच. देव फ़क्त निवाडा करण्यासाठी बसलेत ते शेवटचा निवाडा करण्यासाठी. मध्ये ते काहीच बोलणार नाहीत. हो, एक माणूस(प्राणी) पण आहे त्यामध्ये जर आपल्या पोळीवर तूप ओतून घेता येईल का या विवंचनेत ऊभा असलेला एका कोपर्यात. ऎकतोय डोळ्यांनी अन पाहतोय कानांनी.
प्रश्न आहे तो प्राण्यांमध्ये. एका बाजूला तक्रार करताहेत ते प्राणी आहेत ससा, गाय, हरीण, जिराफ़, बकरी आणि दुसर्या बाजूला ऊभे आहेत ते वाघ, सिंह, लांडगा, बिबट्या,अस्वल वगैरे! दोन बाजूंमध्ये फ़रक आहे तो जीवन-मरणाचा. अक्षरश:! कारण पहिल्या बाजूचे ससा, गाय, बकरी वगैरे प्रुथ्वीवरून मेल्यानंतर स्वर्गात आलेले आहेत तर वाघ, सिंह, अस्वल हे खास देवांनी बोलवल्यामुळे जिवंतपणीच स्वर्गात आले आहेत. तक्रार आहे ती ह्याप्रमाणे -
ससा - मी चांगला गवत खात होतो जवळच्या कुरणात तर हा लांडगा मला कानात काहीतरी सांगतोय म्हणाला असं वाटल्यामुळे मी मान त्याच्या तोंडाजवळ नेली तर ह्याने माझे कानच खाल्लेत. आता ह्याला काही गरज होती का असं काही करण्याची? तूही तर कुरणाच्या दुसर्या बाजूने गवत खात खात तर येत होता ना.
लांडगा - मला शिकवू नकोस गवत खात होतो म्हणून. मी पाहीलं तर तू चक्क गवत खाता खाता एक तुरु तुरु धावणारा कोळी मटकावलास. लगेचच दुसरा कोळी मला तुझ्या कानावर दिसला म्हणून मी तो मटकावला तर तुझा कान नाजूक. लगेच तुटून माझ्या तोंडात आला.
ससा - ठीक आहे. पण मग माझ्या मानगुटीत दात रोवून का मारलस मला? आपलं ठरलं होतं ना की जरी आपण लहान मोठे असलोत तरी पोट भरलं असेल तर उगाचच दुसर्याला मारायचं नाही. एवढा वेळ तर तू गवत खात होतास?
लांडगा - आता तुझ्या आरस्पानी गळ्यातून जाणारे गवत मला दिसत होते. वर तो कोळी मला वेलची टाकल्यासारखा दिसत होता. मग मला राहवले नाही. तुझ्या गळ्यातले गवत खाण्यासाठी मी फ़क्तं दात रोवले व जिभेने माझ्या गळ्यात ओढून घेतले. आता त्यात तुझा जीव गेला तर मी काय करू?
तेवढ्यात ईतका वेळ मागे चुपचाप असलेली गाय वाघिणिकडे रोखून ओरडायला लागली. "ह्या लांडग्यामुळेच मी हकनाक जिवाला मुकली. मला माहीती आहे सशाला खाताना ह्या वाघिणिने नक्कीच ऊंच कड्यावरून पाहीलं असणार. कारण अगदी कालपर्यंत तर ही वाघीण तिच्या मुलांसाठी गवताचे भारे एकावर एक उचलून आणत होती. मग आजच माझ्याबरोबर गवत खाण्याचे निमित्त करून मला अचानक पाडून माझ्या वासराची पण का हत्त्या केली?
यावर वाघीण काही कमी नव्हती. तिने लगेच गायीला पकडले." हे बघ तू जर निव्वळ गवत खात होतीस तर मग तुझ्या पायाखालून जाणारे तीन ऊंदीर एकदम कसे नाहीसे झालेत? शिवाय त्याआधीचे दोन सरडे, एक पाल आणि एक बेडूक तू दाताखाली टाकलेस ते काय गवत म्हणून? तू जर हे सर्व करू शकतेस तर मला पण तुझ्या हातापायाचं धिरडं करून खाता येऊ शकत. जे प्राणी जिभेवर बेडूक ठेवू शकतात, ते दुसर्यांच्या गळ्यात व पोटात मुक्काम ठेवू शकतात!
या सगळ्यावर कहर म्हणून जिराफ़ मध्येच केकाटला," ह्या बिबळ्याला आवरा. माझ्याबरोबर झाडावर चढून पाला खाता खाता मला म्हणाला तुझ्या मानेला काट्यामुळे जखम झालीय, जरा चाटून पुसून देतो, म्हणजे सेप्टिक होणार नाही. मी मान वाकडी केली तर माझ तोंड मला माझ्या पायावर दिसलं आणि मान ह्याच्या तोंडात. शोभत का हे पोटभर पाला खाऊन ढेकर दिल्यानंतर?"
बिबट्या - हे बघ पोट भरल्याच्या गोष्टी माझ्यासमोर नको करूस. तूही पाला ओरबाडता ओरबाडता झाडावरच्या ओळीने चालणार्या मुंग्यांचा फ़डशा पाडत होतास. तू जर मुंग्या खाऊ शकतो, तर मी मुंग्याचे वारूळ तुझ्या मानेत आहे असे समजून ते ढापू शकतो.
हे एवढं झाल्यावर तर माकडालाही रहवलं नाही. तो आवेशाने म्हणाला," सगळ्यात वाईट अस्वल. माझ्या छोट्यांना हसवत हसवत फ़ळांच्या झाडाखाली घेऊन गेला, आपण फ़ळे खाऊ सांगून. आणि थोड्या वेळाने पाहतो तर काय, माझ्याच मुलांची फ़ळे खात होता."
अस्वल - हे पहा , आपण प्राणी आहोत, माणसं नाहीत. आपण प्राणी जे काही करतो ते फ़ळांची अपेक्षा ठेवूनच करतो. माणसांना खुशाल म्हणू दे, कर्म करा फ़ळाची अपेक्षा ठेवू नका. मी जे काही करणार त्यात फ़ळ खाणार हे आलेच. तुझी बाळं ही तुझ्या संसाराला आलेली फ़ळच आहेत ना? मग कशाला अकांडतांडव करतोस?
यावर कोल्हा, हत्ती, झेब्रा हे सर्व देवाकडे बघून एकसुरात विनवणी करायला लागलेत की देवा वाचव आम्हाला या हिंस्त्र श्वापदांपासून. आम्ही आता जरासुध्धा बाहेर जाऊ शकत नाही. बाहेर पडलो तर सिंह, वाघ, लांडगा आम्हाला खाणार. नाही बाहेर पडलो तर उपाशीपोटी हाल हाल होऊन मरणार. आम्हाला काय हे प्राणी असेही खाणार नाही तर तसेही खाणार.
हे ऎकताच देवांची ट्युब पेटली आणि त्यांनी लगेच निवाडा द्यायला सुरुवात केली याप्रमाणे.
"यापुढे ससा, गाय, झेब्रा, हरीण, जिराफ़, माकड हे आणि ईतर यांच्यासारखे सर्व फ़क्त गवत, पाला व फ़ळे खातील. हे खाऊन ते लठ्ठं झालेत की नंतरच मग त्यांना वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल वगैरे हिंस्त्र प्राणी त्यांचा फ़डशा पाडू शकतील. यापुढे वाघ, सिंहांना गवत पाला वगैरे अजिबात आवडणार नाही व ते खाणार्या प्राण्यांना "घास-फूस" म्हणून चिडविल्या जाईल. वाघ- सिंहांना नखे, सुळे व मऊ पंजाची गिफ़्ट देण्यात येईल कारण त्यामुळेच ते नीट शिकार करू शकतील. हत्तींना मात्र अभय राहील. फ़ारच कमी पक्षी यात involved नसल्यामुळे त्यांना उंदीर, कोळी, सरडे वगईरे खाण्याची परवानगी मिळेल. काही पक्ष्यांना पाण्यात बुडी मारून मासे खाण्याचा बोनस मिळेल. पण या सर्व प्रकारात मासे चतुराईने ईतरांना उगाचच जमीनीवर येऊन खात असल्याचे आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही त्यांना हा शाप देतो की मासेच माशांना खातील. "
ईतका वेळ बाजुला राहीलेला माणूस पुढे येऊन बोलला,"देवा, माझं काय?"
देव उत्तरलेत," तुला सर्वं काही खाण्याची परवानगी राहील. मात्र तू तुझ्या बुध्धीचा उपयोग करून, तुझ्या सद्सद्विवेकबुध्धीला पटले तर तूच प्राण्यांना मारण्याची यंत्रे शोधून काढून मारशील आणि खाशील."
यानंतरच शाकाहारी, मांसाहारी, पाळीव आणि हिंस्त्र श्वापदे अशा categories निर्माण झाल्यात.
हेमंत_सूरत