Sunday, December 30, 2007

एक अ"भूत"पूर्व मुलाखत - भाग २

मी घेत असलेल्या भुताच्या मुलाखतीचा भाग दुसरा!

भूत : वेताळ, समंध, हडळ हे काही वाईट शब्द नाहीत. तुम्ही माणसं हे शब्द शिव्या म्हणून वापरता त्याबद्दल आम्हाला objection आहे. अहो, वेताळ ही तर आमच्याकडॆ तबलजीसारखी पदवी आहे. वेताळ म्हणजे originally वेत-ताल. वेताच्या दोरीने ताल पकडून जो वाजवितो तो! वेत-ताल चा अपभ्रंश नंतर वेताल- वेताळ असा झाला. तसंच, आग्या-वेताळ हा पळत-पळत जावून message देणारा वेताळ हा भाग्या-वेताळचा अपभ्रंश. आता आम्हा भुतांना 'भ' म्हणता येत नाही(तुम्हाला भ ऎकू येतो हा पुन्हा software चा प्रताप) त्यामुळे तो झाला आग्या-वेताळ. हां आता भुते पळतात का आणि message का देतात व तो वेताळानेच का द्यावा हे मात्र विचारू नका. सगळच काही सांगायला मी बांधील नाहीय.

मी: मग चुडेल, हडळ याबद्दल काय?

भूत : सांगतो ना! चुडेल वाईट हाही तुमचा गैरसमज. आम्हा भुतिणींच्या हातात जी बांगड्या उर्फ़ 'चूडा' भरेल ती 'चुडेल'. तसंच हडळ ही तर सर्वात सुंदर भुतिणीची पदवी आहे. आमच्यात हाडे जितकी बारीक तितकी ती सुंदर. हाडे बारीक होण्यासाठी भुतिणींना खूप खूप दळावं लागतं हाडांनी. तेव्हा जी भूतीण सर्वात जास्तं दळेल हाडांना झाडाभोवती हाडे घासून, ती 'हाड-दळ', पुढे हाड्दळ चे हाडळ व नंतर हडळ. आलं लक्षात?

मी : समंध शब्दाचंही असंच काही आहे?

भूत : हो तर! समंध ही पदवी आम्हा भुतांमध्ये काही श्रीमंत भुतांना देतात. खूप संपत्ती जमल्यामुळे आमच्यातल्या काही भुतांच्या खोबण्या उर्फ़ डोळे अधु होतात. अर्थातच ते 'somewhat' अंध होतात. त्याचेच भ्रष्ट रूप - समव्हॉट-अंध म्हणजेच सम-अंध आणि पुढे समंध. पटतय नं?

मी : हो तर! आता पुढचे plans काय?

भूत : रामसे बंधूंवर उलट प्रहार म्हणून आम्ही "भूतसे" productions" काढली आहे. त्यातली नुसती काही titles पहा : 'तीन मजले जमीनीच्या वर", "गर्दीचा रस्ता", "नरभक्षक माणूस", हे खास माणसांवरती विडंबन!
आमच्या मनोरंजनासाठी - 'मी हडळ याच जन्मीची', 'हडळसुंदरी', 'मै मुंजा तू गंजा' आणि 'मुंजाभारत'

मी : लहान मुलांसाठी काही आहे का?

भूत : वा. हे काय विचारणं झाल? पळपुटा माणूस ही मांजर व त्याला त्रसून सोडणारा 'भूतपिल्लू' हा ऊंदीर ही series already फ़ार popular आही छोट्या भुतांमध्ये.

मी: तुमच्या सिनेमांमध्ये गाणी नाहीत का?

भूत : गाण्यांशिवाय कसं चालेल. हा एक नमुना पहा बालभूतगीताचा :

धरू धरू धरू धरू पिंपळाची पारंबी
पारंबीला पकडून लोंबू या
भुताच्या गावाला जावू या
जावू या भुतांच्या गावाला जवू या!

चुडेल आमुची सुंदर
डोळे फ़िरविते गरगर
डोळ्यांच्या खोबण्या वाढवू या
भुताच्या गावाला जावू या

मुंजा मोठा तालेवार
नखांच्या नाण्यांची दे भरमार
दातावर दात घासून विचकू या
भुताच्या गावाला जावू या

मी : काही खास संदेश माणसांसाठी आहे अजून?

भूत : नारायण धारप यांना आम्ही "भूत साहित्य अकादमीचा" खास पुरस्कार(मरणोत्तर) दिला आहे. माझी मुलाखत घेतल्याबद्दल तुम्हालाही 'भूतमित्र' हा किताब देण्याबद्दल मी शिफ़ारस करणार आहे. बोला केव्हा मरायला तयार आहात? कारण आमचे सर्व पुरस्कार मरणोत्तर आहेत हे वेगळे सांगायला नकोच.

मी : केव्हाच सूबाल्या ठोकला आहे व हा अनुभव तुम्हाला ब्लॉगवर सांगायला कसाबसा जीव मुठीत धरून जगतोय.

एक अ'भूत'पूर्व मु्लाखत

हल्ली जो उठतो तो कुणाची ना कुणाची मुलाखत घेत असतो. कोणत्याही चॅनेलवर जा, एक तरी मुलाखत चालू असतेच. मग तो मुलाखत घेणारा कुणी लुंग्यासुंग्या असो की देणारा असातसाच असो. घेणारे घेतात, पाहणारे पाहतात. तर मग एक "कातिल" मुलाखत घ्यायची या निर्धाराने मी पेटून उठलो आणि चक्कं एका भुताचीच मुलाखत घेतली. पहा त्याचा संकलित अंश!



मी : जय अमावस्या! पहिलाच प्रश्न. तुम्ही भूत लोक आम्हाला का सारखे घाबरवता?

भूत : काहीतरीच काय. अहो, खरं सांगू का? आम्हीच तुम्हाला घाबरतो.

मी : पटत नाही. पण तरीही कसं ते सांगा.

भूत : अहो, आम्ही तुम्हाला घाबरतो, म्हणून तर दिवसा बाहेर निघत नाही . तुमच्या नजरेला दिवसा पडलो तर आम्ही कायम अत्रुप्तंच राहू आणि आमचे हाल माणूस पण खाणार नाही. आम्हा भूतांना दिवसा अद्रुश्य राहण्याचे वरदान मिळाले आहे ते उगीच काय! पण वाईट म्हणजे हे वरदान फ़क्तं दिवसापुरतेच आहे. रात्री आम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फ़िरावं तर लागतच ना!
मी : पण रात्री तुम्ही भूत वावरता आहात असे नुसते वाटले तरी आमची बोबडी वळते.
भूत : अहो, तुम्ही तुमचं दु:खं सांगता आहात पण आमचं सुद्धा काय होतं हे तुम्हा माणसांना तरी कधी कळलंय का? आम्हाला माणूस नुसता दिसला तरी की घाबरून आमची हाडांवर हाडं घासल्या जातात. आमच्यातल्या काही निवडक जणांच्या पांढुरक्या धुकट वस्त्रांत तेज आणि प्रकाश यायला लागतं. शिवाय काही भूतांच्या खोबणीत डोळे येतात व अजून घबरले ते तर डोळे लाल पण होतात. असे ते लाल डोळे मग कधी कधी तर प्रकाशही फ़ेकू लागतात. असे झाले की आमची तर कंबक्तीच भरते. सुरवातीला आम्हाला त्यांना चितेवरची ताजी राख हुंगवावी लागते तेव्हा कुठे ते शुध्धीवर येतात. लाल डोळ्यांना पेलाभर रक्तात बुडवून ठेवावं लागतं सकाळपर्यंत. आता तुम्हीच सांगा हल्ली ताजी राख मिळणं फ़ार मुश्कील झालंय. शिवाय ताज्या मुडद्याच्या रक्ताबद्दल तर बोलूच नका.
बरं हे झाल भूतांचं. भूतिणींच तर काही विचारूच नका. काही भूतिणीतर माणूस दिसला की या झाडावरून त्या झाडांवर सैरावैरा पळायला लागतात. पारंब्यांना लोंबून लोंबून त्याच्या हाताची हाडं दुखायला लागतात. आता काय आम्हाला काही तुमच्यासारखी muscles नाहीत जास्तं वजन पेलायला. नाईलाजाने मग आम्हाला शेवटचा भूतबाण उपाय मग करावा लागतो.
मी : तो कोणता?
भूत : नुकत्याच मेलेल्या माणसाचे काळिज दाताखाली धरायला द्यावे लागते तेव्हा कुठे ते दोन तीन रात्रींनी भुताळतात.
मी : मग तुमच्याकडेही भूत-psychiatrist लागतात का?
भूत : हो तर. आमच्यात सध्या डॉक्टर भुतांची फ़ारच वानवा आहे. आम्ही त्यांना सायकियाट्रिस्ट नाही पण कवटीयट्रिस्ट म्हणतो. एकदा एखाद्या भुताच्या कवटीत काही शिरलं ना वेडंवाकडं, की ते निस्तरायला फ़ार त्रास पडतो आम्हाला.
हो, पण आम्हा भूतांना खरी गरज असते ती orthpaedic, dental, ENT specialists ची. अहो, एकतर हे दॉक्टर लोक लवकर मरत नाहीत आणि त्यातले फ़ार थोडेच भूत बनतात. ह्या डॉक्टर लोकांच्या ईच्छा पूर्ण होणार नाहीत याबद्दल आम्हा भूतांनाच आता काहीतरी करावे लागेल.
मी : अहो काय सांगता काय?
भूत : असं बघा. आम्ही फ़क्तं अस्थिपंजर असलेले . तेव्हा झाडांवर चढणं, चिंचोळ्या जागेत लपून राहणं, यात आमच्या हाडांना फ़ार त्रास होतो. तेव्हा orthopaedic surgeon आमच्यासाठी priority नं. १. नंतर येतो तो dental surgeon. काय आहे की आम्हाला पोट नाही पण दात तर आहेत ना!. भूक लागली की दाताखाली धरायला काहीतरी तर लागतंच ना. दात नसले, दुखले की आम्हाला अगदी ब्रम्हांड, चुकलो, चितांडं आठवतं. शिवाय आम्हाला आतले कान आहेत ऎकायला, टोकदार नाक शिवाय हाडांचा का होईना पण गळा तर आहे ना! तेव्हा ENT specialist तर हवाच.
मी : मग optholmologist कशाला हवाय तुम्हाला? खोबण्याच तर आहे म्हणताना?
भूत : आम्ही त्यांना रीतसर खोबणी specialist चं training देतो आणि खोबणी स्पेशालिस्ट हीच पदवी देतो. हल्ली आमच्यातल्या काही भूतिणिंना खोबण्या कोरून deep करायची fashion निघालीय त्यासाठी स्पेशालिस्ट हवेत. काहींना तर hair transplant विरळ पण लांब केस करून घ्यायची ईच्छा असते.टोकदार नाकावर वाटोळ्या वाटीएवढ्या डोळ्यांच्या contact lenses करवून घ्यायला स्पेशालिस्टशिवाय कोण मदतीला येणार?
मी : एवढ झाल तर मग dress designners पण लागत असतीलच ना!
भूत : ते europe, USA तल्या भुतांसाठी. तेथील भुते, आमच्यासारखी नागड्या सांगाड्यावर नाही फ़िरत! त्यांचे पायघोळ पांढरे धूसर झगे असतात. काहींच्याकडे तर घोडेही असतात फ़िरायला. त्यातल्या काहीजणांना पांढरा रंग बदलून हवाय. त्यांना कितीही सांगितलं की आपल्याला सूर्यप्रकाशात अद्रुश्य असताना फ़क्तं पांढराच रंग मिळतो तरी ते आपला हेका सोडायला तयार नाहीत. म्हणे आम्ही research करू. कसलं डोंबलाचं research! उगाच आपलं विमानांच्या पंखांवर निळ्या आकाशात कोलांट-उड्या मरून का कधी निळा रंग मिळणार आहे? त्यातले काही तर अजबच. चॉकलेटी रंगासाठी त्या रंगाच्या खडकांमध्ये शेकडो वर्षे लपून राहणार. कर्मं त्यांचं!
मी : तुम्ही भूतं करता काय?
भूत : आम्ही एक society स्थापन केलीय. माणसांनी आमच्याबद्दल जे गैरसमज पसरवलेत ते आम्हाला दूर करायचेत. आम्ही त्यासाठी जगातील सर्वं भूतांना एकत्र करतोय. पण आमच्यातही भाषा, प्रांत, देश हे आडवे येतात्च ना.
मी : कोणते गैरसमज दूर करायचेत?
भूत : बहुतेक गैरसमज नाटक, सिनेमा आणि कादंबरीकारांनी पसरवलेत. आमच्यात स्त्रिया रात्री मेणबत्ती घेवून फ़िरतात. पांढर्या कपड्यात फ़िरताना गाणी गातात. या मजल्यावरून त्या मजल्यावर जिना नं चढता सहज तरंगत जातात. अहो, एवढ्या सहज तर आमच्यातली olympic विजेती भूतं पण जागा बदलू शकत नाही. मुळात आम्हाला जीभच नाही तेव्हा गाणी गायचा तर प्रश्नच उरत नाही. आता तुम्ही म्हणाल हे मी कसं तर बोलतोय तर उत्तर सोप्पं आहे. आमच्यातलेच काही software engineer भूतांनी आमच्या दातांच्या भाषेवरून software केलंय. ते आमची दातांवर दात घसून बोलण्याची भाषा translate करतात. पायांच्या हाडांची टकटक करून आम्ही आरोळ्या ठोकतो.
मी : मेणबत्तीचं काय?
भूत : हो तेच तर सांगतोय. आमची हातांच्या हाडांची grip ईतकी मजबूत असते की मेणबत्तीच काय, metal चाच भुगा होईल. शिवाय आम्ही म्हणे कब्रस्थानात राहतो हे त्या पुचाट रामसे ब्रदर्सनी सांगितलय आणि तुमची विश्वास बसतो त्यावर. अहो, कब्रस्थान आम्हीही अशुभच मानतो. ते आमचं जन्मस्थान. तुम्ही कधी तरी labour room मध्ये आयुष्यभर राहू शकाल का? आम्हाला आवडतात ती storm drainage चे मोठाले pipes! पाण्यालाही अडचण नाही आणि आमच्या हाडांनाही त्रास नाही.
मी: अजून काही गैरसमज दूर करायचेत?
भूत : हो. बरेच गैरसमज आहेत अजून दूर करायचे. आमची नावे : चुडेल, हडळ, समंध, मुंजा वगैरे. पण आता दिवस सुरू होतोय तेव्हा ते उद्या रात्री पुन्हा भेटू तेव्हा बोलू दुसर्या भेटीत. शुभ सूर्यप्रकाश!